नदालने ११व्यांदा जिंकली फ्रेंच ओपन

0
238
Czech Republic's Katerina Siniakova (L) and Barbora Krejcikova kiss The Simone Mathieu Cup after their victory in the women's double final match against Japan's Eri Hozumi and Makoto Ninomiya, on day fifteen of The Roland Garros 2018 French Open tennis tournament in Paris on June 10, 2018. / AFP PHOTO / Eric FEFERBERG

क्ले कोर्टचा बादशहा राफेल नदाल याने लालमातीवरील आपले श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध करताना काल रविवारी डॉमनिक थिएम याचा ६-४, ६-३, ६-२ असा फडशा पाडत तब्बल ११व्या फ्रेंच ओपन विजेतेपदाला गवसणी घातली. आपल्या १७व्या ग्रँडस्लॅम अजिंक्यपदासह नदालने रोलंड गॅरोवरील आपल्या जय-पराजयाचा रेकॉर्ड ८६-२ असा सुधारला. ३२ वर्षीय नदालला फेडररचा वीस ग्रँडस्लॅम विजेतेपदांशी बरोबरी साधण्यासाठी अजून तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकाव्या लागणार आहेत. मागील दोन वर्षांत नदालला क्ले कोर्टवर हरविलेला एकमेव खेळाडू म्हणून ओळख असलेल्या थिएमकडून अधिक कडव्या प्रतिकाराची अपेक्षा होती. परंतु, दुखापतग्रस्त नदालसमोर आपल्या पहिल्याच ग्रँडस्लॅम अंतिम सामन्यात खेळणार्‍या थिएमचा खेळ फिका पडला.

‘ओपन एरा’मध्ये तीन वेगवेगळ्या स्पर्धा ११वेळा जिंकण्याचा विक्रमही नदालने काल आपल्या नावे केला. या वर्षाच्या सुरुवातीला नदालने मॉंटे कार्लो मास्टर्स व बार्सिलोना ओपन ११व्या वेळी जिंकली होती. नदालने मार्गारेट कोर्ट यांच्या एकच ग्रँडस्लॅम स्पर्धा ११वेळा जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरीदेखील काल केली. महिला एकेरीतील दिग्गज खेळाडू मार्गारेट यांनी १९६० ते १९६६, १९६९-७१ व १९७३ साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती.

२००५ साली नदालने अर्जेंटिनाच्या मारियानो प्युअर्टा याचा ६-७, ६-३, ६-१, ७-५ असा पराभव करत आपले पहिले फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावले होते. १९८९ साली मायकल चांगने वयाच्या सतराव्या वर्षी सदर स्पर्धा जिंकली होती. यानंतर ही स्पर्धा जिंकणारा नदाल दुसरा सर्वांत युवा खेळाडू बनला होता. यावेळी नदाल केवळ १९ वर्षांचा होता. २००६ साली स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडरर याला १-६, ६-१, ६-४, ७-६ अशी धूळ चारून नदालने दुसर्‍यांदा फ्रेंच ओपन विजेतेपद आपल्या नावे करत पहिले यश फ्लुक नव्हते हे दाखवून दिले. क्ले कोर्टवरील नदालचा हा सलग ६०वा विजय होता. २००७ साली नदालने फेडररची सद्दी संपवण्याचे काम करताना ६-३, ४-६, ६-३, ६-४ अशा विजयासह हॅट्‌ट्रिक साजरी केली. रोलंड गॅरोवर लागोपाठ तीन स्पर्धा जिंकणारा बियॉं बोर्ग (१९८०) नंतरचा तो पहिलाच खेळाडू ठरला. रॉजर फेडररविरुद्ध मागील दोन विजयात नदालला चार सेटपर्यंत झुंजावे लागले. २००८ साली मात्र सरळ तीन सेटमध्ये नदालने फेडररला ६-१, ६-३, ६-० असे लोळवून क्ले कोर्टवरील आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. २००९ साली मात्र विजेेतेपदाने हुलकावणी दिली. या वर्षी रॉबिन सोडर्लिंगने नदालला पराभूत केले होते. याचा वचपा त्याने २०१० साली अंतिम फेरीत सोडर्लिंगला ६-४, ६-२, ६-४ असे नमवून काढला. या कामगिरीसह त्याने जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांकदेखील मिळविला. २०११ साली नदालने उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोवाक जोकोविच याची ४३ विजयांची मालिका खंडित करतानाच अंतिम फेरीत फेडररला धक्का दिला. नदालने आपल्या वेगवान खेळाने फेडररला ७-५, ७-६, ५-७, ६-१ असे हरवून बोर्ग यांच्या सहा फ्रेंच ओपन विजेतेपदांशी बरोबरी साधली व आपली एकूण ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या १० केली. २०१२ साली नदालने आपला करिष्मा पुन्हा एकदा दाखवला. पावसाने बाधित अंतिम सामन्यात नदालने जोकोविचचा ६-४, ६-३, २-६, ७-५ असा पाडाव केला. या पराभवामुळे जोकोविचला चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांचे जेतेपद एकाचवेळी राखणारा रॉड लेव्हर (१९६९) यांच्यानंतरचा पहिलाच खेळाडू होण्याचा मान मिळविता आला नाही. २०१३, २०१४ व २०१७ साली नदालने आपले आठवे, नववे व दहावे फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावले. २०१३ साली त्याने डेव्हिड फेररला ६-३, ६-२, ६-३ असे सरळ सेटमध्ये तुडवले. परंतु, यापूर्वी नदालला उपांत्य फेरीत जोकोविचला हरविण्यासाठी चार तास ३७ मिनिटे घाम गाळावा लागला होता. २०१४ साली प्रचंड उष्मा असतानादेखील नदालने जोकोविचला ३-६, ७-५, ६-२, ६-४ असे हरविले. मातीच्या कोर्टवरील नदालचे हे ४५वे विजेतेपद ठरले. मागील वर्षीचा अंतिम सामना एकतर्फी ठरला. नदालने स्टॅन वावरिंकाला ६-२, ६-३, ६-१ असे नमवून विश्‍वविक्रमाला गवसणी घातली. एकच ग्रँडस्लॅम स्पर्धा दहावेळा जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू म्हणून त्याने आपले नाव नोंदविले.

बार्बरा-कॅतरिना अजिंक्य
ग्रँडस्लॅम महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविणारी पहिली जपानी जोडी बनण्याचे एरी होझुमी व माकोटो निनोमिया यांचे स्वप्न उद्ध्वस्त करण्याचे काम झेक प्रजासत्ताकच्या बार्बरा क्रेसिकोवा व कॅतरिना सिनियाकोवा यांनी काल रविवारी केले. सहावे मानांकन लाभलेल्या झेक जोडीने केवळ ६५ मिनिटांत जपानी जोडीचा खेळ ६-३, ६-३ असा खल्लास केला. जपानी जोडीने उपांत्य फेरीत क्रिस्टिना म्लादेनोविच व टिमिया बाबोस या अव्वल मानांकित जोडीला अस्मान दाखविले होते.