नवप्रभासह ३० माध्यम संस्थांना आज योग दिवस पुरस्कार वितरण

0
281

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी मंत्रालयाने विविध माध्यमसमूहांनी गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने खास पुरवण्या, लेख, अग्रलेख याद्वारे योग विषयक जी जनजागृती केली त्याची दखल घेऊन देशातील २२ भाषांमधील एकूण ११ वृत्तपत्रे, ११ वृत्तवाहिन्या व ८ रेडिओ केंद्रे आदींची आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मानसाठी निवड केली आहे. यामध्ये मुद्रित माध्यमे (मराठी) विभागात महाराष्ट्र व गोव्यातून दैनिक नवप्रभाची निवड झाली आहे. आज मंगळवार दि. ७ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित एका भव्य कार्यक्रमात केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

या पुरस्कारांसाठी भारत सरकारने प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी. के. प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एक सहा सदस्यीय उच्चस्तरीय स्वायत्त परीक्षक मंडळ नियुक्त केले होते. या परीक्षक मंडळाने ‘वृत्तपत्रांतील योगविषयक सर्वोत्तम वार्तांकन’, ‘दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील योगविषयक सर्वोत्तम वार्तांकन’ व ‘रेडिओ केंद्रांवरील योगविषयक सर्वोत्तम वार्तांकन’ अशा तीन गटांमध्ये या प्रसारमाध्यमांची ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान’साठी निवड केली आहे. या पुरस्कारांचे हे पहिलेच वर्ष आहे.