धेंपोचे गोवन एफसीवर चार गोल

0
155

धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने गोवन फुटबॉल क्लबवर ४-० अशी मात करीत धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत देखण्या विजयसह पूर्ण गुणांची कमाई केली. या विजयामुळे धेंपोचे दोन सामन्यांतून ६ गुण झाले असून ते गुणतक्त्यात अग्रस्थानावर पोहोचले आहेत. गोवन फुटबॉल क्लब १ गुण मिळवून आठव्या स्थानी आहे.

धेंपोने या सामन्यावर बव्हंशी वर्चस्व राखले होते. पहिल्या सत्रात लतेश मांद्रेकरने नोंदविलेल्या दोन गोलांमुळे धेंपोने २-० अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या प्रारंभीच ८व्या मिनिटाला धेंपोला खाते खोलण्याची संधी हुकली. निक्सन कास्तान्हाच्या क्रॉसवर बीवन डिमेलोचे प्रयत्न थोडक्यात अपुरे पडले. तर लगेच गोवान फुटबॉल क्लबच्या आरन डिसिल्वाचे प्रयत्न थोडक्यात अपुरे पडले. २७व्या मिनिटाला धेंपोचा स्ट्रयकर कपील होबळेने उजव्या पायाने घेतलेला जोरकस फटक्यावरील चेेंडू गोवन एफसीचा गोलरक्षक इप्रोतिप डायसने सूर मारत अडविला.

अखेर ३२व्या मिनिटाला धेंपोने आपले खाते खोलले. लतेश मांद्रेकरने निक्सनच्या क्रॉसवर हा संघाला आघावीर नेणारा गोल नोंदविला. लगेच ३९व्या मिनिटाला लतेशने गोवनचा बचावपटू ब्रायन फारियाच्या चुकीचा फायदा उठवित लतेशने स्वतःचा व संघाचा दुसरा गोल नोंदविला (२-०).
दुसर्‍या सत्रात ७३व्या मिनिटाला निक्सनने ३० यार्डावरून घेतलेल्या फ्री-कीकवर डी कक्षेत असलेल्या मारिओ मस्कारेन्हासने हेडरद्वारे गोल नोंदवित धेंपो स्पोटर्‌‌स क्लबची आघाडी ३-० अशी केली. तर ७७व्या मिनिटाला बीवन डिमेलोने निक्सनच्या क्रॉसवर हेडरद्वारे गोवनच्या गोलपोस्टची जाळी भेदत धेंपोला ४-० असा देखणा विजय मिळवून दिला.
आज या स्पर्धेत एफसी बार्देश आणि वास्को स्पोर्टस क्लब यांच्या धुळेर मैदानावर सायं. ४ वा. सामना होणार आहे.