धूम धडाड धूम हो, रायगडावर नाद

0
205
  • सुरेंद्र शेट्ये (म्हापसा)

रायगडावर साजर्‍या झालेल्या शिवपुण्यतिथी कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांची यंदा उपस्थिती होती. त्या सोहळ्यामध्ये सहभागी होताना आलेला एक अनुभव –

पंचवीस वर्षांनंतर परत एकदा रायगड पादाक्रांत करण्याचा योग आला. जशी प्रभू रामचंद्रांची अयोध्या, तसाच शिवाजी महाराजांचा रायगड आम्हाला ललामभूत. ‘स्वर्णमयी लंका ना मिले मॉं, अवधपूरी की धूल मिले’ या काव्यपंक्ती अयोध्या आणि रायगडाला आमच्या जीवनात किती मोलाचे आणि मानाचे स्थान आहे हे दर्शवतात. शिवाजी महाराज तर आमचे स्फूर्तीकेंद्र. दैवतच. त्यामुळे ज्या रायगडावर महाराजांचा वावर राहिला- त्यांचा राज्याभिषेक झाला, मृत्यू झाला, तो रायगड आम्हाला नेहमीच साद घालत आलेला आहे.

सेवानिवृत्ती झाली. रायगडावर जायची संधी चालून आली. सोडली नाही. यंदा शिवपुण्यतिथीला गेली १२३ वर्षे त्या तिथे साजरा होणार्‍या कार्यक्रमात रा. स्व. संघाचे सरसंघचालक प. पू. मोहन भागवत मुख्य वक्ते अन् प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने जायचे ठरले.

घोषणा देत, गाणी गात अंताक्षरी खेळत कधी गडाच्या पायर्‍यांशी आम्ही पोचलो कळलेसुद्धा नाही. वाटेत राजापूरची गंगा म्हणून ओळखले जाणारे गरम पाण्याचे झरे अंगावर घेतले. पुढे जाऊन डेरवणची शिवसृष्टी पाहिली. शिवचरित्र शिलांतून चितारलेले पाहताना हरखून जायला होते. नंतर परशुरामाचे दर्शन घेतले. आपल्या गोमंतकाचा निर्माता अशी त्यांची ख्याती आहे. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावी रात्रीचा मुक्काम केला व पहाटे लवकर उठून रायगडावर कूच केले.

मोजून १४८० पायर्‍या हळूहळू चढत जाऊन दोन तासांत रायगडावर पोचलो. दमछाक झाली, पण छत्रपतींचे स्मरण- ते याच वाटेने घोड्यावरून बसून गेले असतील ही कल्पनासुद्धा अंगात दहा हत्तींचे बळ देऊन जायची. बाहू स्फुरण पावायचे, छाती छप्पन इंची व्हायची. काहींचा रोप वेने जायचा विचार होता, परंतु त्याच दिवशी ती सेवा फक्त महनीय व्यक्तींनाच उपलब्ध होती. त्यामुळे पांडुरंग सर्व्हिस सगळ्यांच्या नशिबी आली. रायगडावर पोहोचल्यावर ४०० वर्षांपूर्वीचा इतिहास मनात ताजा झाला. ती सगळी ऐतिहासिक स्थळे पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले. तो भव्य दरवाजा, ते टकमक टोक, ती होळीची जागा, सदर तिथले भग्नावशेष, धीरगंभीर वातावरण, समाधीवर माथा टेकताना प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शांने पुलकित झाल्यासारखे वाटले. सिंहासनाधिष्ठीत शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले व भरगच्च उपस्थितीत पार पडलेल्या मुख्य कार्यक्रमाचा भाग झालो. पंढरपूरचे शिवप्रतिष्ठान सगळा कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन आलेले. भगवे झेंडे नाचवणारे ते शिवप्रेमी, फेटेधारी महिला, बाळगोपाळ सगळ्यांनी मिळून रायगडावर ही गर्दी केलेली. शिवाजी महाराजांच्या जयघोषाला तर सीमाच नव्हती. उत्फूर्तपणे हरहर महादेव अन् जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत पार निनादून जात होता. एव्हाना सडकून भूक लागलेली. नाश्त्याची सोय होती. सरसंघचालकांचे भाषण कानात प्राण आणून ऐकले. प्रभू रामचंद्र अन् भगवान श्रीकृष्णाच्या पंक्तीला शिवाजी महाराज हजार वर्षांनंतर जाऊन बसतील हे त्यांचे सांगणे मनाला पटले. मात्र शिवाजी महाराजांचाही देव होऊ नये असे वाटले. नाहीतर नंतर त्यांना देव्हार्‍यात बसवून तिन्ही त्रिकाळ पूजा करत बसतील. शिवाजी महाराजांची आरती तर तयार झालेलीच आहे.
जयदेव जयदेव जय जय शिवराया, या या अनन्यशरणा आर्यां ताराया…
शेवटी व्यक्तिपूजा, विभूतीपूजा करत राहणे हा आम्हा भारतीयांचा स्वभाव. स्थायीभाव. त्या कार्यक्रमात शिवाजींचे सरदार कान्होजी जेधे यांच्या पिढीतील काहींचा सत्कार करण्यात आला. रायगड चढून येण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. मराठा रेजिमेंटचे तसेच लोकमान्य सिंफनी या पुण्याच्या बँडचे वादन झाले. पुष्कळ वक्ते आवेशपूर्ण बोलले. मुख्यमंत्र्यांनी गडाच्या डागडुजीसाठी ६०० कोटी दिल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ पर्यंत रायगडावर येतीलच असा आशावाद एका वक्त्याने व्यक्त केला. शिवाजी महाराजांची मग पालखी निघाली. प्रत्यक्ष खांद्यावर वाहिली नसली तरी त्या पालखीचे साथी होऊन जीवनात काही अंशी कृतार्थता लाभली. जेवणाची पाकिटे घेऊन रणरणत्या उन्हात मग परतीचा प्रवास सुरू झाला.

उतरताना उतरायला त्रास झाला नसला तरी गर्दीचा मात्र त्रास झाला. फार मनात होतं, रायगडावरची माती कागदात गुंडाळून आणावी. शिवाजींच्या पादस्पर्शाने पावन झालेले ते धुळीचे कण मस्तकी धारण करण्यातच धन्यता मानली व गड उतरलो. वाटेत जाता-येता मनसोक्त फोटो काढले. एवढी काय रायगडाची जादू की, जिथे विशेष काही नसताना शिवाजीचा आठव एवढा प्रेरणादायी ठरावा की ‘मुझे डोर कोई खिंचे’चा आभास पदोपदी जाणवावा! कदाचित एखाद्या मावळ्याचा आत्मा तर माझ्यात नसेल ना?

शिवाजीराजे म्हटल्यावर नेमके काय होते हे सांगायला माझ्यापाशी शब्द नाहीत, परंतु काही तरी विशेष अशी अनुभूती प्रत्ययास येते. एरव्ही आम्ही म्हापशात शिवजयंती साजरी करतो, यंदा शिवपुण्यतिथी साजरी करायला मिळाली. सगळेच शिवप्रेमी. हजारोंच्या संख्यने- त्यांच्याबरोबर बरे वाटले. समान जाणिवा असल्यावर मनाच्या तारापण लगेचच जुळतात. सर्वांचा शिवाजी महाराजांप्रतीचा आदर ओसंडून वाहत होता. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ ती अशा जयंती-पुण्यतिथीच्याच दिवशी असावी. अन्य किल्ल्यांना पण भेटी देण्याची प्रेरणा जागवली गेली. एवढे चालून-चढून पायात गोळे कसे ते आलेच नाहीत. व्यवस्था चोख होती. समितीला लाख लाख धन्यवाद. मोहन भागवतांना जवळून पाहण्याचा-ऐकण्याचा योग आला, धन्य जाहलो.
देखो मुल्क मराठोंका ये जहॉं शिवाजी डोला था|
बोली हरहर महादेव की, बच्चा बच्चा बोला था|
आम्ही हरहर महादेव, रायगडावर ताठ स्वरात म्हणताना लहानातला लहान झालो. धन्य झालो, कृतार्थ झालो…