धुवॉंधार पावसाचे राज्यात थैमान; जनजीवनावर परिणाम

0
170

गेल्या २४ तासांत धुवॉंधार पावसाने संपूर्ण गोव्यात थैमान घालून झोडपून काढल्याने जनजीवनावर मोठा परिणाम झाला. विविध भागांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या असल्या तरी सुदैवाने जीवितहानी किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र वित्तहानी बर्‍याच प्रमाणात झाल्याचे वृत्त आहे. घरांची भिंत कोसळणे, झाडे उन्मळून वीज तारांवर कोसळणे व वीज पुरवठा खंडीत होणे, दरड कोसळणे, घरांमध्ये पाणी घुसणे यासारख्या घटना राज्यात घडल्याची माहिती ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून मिळाली. २४ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील खाणींवरील महाकाय खंदकांमध्ये गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसाचे पाणी भरल्याने संबंधितांकडून भीती व्यक्त होत आहे. या अनुषंगाने मयेचे आमदार प्रवीण झांटये आज मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटून माहिती देणार असल्याचे वृत्त आहे. खाणींवरील खंदकांच्या कडा ढासळून परिसरातील लोकवस्तीत पाण्याचा लोट घुसण्याचा धोका नागरिक व्यक्त करीत आहेत.

दरडी कोसळल्या
संततधार पावसामुळे देस्तेरो-वास्को, कुडका, आश्‍वे-मांद्रे या तीन ठिकाणी दरडी कोसळल्या असून तेथे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. लाडफेत एका घराची भिंत पावसाच्या पाण्याने फुगून ढासळली. तर मुळगाव येथे घराचे छप्पर कोसळले. डिचोलीतील काही भागात वीज तारांवर झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला.
पणजीत बुधवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० या नऊ तासात ३.२ इंच पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासात फोंडा आणि काणकोण येथे सर्वाधिक ४.४ इंच पावसाची नोंद झाली आहे.

कदंब बसस्थानक, पाटो पार्किंग प्लाझासमोर, कांपाल, मळा, सांतइनेज आदी भागात पावसाचे पाणी रस्त्यावर साचले होते. सांतइनेज तांबडीमाती येथे खाडीच्या साकवावरून पाणी रस्त्यावर येऊन तलावसदृश्य स्थिती झाली होती.
कुडका मोलेभाट येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.

देस्तेरो-वास्कोत दरड कोसळली
वास्को : वास्कोत काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जेटी सडा येथे दरड कोसळण्याची घटना घडली. शाळकरी विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी व नागरिकांची तारांबळ उडाली. काही घरांमध्येही पाणी शिरल्याचे वृत्त आहे. झाडांची पडझड झाली. देस्तेरो येथे रस्त्यावर पाणी भरल्याने पाणी घरात शिरण्याचा प्रकार घडला. काटे बायणा येथे एका रिक्षावर माड कोसळल्याने रिक्षाची हानी झाली. तसेच जेटी सडा येथे लहान दरड कोसळली.

राज्यातील विविध भागात १ जून पासून आत्तापर्यंतचा पडलेला पाऊस – काणकोण – ३०.१ इंच, ओल्ड गोवा – २८.३ इंच, सांगे – २४.८ इंच, वाळपई – २४.३ इंच, मुरगाव – २४.१ इंच, पणजी – २३.९ इंच, फोंडा – २३.९ इंच, मडगाव – २३.७ इंच, दाबोळी – २२.६ इंच, पेडणे – २२.३ इंच, साखळी – १९.९ इंच, केपे – १८.९ इंच, म्हापसा १६.१ इंच पावसाची नोंद झाली आहे.

‘दाबोळी’ वरील १६ विमाने
अन्यत्र वळविली

मुसळधार पावसामुळे काल दाबोळी विमानतळावरील हवाई वाहतुकीवर बराच परिणाम झाला. जोरदार पाऊस व खराब हवामानामुळे देशभरातून आलेली सुमारे १६ विमाने दुपारपासून अन्य ठिकाणी वळवावी लागली, अशी माहिती दाबोळी विमानतळाचे संचालक बी. सी. एच. नेगी यांनी दिली. अन्यत्र वळविलेली विमाने हवामानात सुधारणा झाल्यानंतर गोव्यात परततील, असे नेगी यानी सांगितले.