धोक्याचे स्मरण ठेवा!

0
160

वास्कोच्या मांगूर हिल परिसरामध्ये झालेल्या कोरोनाच्या प्रचंड स्थानिक संक्रमणामुळे गोव्याची एकूण रुग्णसंख्या शनिवारपर्यंत २६७ वर जाऊन पोहोचली. यातले ६५ जण आतापर्यंत बरेही झाले, परंतु ऍक्टिव्ह रुग्णसंख्याच २०२ वर पोहोचल्याने गोव्याचे एकमेव कोविड इस्पितळ खचाखच भरले आणि मांगूर हिलमधील चाचण्या थांबवण्याची पाळी आरोग्य खात्यावर ओढवली. कोरोनाचे ऐंशी टक्के रुग्ण हे लक्षणविरहित असतात याचा फायदा घेऊन सरकारला हे करता आले. याचाच फायदा घेत, कोविड इस्पितळावरील ताण कमी करण्यासाठी चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या, परंतु बाह्य लक्षणे नसतानाही कोविड इस्पितळात भरती असलेल्या लोकांना यापुढे अन्य इस्पितळांमध्ये विलगीकरणात पाठवण्याचा पर्याय सरकारने पुढे आणलेला आहे. शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची त्यासाठी प्रथमतः निवड झालेली आहे. तेथील बाह्य रुग्ण विभागही त्यामुळे आजपासून बंद करण्यात आला आहे. कोविड इस्पितळात भरती असलेली काही रुग्ण मंडळी अजून तब्येतीने ठणठणीत असल्याने जणू काही आपण सहलीला आल्यागत तेथूनच सोशल मीडियावर सेल्फी अपलोड करीत राहिली होती, त्यामुळे अशा रुग्णांना अन्यत्र अन्यत्र हलविल्याने कोविड इस्पितळातील अत्यवस्थ रुग्णांकडे तेथील डॉक्टर व परिचारिका अधिक चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतील, त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला कोणी हरकत घेण्याचे काही कारण नाही, मात्र, तरीही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील अन्य एखाद्या इस्पितळाचे लवकरात लवकर कोविड इस्पितळात रुपांतर करण्याची गरज दुर्लक्षिता येणार नाही हेही तितकेच खरे आहे. कालच्या दिवसात आणखी ३३ नव्या रुग्णांची भर पडली आहे आणि ही संख्या मांगूरमध्ये शिल्लक असलेल्या चाचण्या पाहता बरीच वाढेल हे दिसते आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा ताण आता आरोग्य यंत्रणेला जाणवू लागला आहे हे तर दिसतेच आहे. गोव्यात आतापर्यंत जे ६५ रुग्ण बरे झाले, त्यापैकी तब्बल २१ जणांना मांगूरमध्ये मोठे सामाजिक संक्रमण उघडकीस आल्यानंतर एकाएकी बरे झाल्याचे सांगून २ आणि ५ जूनला घरी पाठवण्यात आलेले आहे हेही लक्षात घेण्याजोगे आहे.
गोव्यातील आजवरच्या कोरोना रुग्णांचा संपूर्ण तपशील कालच्या अंकात पहिल्या पानावर आम्ही दिला होता. आरोग्य खात्याकडून रोज प्रसृत होत असलेल्या त्या आकडेवारीचे अधिक सखोल विश्लेषण केले असता असे दिसते की आजवरच्या एकूण २६७ रुग्णसंख्येपैकी ६५ जण म्हणजे २४ टक्के लोक बरे झाले आहेत. देशातील रुग्णांचे कोेरोनामुक्त होण्याचे प्रमाण सतत वाढत चालले आहे. त्याचप्रमाणे गोव्यातही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे ही आपल्यासाठी दिलासादायक बाब आहे. त्याचे श्रेय राज्यात प्रवेश करतेवेळीच होणार्‍या कोविड चाचण्या व तत्पर उपचारांना द्यावे लागेल. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण असेच वाढते राहील अशी आशा आहे.
आजवरच्या रुग्णसंख्येच्या विश्लेषणातून असेही दिसते की,
राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ३६ टक्के रुग्ण हे राज्याबाहेरून आलेले आहेत. त्यामध्ये काही गोमंतकीय जरी असले, तरी बाहेरून ते येथे कोरोनाचा संसर्ग घेऊन आलेले आहेत. गोव्यात ते कोणत्या मार्गाने आले त्याचे पुढे जाऊन विश्लेषण केले, तर असे दिसते की एकूण रुग्णसंख्येच्या १५ टक्के लोक हे रेल्वेने गोव्यात आले, १५ टक्के लोक हे रस्तामार्गे आले, तर ६ टक्के लोक विमानाने गोव्यात आलेले आहेत. वर म्हटल्याप्रमाणे आजवरचे ३६ टक्के रुग्ण राज्याबाहेरून आलेले आहेत, याचाच दुसरा अर्थ एकट्या मांगूरहिलमधील स्थानिक संक्रमणाचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तब्बल ६४ टक्के आहे. हे प्रमाण अधिक वाढेल यात शंका नाही, कारण अजून जवळजवळ दोन हजार लोकवस्तीपैकी अर्ध्याही चाचण्या अजून पूर्ण झालेल्या नसतानाची ही आकडेवारी आहे. शिवाय मांगूरला गेलेल्या आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांनाही कोरोना संसर्ग झाला असल्यामुळे आणि ते राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील असल्यामुळे त्यांच्याद्वारे तो आणखी किती दूर पसरला असेल याबाबत साशंकता कायम राहते. त्यामुळे या घडीला गरज आहे ती अधिकाधिक कोविड चाचण्यांची. वेळेत या चाचण्या झाल्या, तर संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता कमी असते. मांगूरहिलमध्ये स्थानिक संक्रमणाचा संशय येताक्षणी सरकारने त्या परिसराला निर्बंधित क्षेत्र घोषित करून त्याचा बाह्य संसर्ग रोखला हे योग्य झाले, अन्यथा एव्हाना संपूर्ण वास्को शहरात आणि त्याबाहेरही त्याचे सामाजिक संक्रमण प्रत्ययाला आले असते. मांगूरहिलवासीयांना बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याने सध्या तरी हे कोरोनाचे स्थानिक संक्रमण असल्याचे सरकार ठासून सांगत असले, तरी मुळात मांगूरमध्ये संक्रमण कोठून झाले याचे उत्तर सरकारला अजून देता आलेले नाही. मांगूरमधील रुग्णसंख्येचे प्रचंड प्रमाण लक्षात घेता तेथून ते कुठवर संक्रमित होत गेलेले असेल याबाबतची भीती मात्र निश्‍चितच कायम राहते. मांगूर हिलमध्ये सेवा बजावत असताना संसर्ग झालेले आरोग्य खात्याचे कर्मचारीही सत्तरीपासून सांगेपर्यंतचे असल्याने त्यांनी तो संसर्ग कुठवर पोहोचवला आहे हेही अद्याप स्पष्ट नाही. राज्याच्या विविध भागांतून एकाएकी जे नवे रुग्ण काल आढळले, ते मांगूरहिलमध्ये सेवारत असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांच्या संपर्कातील असल्याचे नीला मोहनन काल म्हणाल्या व त्यांनी कोरोनाच्या सामाजिक संक्रमणाची शक्यताही फेटाळून लावली आहे. ज्या गावांमध्ये हे नवे रुग्ण आढळले, तेथे अधिक संक्रमण झाले असेल तरीही त्याला सरकार स्थानिक संक्रमणच ठरवील, कारण शेवटी ते मांगूरहिलच्या संक्रमणाशी संबंधित असेल. स्थानिक संक्रमण म्हणा अथवा सामाजिक संक्रमण म्हणा, परंतु ते रोखणे हे खरे आजच्या घडीचे आव्हान आहे.
जनतेच्या मनातील सामाजिक संक्रमणाच्या या संशयाच्या निराकरणासाठी अर्थातच आवश्यक आहेत त्या अधिकाधिक कोविड चाचण्या. सरकारची पावले त्या दिशेने पडली पाहिजेत. नवे रुग्ण वाढू नयेत म्हणून चाचण्याच स्थगित ठेवण्याची चाल चालणारी नाही!
मांगूरहिलमधील चाचण्या पुन्हा नव्याने सुरू करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या दिसू शकते. जनतेने त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, हवी असेल ती सततची सजगता आणि सतर्कता. आजपासून राज्यातील १४४ कलम शिथिल होत आहे. रेस्तरॉं आणि शॉपिंग मॉल खुले होत आहेत. त्यामुळे अर्थात धोकाही वाढतो. सामाजिक जीवनात वावरताना या धोक्याचे स्मरण ठेवून वावरणे हाच कोरोनाला दूर ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे!