नवजात परिचर्येने व्याधिक्षमत्व

0
334
Baby massage. Spine
  •  डॉ. मनाली पवार

बाहेरचे देश सगळ्या रोगांवर लसीकरणाचा शोध लावत आहेत. आपणही निर्धास्त होऊन लसी टोचून घेत आहोत. अशा किती लसी व कोणकोणत्या रोगांवर म्हणून आपण टोचून घेणार आहात? आपल्याला लसीकरणाची नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे.

 

प्राचीन काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे ‘शतायू भवः’ असा आशीर्वाद देण्याची प्रथा आहे. शंभर वर्षे निरोगी जगणे शक्य आहे का? असा प्रश्‍न सर्वांनाच पडला असेल. पण हो, शक्य आहे, म्हणूनच तर ऋषीमुनी म्हणा किंवा आपले पूर्वज आपल्याला ‘शतायू’ होण्याचा आशीर्वाद देत. पण त्यासाठी आयुर्वेद शास्त्राप्रमाणे आपले सद्वृत्त आचरण मात्र हवे.

आज ऋतू बदलला तरी लगेच आजार पसरतात. साथींचे आजार येतात. सर्दी-तापासारखे आजार तर वारंवार होतात. हायपरटेंशन, डायबिटीस, कॅन्सरसारखे दुःसाध्य रोग तर आता सामान्य रोगांसारखे पसरत आहेत. मनुष्य सध्या आरोग्याच्या बाबतीतसुद्धा ताण-तणावात दिवस घालवत आहे. ‘मला तर हा आजार होणार नाही ना?’ अशी भीतीची टांगती तलवार सर्वांच्याच मनामध्ये दडली आहे आणि बाहेरचे देश सगळ्या रोगांवर लसीकरणाचा शोध लावत आहेत. आपणही निर्धास्त होऊन लसी टोचून घेत आहोत. अशा किती लसी व कोणकोणत्या रोगांवर म्हणून आपण टोचून घेणार आहात? आपल्याला लसीकरणाची नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे.

व्याधिक्षमत्व खरं तर निसर्गतः आपल्याकडे असते. पण नंतर आपल्या चित्र-विचित्र आहारसेवनाने, आपल्या अयोग्य आचरणाने, दूषित राहणीमानाने आपणच आपले बल, सामर्थ्य कमी करतो व अल्प, बारीकसारीक दुखण्यांना बळी पडतो. म्हणजेच आपली रोगप्रतिकारक शक्ती (व्याधिक्षमत्व) कमी होते.
व्याधिक्षमत्व म्हणजे काय?
व्याधिक्षमत्व म्हणजे कोणत्याही रोगापासून शरीराला लांब ठेवण्याची प्रत्येकाची एक नैसर्गिक ताकद असते, तिला रोगप्रतिकारक शक्ती म्हणतात. रोग उत्पन्न करणार्‍या कारणांचा शरीराशी संबंध आल्यानंतर शरीरात विकृती किंवा आजार उत्पन्न होतो. परंतु शरीराचा त्याचवेळी रोग उत्पन्न होऊ न देण्याकडे प्रयत्न सुरू होतो. यामध्ये शरीराचा हा जो व्याधिविरोधी प्रयत्न कार्य करीत असतो, त्यालाच व्याधिक्षमत्व म्हणतात. हे प्रयत्न दोन प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे व्याधी उत्पन्नच होऊ न देणे व दुसरा म्हणजे आजार झाला तरी तो बलवान होऊ न देणे म्हणजेच व्याधीच्या बलाला विरोध करणे. म्हणून आयुर्वेद शास्त्राप्रमाणे-
व्याधिक्षमत्वं नाम व्याधिबलविरोधित्वं
व्याध्युत्पादप्रतिबंधकत्वमिति|
काही व्यक्ती वारंवार अपथ्यसेवन करूनही रोगाला बळी पडत नाहीत, तरत इतर काहींनी पथ्यपालन केले तरीही त्यांना रोग होतात. याचे रहस्य व्याधिक्षमत्वाचे बल उत्तम किंवा हीन असणे हेच आहे. व्याधिक्षमत्व उत्तम असेल तर होणारा आजार सौम्य स्वरुपाचा असतो व तो लवकर बरा होतो. काही वेळा त्यावर चिकित्सा न करताही व्याधिक्षमत्वाच्या प्रभावाने बरा होतो.

रोगांच्या कारणांच्या बलांपेक्षा व्याधिविरोधी शरीरबल प्रभावी असेल तर रोगांच्या कारणांना (निज हेतू व कृमीसारखे आगंतू हेतू) रोग उत्पन्न करण्यासाठी योग्य भूमी न मिळाल्याने व्याधिहेतूंचा प्रभाव पडत नाही व रोग होत नाही.
मग हे व्याधिक्षमत्व जन्मजात असते का जन्मानंतर पुढे वाढते? कमी होते का व कसे होते? अशासारखे प्रश्‍न तुम्हाला नक्कीच पडले असतील.
तर रोगप्रतिकार शक्ती काही प्रमाणात प्रकृतीवर अवलंबून असते. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे व्याधिक्षमत्व खाण्या-पिण्याच्या, वागण्याच्या योग्य सवयींनी वाढवता येते. त्याला सराव पाहिजे, सातत्य पाहिजे.

अतिस्थूल, अतिकृश, ज्यांच्या शरीरातील मांस, रक्त, अस्थी हे धातू अनिविष्ट प्रमाणात आहेत किंवा शिथिल आहेत, दुर्बल आहेत. असात्म्यआहाराचे सेवन केल्याने अथवा अल्पआहार घेतल्याने ज्यांच्या शरीराचे उपचय-संवर्धन झालेले नाही किंवा ज्यांचे सत्व हीन प्रकारचे आहे अशा सर्व शरीरांत व्याधिक्षमत्व फारच कमी असते. याउलट प्रकारच्या शरीरांमध्ये व्याधिक्षमत्व असते.
म्हणजेच दुर्बलत्व हे प्रमुख लक्षण आहे. सामान्यतः शोषित, मांस व अस्थी या धातूंवर पुष्कळशा प्रमाणात बल अवलंबून असते.

असात्म्यआहार व अल्पआहार घेणार्‍या शरीरांचे पोषण नीट होत नसल्याने ती शरीरेही दुर्बल असतात. कारण अन्न हे मात्रावत, आहारविधी, विशेषायतन, प्रकृती व सात्म्य यांचा विचार करून सेवन केले तरच शरीराचे पोषण चांगले होते. म्हणजेच कोणत्याही कारणांनी शरीरात दौर्बल्य निर्माण झाले तरी व्याधिक्षमत्व कमी होते. शरीरबल व व्याधिक्षमत्व यांचा परस्परसंबंध आहे. शरीरबलावरच आरोग्य अवलंबून असते. म्हणून शरीरबलाची जपणूक करावी. थोडक्यात सांगायचे म्हणजे आयुर्वेद शास्त्रात सांगितल्याप्रमाणे दिनचर्येचे पालन, रात्रीचर्येचे पालन व ऋतूचर्येचे पालन करावे. सद्वृत्ताचे आचरण करावे. काही चांगले नियम आपणच आपल्याला घालून घ्यावे व ते नित्यनेमाने पालन करावे. हे झाले व्याधिक्षमत्व कसे वाढवावे. पण आता आपली पुढे येणारी पिढी रोगमुक्त जन्माला यावी म्हणून आपण काय करावे, नवजात बालकाचे व्याधिक्षमत्व कसे वाढवावे याचे उत्तरही आयुर्वेदशास्त्रात दिलेले आहे.

जन्माला येणार्‍या प्रत्येक गर्भावर गर्भसंस्कार व्हावेत. मूल जन्मल्याबरोबर त्याच्या अंगास सैंधव व तूप लावून वारीचा चिकटपणा काढून टाकावा. नंतर प्रसवावे थकलेले असल्यामुळे त्यास बलातेल लावावे व कानाजवळ दोन दगड घेऊन ते वाजवावेत.
नंतर त्याच्या उजव्या कानांत-
अङ्गादङ्गात्सम्भवलि हृदयादभिजायसे|
आत्मा वै पुत्रानामासि स जीव शरदां शतम्‌|
शतायुः शतवर्षोऽसि दीर्घयुरवाप्तुदि|
नक्षत्राणि दिशो रात्रिरहश्‍च त्वाक्षिरक्षतु॥
हा मंत्र म्हणावा.
– नंतर सुगंधी पदार्थांच्या पाण्यात तापलेले रुपे किंवा सोने विझवून ते किंचित ऊन झाले म्हणजे त्या पाण्याने त्या मुलास स्नान घालावे.
– ऐंद्रि, ब्राह्मी, वेखंड, शंखपुष्पी यांचा कल्क तूप व मध यांचे मिर्‍याएवढे चाटण मंत्रोपचारासहित दिल्यास बुद्धी, आरोग्य व शक्ती प्राप्त होते.
– वेखंड व सोने उगाळून चाटवावे.
– प्रसवांमुळे हृदयातील सिरा मोकळ्या होऊन बाळंत झाल्यापासून साधारणतः तिसर्‍या दिवशी स्त्रियांस दूध येते म्हणून.
– पहिल्या दिवशी तीन वेळा उपलसरीचे मूळ, मध व तूप यांचे चाटण मंत्राने शुद्ध करून मुलास घालावे.
– दुसर्‍या दिवशी पांढर्‍या रिगणीने सिद्ध तूप द्यावे. नंतर अगदी चिमूटभर लोणी २ वेळा चाटवून मग स्तन्य पाजावे.
– शक्यतो आईचेच दूध पाजावे. नसल्यास दोन दाई ठेवाव्यात. सद्य युगात ते शक्य होत नाही. ते शक्य नसल्यास शेळीचे दूध पाजावे. तेही शक्य न झाल्यास लघुपंचमुल यांनी सिद्ध केलेले देशी गायीचे दूध द्यावे.
– दहाव्या दिवशी बाळंतिणीस बाहेर काढून बाळाच्या अंगास मनशील, हरताल, गोरोचन, अगरू व चंदन यांचे गंध लावून त्याचा नामकरण विधी करावा.
– नियमित धूपन करावे.
– बाळाच्या गळ्यात किंवा मनगटाला वेखंड बांधावे. त्याने भूतबाधेपासून मुलांचे रक्षण होते.
– पाचव्या महिन्यात त्यास भुईवर बसवावे व सहाव्या महिन्यात चांगल्या मुहूर्तावर उष्टावण करावे.
– सहाव्या, सातव्या किंवा आठव्या महिन्यात योग्य मुहूर्त पाहून त्याचे कान टोचावे.
– पुढे त्यास दात आले म्हणजे स्तन्यापासून हळूहळू तोडावे व दूध व हलके आणि पौष्टिक अन्न त्यास खाऊ घालावे.
अंगावरून सोडविल्यानंतर मुलास चारोळ्या, जेष्ठमध, मध, लाह्या व खडीसाखर यांचा लाडू द्यावा.
– गाईचे सिद्ध दूध द्यावे, विविध भजलेल्या धान्यांची पेया द्यावी.
– मूल ऐकत नसल्यास त्यास भेडसावू नये, कारण भ्याला असता ग्रह पकतात.
– त्यास वस्त्राचा वारा, परक्याचा स्पर्श व कोणी त्याची ओलांड काढणे यांपासून जपावे.
– सारस्वत धृत, अष्टांगधृत द्यावे. त्यास आरोग्य, आयुष्य, वाणी, स्मरणशक्ती, धारणशक्ती व बुद्धी वाढते. एक वर्ष यांचे सेवन केले असता पुष्टता, धारणशक्ती व ताकद वाढते म्हणजे पर्यायाने बल वाढते.

याप्रमाणे नवजात बालकाचे आचरण ठेवल्यास बालकाचे व्याधिक्षमत्व नक्कीच वाढेल व कसल्याच रोगांना बळी पडणार नाही. पुढे कधीतरी पाश्‍चात्त्य देश याचा शोध लावेल व तेव्हा आपण भारतीय त्यांचा स्वीकार करणार. त्यापेक्षा आयुर्वेदशास्त्राने सांगिलेल्या या नवजात परिचर्येचा नक्कीच विचार करायला हरकत नाही.