नवप्रभेने ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली आहे ः गोविंद गावडे

0
279

>> नवप्रभा दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा उत्सव आणि प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे. दिवाळी अंकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून दैनिक नवप्रभाने ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली आहे. ‘नवप्रभा’ने नेहमीच सामाजिक प्रश्न हाताळत असताना कणखर भूमिका मांडली आहे, असे गौरवोद्गार कला व संस्कृती मंत्री व गोवा कला अकादमीचे अध्यक्ष श्री. गोविंद गावडे यांनी काल दैनिक नवप्रभाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले.

पणजीतील नवप्रभेचे कार्यालय असलेल्या नवहिंद भवनमध्ये झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमात श्री. गावडे यांच्या हस्ते व दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू, दैनिक नवहिंद टाइम्सचे संपादक श्री. अरूण सिन्हा, नवहिंद पेपर्स अँड पब्लिकेशन्सचे सरव्यवस्थापक श्री. प्रमोद रेवणकर व उपसरव्यवस्थापक श्री. विजय कळंगुटकर यांच्या उपस्थितीत नवप्रभा दीपावली विशेषांक २०१७ चे प्रकाशन करण्यात आले.
साहित्य हा समाजाचा आरसा असून तो जेवढा स्वच्छ असेल तेवढा समाज नितळ राहील असे प्रतिपादन श्री. गावडे यांनी यावेळी केले. दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांनी यावेळी नवप्रभा दीपावली अंकाच्या प्रकाशनामागील उद्दिष्टे विशद केली. दिवाळी अंकांच्या किंमती आज सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत.

त्यामुळे सामान्यांतील सामान्यांना परवडेल अशा किंमतीमध्ये दर्जेदार साहित्यानिशी केवळ मनोरंजन नव्हे, तर वैचारिक प्रबोधन करणारा दिवाळी अंक देण्याचे उद्दिष्ट आम्ही समोर ठेवले असून अवघ्या ३५ रुपयांमध्ये हा जवळजवळ दोनशे पानी दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. कोकणी आणि मराठीतील उत्तमोत्तम लेखकांचा यात लेखन सहभाग आहे असे त्यांनी नमूद केले. नवहिंंद पेपर्स अँड पब्लिकेशन्सचे सरव्यवस्थापक श्री. प्रमोद रेवणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. गावडे यांचे स्वागत केले. नवप्रभा दीपावली अंकाच्या यंदाच्या मुखपृष्ठावर गोमंतकीय अभिनेत्री सोनम मोरजकर हिचे आकर्षक छायाचित्र असून त्याची संकल्पना व छायाचित्रण हेमंत परब यांचे आहे. या दीपावली अंकासाठी संपादन सहाय्य श्री. अनिल लाड यांनी व सजावट श्री. विजयंत महालकर यांनी केली आहे.