नदाल उपांत्यपूर्व फेरीत

0
117

स्पेनचा अव्वल मानांकित राफेल नदाल, अर्जेंटिनाचा तृतीय मानांकित युआन मार्टिन डेल पोट्रो यांनी युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. चार सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात नदाल याने जॉर्जियाच्या निकोलस बासिलाश्‍विली याचा ६-३, ६-३, ७-६, ६-४ असा पराभव करत नवव्या मानांकित डॉमनिक थिएम याच्याशी गाठ पक्की केली.

तिसर्‍या मानांकित डेल पोट्रोला विजयासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. दोन तासांत त्याने ११व्या मानांकित बर्ना कोरिक याला ६-३, ६-४, ६-१ असे हरविले. अंतिम आठमध्ये जॉन इस्नरच्या रुपात त्याच्यासमोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी असेल. महिला एकेरीत अमेरिकेच्या तिसर्‍या मानांकित स्लोन स्टीफन्सने १५व्या मानांकित इलिस मर्टेन्सला ६-३, ६-३ असे गारद केले. तर सातव्या मानांकित इलिना स्वितोलिना हिला १९व्या मानांकित अनास्तासिया सेवास्तोवा हिच्याकडून ६-३, १-६, ६-० असा पराभव पत्करावा लागला. सोमवारी उशिरा झालेल्या सामन्यात २०१४ सालच्या युएस ओपन विजेत्या व २१व्या मानांकित केई निशिकोरी याने जर्मनीच्या फिलिप कोहलश्रायबर याचा ६-३, ६-२, ७-५ असा पराभव करत तिसर्‍यांदा स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. चौदाव्या मानांकित मॅडिसन कीज हिने एकतर्फी लढतीत २९व्या मानांकित डसिबुलकोवा हिचा ६-१, ६-३ असा एक तास १६ मिनिटांत फडशा पाडून आगेकूच केली.

निकाल चौथी फेरी ः पुरुष एकेरी ः डॉमनिक थिएम (९) वि. वि. केविन अँडरसन (५) ७-५, ६-२, ७-६, जॉन इस्नर (११) वि. वि. मिलोस राओनिच (२५) ३-६, ६-३, ६-४, ३-६, ६-२, महिला एकेरी ः चौथी फेरी ः सेरेना विल्यम्स (१७) वि. वि. काया कानेपी ६-०, ४-६, ६-३, कॅरोलिना प्लिस्कोवा (८) वि. वि. ऍश्‍ले बार्टी (१८) ६-४, ६-४. पुरुष दुहेरी ः तिसरी फेरी ः बोपण्णा व रॉजर व्हेसलिन वि. वि. जेरमी चार्डी व फेब्रिस मार्टिन ७-६, ४-६. ६-३