नवसंकल्प

0
117

मावळते वर्ष जगाला अनेक धक्के देणारे ठरले. इंग्लंडने ब्रेक्सिटच्या बाजूने दिलेला कौल, अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांचा अनपेक्षितपणे झालेला विजय, भारतात नोटबंदीचा अकल्पित निर्णय अशा एकाहून एक विलक्षण धक्क्यांनी सन २०१६ इतिहासात संस्मरणीय केले आहे. या सर्व घटनांची पडछाया अर्थातच या नववर्षावर राहणार आहे. डोनाल्ड ट्रंप लवकरच महासत्ता अमेरिकेची सत्तासूत्रे आपल्या हाती घेतील. ब्रेक्सिटचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागतील आणि नोटबंदीने आणि त्यानंतरच्या छापासत्राने गदागदा हलवलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे नवे रूपही या वर्षात उलगडू लागेल. जगाच्या तीन टोकांना घडलेल्या या तीन घटना असल्या तरी आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनावर त्यांचा कमी अधिक प्रमाणात परिणाम अपरिहार्यपणे होणार आहे. नोटबंदीचा निर्णय होईपर्यंत देशातील वाढती असहिष्णुता, ‘अच्छे दिन’ आणण्यात आलेले अपयश असे विषय आपल्या देशात चर्चिले जात होते. पाकिस्तानवरचा आणि नंतर काळ्या पैशावरचा सर्जिकल स्ट्राइक यांनी या सार्‍या चर्चेचा रागरंगच बदलून टाकला. नोटबंदीने तर ते सारे विषय झटक्यात पिछाडीवर नेले आणि प्रत्येकाला आपल्या पैशाच्या चिंतेने ग्रासले. या सार्‍या मंथनातून काही चांगले घडेल या अपेक्षेने एटीएमपुढे रांगा लावत, पण सकारात्मक नजरेने जनतेने ही नोटबंदी स्वीकारली. पण ज्या प्रमाणात कोट्यवधींच्या नव्या नोटांचे गठ्ठेच्या गठ्ठे छाप्यांत सापडू लागले, त्यातून आपल्या देशात आजवर काय चालले होते त्याचे उघडेवागडे दर्शनही घडले. या सगळ्या स्वच्छता अभियानाअंती एक नवा, स्वच्छ भारत उभरेल अशी आशा आम जनता या नववर्षाची पहिली पावले टाकताना बाळगून आहे. काळा पैसेवाल्यांची झोप उडालेली आहे, कारण या उठलेल्या वावटळीत आपण कधी सापडू याची धास्ती त्यांना नाही म्हटले तरी आहेच! भोवतालची परिस्थिती फार काही बदललेली नसली, तरी ती बदलेल आणि बदलते आहे असा आशावाद या नववर्षाच्या साथीने सर्वसामान्यांच्या मनात जागलेला आहे. दहशतवाद आज जगाच्या खनपटीला बसलेला आहे आणि तो काही आपले अक्राळविक्राळ पाश सोडायला तयार नाही. मग तो आयएसआयच्या पाठबळाने चालणारा असो वा आयएसआयएसच्या रूपाने थैमान घालणारा असो. त्यामुळे उगवणारा दिवस काही विपरीत घडवून येऊ नये आणि आधीच खडतर असलेला आयुष्याचा प्रवास अधिक खडतर होऊन जाऊ नये अशी प्रार्थनाही विधात्यापाशी आपल्याला करायची आहे. गोव्यासाठी हे वर्ष विधानसभा निवडणुकीचे आहे. आपल्याला आपले प्रतिनिधी निवडायचे आहेत, जे पुढील पाच वर्षे त्यांच्या कुवतीनुसार राज्याचा कारभार चालवणार आहेत. त्यामुळे ही निवड चोखंदळपणे आणि कोणत्याही दबाव – दडपणांना भीक न घालता करायची आहे. आपला मताधिकार बजावताना एक स्वच्छ, स्थिर व कार्यक्षम सरकार घडविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याचे भान आपल्याला ठेवावे लागणार आहे. आशा – निराशेचा खेळ युगानुयुगे चालत आलेला असला, तरीही त्यातही मौज आहे. नावीन्याची माणसाचा जन्मजात ओढ असते. जुने जाऊद्या मरणालागुनी म्हणत तो समोर खुणावणार्‍या नव्या क्षितिजाकडे बघत आशेचे एकेक पाऊल टाकत समोरच्या स्वप्नवत प्रकाशाला सामोरा जात असतो. त्यामुळे या नव्या वर्षाच्या पेटीत काय दडलेय याविषयी त्याला आजही निश्‍चित कुतूहल आहे. या पेटीतून दरवर्षीप्रमाणेच बर्‍यावाईट गोष्टींची भेंडोळी भले निघणार असली, तरीही किमान चांगल्या गोष्टी अधिक प्रमाणात घडाव्यात एवढेच त्याचे परमेश्वरापाशी मागणे आहे. हे नववर्ष सुखसमृद्धीचे जावो अशा सदीच्छा एकमेकांना व्यक्त करणेच तर शेवटी आपल्या हाती असते!