ध्येयवेडे क्रांतिपुरुष ः नेताजी सुभाषचंद्र

0
134

– नीलांगी औदुंबर शिंदे (मेरशी)

मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करण्याचा… तारुण्याचा होम करून क्रांतीपथावर अग्रेसर होण्याचा… आपल्या हातांनी संकटांना निमंत्रण देत, काट्याकुट्यांच्या, खाचखळग्यांच्या मार्गाने जात आपल्या ध्येयाला गवसणी घालण्याचा ध्यास धरणार्‍या, सशक्त क्रांतिद्वारे स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करू इच्छिणार्‍या एका ध्येयवेड्या क्रांतिपुरुषाचा हा अल्पसा परिचय.

‘‘आपली मातृभूमी स्वातंत्र्याचा शोध करत आहे. त्यासाठी तिला स्वतःच्या रक्तात शत्रूला बुडवून मारणारे बंडखोर पुत्र हवे आहेत. तुम्ही मला तुमचे रक्त द्या, मी तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य देईन. ही स्वातंत्र्यदेवीची मागणी आहे’’- अशी ज्वलंत पुकार सैनिक व देशातील जनतेपुढे करणार्‍या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देशाचं स्वातंत्र्य आवळून टाकणारा आणि जुलुमांना संरक्षण देणारा परवशतेचा पाश पार झुगारून टाकायचा होता.

समोर दोन विचारधार होत्या. एक आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारून संपूर्ण देशाला प्रभावित करणार्‍या महात्मा गांधींचा तर दुसरा होता क्रांतिकारी मार्गाने जाऊन आत्मयज्ञ करणारे क्रांतिकारक. साध्य एकच होतं स्वराज्य मिळवण्याचं. ब्रिटीशांवर बॉंब आणि पिस्तुलाचा धाक बसतो हे अनुभवाने सिद्ध झाले होते. त्यामुळेच सुभाषचंद्राना क्रांतिमार्गाचे आकर्षण झाले यात नवल नाही.

सुभाषबाबू हे टिळक व महर्षी अरविंदांचे अनुयायी होते, त्यात त्यांच्या राजकारणाचे गुरू होते बाबू चित्तरंजन दास. लोकमान्य टिळक व छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांना विलक्षण अभिमान होता. आपले मित्र विजयरत्न मुझूमदार यांच्याशी बोलताना सुभाषबाबू म्हणाले होते, ‘‘लवकरच असा दिवस उजाडेल की हिंदी लोकांना आपल्या स्वातंत्र्य युद्धात शिवाजी महाराजांचे उदाहरण गिरवावे लागेल. परकीय शासनाला हाकलून लावण्यासाठी आपल्याला त्यांच्याच मार्गाने गेलं पाहिजे.’’ सुभाषचंद्र अशा विचारांनी सक्रीय होत होते, त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेण्याचा योग आला. त्यांनी सुभाषचंद्रांच्या विचारांना योग्य दिशा दाखवली.

याच काळात भारतात इंग्लंडच्या युवराजांचं आगमन झालं. त्यावेळी निषेध आंदोलनात पुढाकार घेतल्यामुळे सहा महिन्यांची कैद सुनावली गेली. ही त्यांच्या कारावास सत्राची सुरुवात होती. त्यानंतर क्रांतिकारकांचे सूत्रधार असतील या संशयाने स्पेशल ऑर्डिनन्स (खास अधिसूचना) काढून त्यांना अटक करून मंडालेच्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. इथे कमालीच्या प्रकृती-अस्वास्थ्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली.

स्वातंत्र्यलढ्याचं प्रतिनिधीत्व करणारी एकमेव संस्था कॉंग्रेस होती. सुभाषबाबूंच्या परखड विचारांमुळे व जहालमतामुळे गांधीजींशी त्यांचे मतभेद होत गेले. बंगालच्या राजकारणाचे ते एकमेव सूत्रधार होते. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळीमुळे त्यांना पुन्हा सहा महिन्यांची शिक्षा झाली. त्यानंतर गांधी आयर्विन कराराचा ऐन कॉंग्रेस अधिवेशनात निषेध केला व बंगाल हा करार जुमानणार नाही व कायदेभंग चालूच ठेवील अशी घोषणा केली. यामुळे दोन वर्षाची सजा झाली. हा कारावाससुद्धा प्रकृती ढासळल्यामुळे संपुष्टात आला. पण मुक्ततेची अट होती की त्यांनी हद्दपार व्हावं.

या अनुषंगाने सुभाषचंद्र युरोपमध्ये गेले. तिथे त्यांनी अनेक देशांना आणि देशप्रमुखांना भेटी दिल्या. आपला देश पराधीनतेतून कसा मुक्त करता येईल याची चाचपणी त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली. बर्लिनमध्ये जाऊन हिटलरची भेट घेतली. मुसोलिनी, डॉ. व्हॅलेरा या ब्रिटीशविरोधी राष्ट्रप्रमुखांच्याही भेटी घेतल्या. या वास्तव्यात कट्टर टिळकपंथी, कणखर पण जहाल विचारसरणीचे प्रगाढ देशभक्त विठ्ठलभाई पटेल यांची बहुमूल्य मदत लाभली. विठ्ठलभाईंच्या अखेरच्या आजारपणात त्यांनी मनापासून सेवा केली.

१९३८ साली संपूर्ण जग महायुद्धाच्या कुरूक्षेत्रावर येऊ लागलं. ब्रिटीश साम्राज्याला ही धोक्याची घंटा होती. शत्रूच्या संकटाचा फायदा आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या उद्दिष्टासाठी करून घेण्याची अशी नामी संधी चालून आली. या संधीसाठी त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश मिळवला. हरिपुरा येथील कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद सुभाषबाबूंना मिळाले. महायुद्धाचा आपल्या स्वतंत्रता लढ्यामध्ये लाभ करून घ्यायचा, प्रसंगी संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. अश्या वक्तव्यामुळे गांधीजी नाराज झाले. त्यांनी सुभाषबाबूंची कोंडी करून काम करणं अशक्य करून टाकलं. म्हणून त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून ‘‘पुरोगामी गट’’ किंवा ‘‘फॉरवर्ड ब्लॉक’’ नावाने नवी संघटना स्थापन केली.

सुभाषचंद्र बोस नागपुरात आले व त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. के. ब. हेडगेवार यांना भेटले. पुन्हा सावरकरांची भेट घेतली. सावरकरांनी जपानमध्ये असलेल्या ज्येष्ठ क्रांतिकारक रासबिहारी बोसना भेटून तिथे नेतृत्व द्यावे असा सल्ला दिला.

सुभाषबाबूंना लोकांचा असंतोष जागृत ठेवायचा होता. त्यांनी कलकत्त्यातील ‘‘हॉलवेल स्मारक’’ उखडून टाकायचं ठरवलं. या संकल्पामुळे त्यांना पकडण्यात आलं. कैद झाली. मुक्ततेची लक्षणे दिसत नव्हती. त्यांनी अन्नत्याग केला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुक्त करण्यात आले. घरी आल्यानंतर त्यांनी एकांतवास पत्करला. आपल्या सहकार्‍यांशी गुप्त मसलत करून काबुली अफगाणचा वेष धारण करून, मुक्या-बहिर्‍यांचं सोंग घेऊन ते निघून गेले. सर्वांचे धाबे दणाणले.
ज्यावेळी भारतात सरकार, वृत्तपत्र, पुढारी संशयाच्या भोवर्‍यात सापडले, त्याचवेळी सुभाषचंद्र रशिया आणि इटालियन उच्चाधिकार्‍यांशी बोलणी करत होते. ते मास्कोहून बर्लिनला पोचले. ‘स्वतंत्र हिंदूस्थान केंद्रा’ची स्थापना झाली. ‘जय हिंद’ ही अभिवादनाची शब्दसंहिता ठरली. ‘स्वतंत्र हिंदुस्थान केंद्रा’च्या वतीने बर्लिनमध्ये ‘‘आझाद हिंद नभोवाणी’’ आकाराला आली. हिटलरने सुभाषचंद्रांना सन्मानपूर्वक बोलावून त्यांना ‘हिज एक्सलन्सी’ संबोधित केलं. त्यांना ‘‘फ्युअरर’’ म्हटलं. त्याचाच अनुवाद पुढे आजाद हिंद सैनिकांनी ‘नेताजी’ असा केला.

सुभाषबाबूंनी तिथल्या लोकांचं संघटन करून ‘आझाद हिंद सेना’ स्थापित केली. जपाननेही पूर्वेची आघाडी उघडली. दोन्ही आघाड्यांचं संचालन करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य संघ निर्माण करण्यात आला. सुभाषचंद्रांनी टोकियोला जाऊन नेतृत्वाचा भार स्वीकारला. सिंगापूरला झालेल्या स्वागताच्या वेळी त्यांनी उपस्थितांना ‘चलो दिल्ली’चा नारा दिला. दि. २१ ऑक्टोबर १९४३ या दिवशी सुभाषबाबू आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून घोषित झाले. त्याच दिवशी स्वतंत्र भारताच्या अस्थायी सरकारची स्थापना झाली ज्याला जपान सरकारने मान्यता जाहीर केली. जर्मनी, ब्रह्मदेश, फिलीपाईन्स, कोरिया, इटली, मांचूको या राष्ट्रांनीही आपल्या मान्यता जाहीर केल्या.
आझाद हिंद सेनेचा विजयध्वज पुढे पुढे सरकू लागला. अनेक महत्त्वाची ब्रिटीश ठाणी सेनेच्या कब्जात आली. राणी लक्ष्मी रेजिमेंटच्या स्त्रीसैनिकांनी सुद्धा न भूतो न भविष्यति असे पराक्रम केले. जुलै १९४४ मध्ये रंगूनला मोठा समारंभ करून पराक्रमी सैनिकांना सन्मानित केलं. १९४५ ला जागतिक युद्ध पालटलं. जर्मनीच्या आत्मसमर्पणानंतर दोस्तराष्ट्रांना चेव आला. त्यांनी जपानवर १३ ऑगस्ट रोजी अणुबॉंब टाकला. हिरोशिमा व नागासाकी बेचिराख झाले. संपूर्ण जपान कोलमडून पडला. अधिक हानी टाळण्यासाठी जपानी सम्राटाने युद्ध थांबवल्याची घोषणा केली. जपानच्या पराजयातच आझाद हिंद सेना व सुभाषचंद्रांची स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याची दुर्दम्य आकांक्षा विरून गेली.

दि. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी टोकियोला जाण्यासाठी निघाले. त्यांच्या विमानाला आग लागली. अंगावर पेटतं इंधन पडून नेताजी भयंकर जखमी अवस्थेत बाहेर कोसळले. सैनिकी इस्पितळात त्यांचा देहांत झाला. तो अपघात होता की घातपात हे अजूनही साशंकच आहे. दिल्लीचा ध्यास घेऊन प्राणांच्या पायघड्यांवरून निघालेलं स्वातंत्र्य जयहिंदच्या जयजयकारात पोहचू शकलं नाही.
– एवढा प्रदीर्घ संघर्ष, चळवळी, कारावास, फाशीसारखी दिव्ये सोसल्यानंतर भारतीयांना लाभले काय तर ब्रिटीशांनी अमानूषपणे केलेली देशाची फाळणी. शेवटी ‘भारताला स्वातंत्र्य मिळालं’ हेच ऐकू आलं. ‘भारताने स्वातंत्र्य मिळवलं’ हे शब्द विरून गेले. एका दैदिप्यमान पर्वाचा अस्त झाला.
आज नेताजी सुभाषचंद्र बोस या ज्वलज्वलंतेजस नेतृत्वाची १२१ वी जयंती. त्यांच्या स्मृतीस, पराक्रमास शतशः वंदन!