नदाल, हालेपला अव्वल मानांकन

0
97

सहावेळच्या विजेत्या नोवाक जोकोविच या सर्बियाच्या खेळाडूला आगामी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी चौदावे मानांकन देण्यात आले आहे. मेलबर्न येथे १५ जानेवारीपासून सुरु होणार्‍या या स्पर्धेसाठी स्पेनच्या राफेल नदालला अव्वल मानांकन लाभले आहे. विद्यमान विजेत्या रॉजर फेडररला द्वितीय मानांकन मिळाले आहे. पहिल्या एकेरीत सिमोना हालेप व कॅरोलिन वॉझनियाकी यांना अनुक्रमे पहिले व दुसरे मानांकन मिळाले आहे.

मागील वर्षी जुलै महिन्यात विंबल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत टॉमस बर्डिच याच्याकडून पराभूत झाल्यानंतर कोपराच्या दुखापतीमुळे उर्वरित संपूणर्ज्ञ मोसम जोकोविचला मुकला होता. मागील आठवड्यात जोकोविचने कूयोंग क्लासिक स्पर्धेद्वारे पुनरागमन करताना जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या डॉमनिक थिएमला ६-१, ६-४ असे पराजित करत आपल्या फॉर्मची प्रचिती दिली होती. माजी अव्वल खेळाडू असलेल्या व १२ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचने ऐनवेळी अबुधाबी मधील स्पर्धेतून अंग काढून घेतले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी त्याच्या तंदुरुस्तीबद्दल शंका उपस्थित करण्यात येत होती. विंबल्डनपासून एकही स्पर्धा न खेळलेल्या व गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर स्वतःचा फिट घोषित केलेल्या माजी विजेत्या स्टॅन वावरिंकाला नववे मानांकन मिळाले आहे.

२३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घेतल्यानंतर यंदा या प्रकारात नवीन विजेती मिळणार हे निश्‍चित झाले आहे. २०१६ सालच्या डोपिंग प्रकरणानंतर आपली पहिलीच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळणार्‍या रशियाच्या मारिया शारापोवाचा पहिला सामना तातयाना मारिया हिच्याशी होणार आहे. अव्वल मानांकित हालेप आपल्या मोहिमेची सुरुवात वाईल्डकार्डधारी डेस्टनी ऐवा हिच्याविरुद्ध करणार आहे. गार्बिन मुगुरुझा (तिसरे मानांकन), व्हीनस विल्यम्स (पाचवे मानांकन), येलेना ओस्टापेंका (सातवे मानांकन) यांनी आत्तापर्यंत ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे संभाव्य विजेत्यांमध्ये या त्रिकुटाचे नाव घेतले जात आहे. २०१६च्या विजेत्या अँजेलिक कर्बरला २१वे मानांकन लाभले आहे. जर्मनीची कर्बर सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून सिडनीतील स्पर्धेत तिने व्हीनस विल्यम्सला लोळविले होते.