‘धि गोवा हिंदु’ची शताब्दी

0
151

गोमंतकीयांच्या ठायी ज्या संस्थांविषयी आपुलकी आणि अभिमान पिढ्यानपिढ्या वसत आला आहे, अशांपैकी एक असलेल्या मुंबईच्या ‘धि गोवा हिंदु असोसिएशन’ ने गेल्या शुक्रवारी २४ ऑगस्टला शतक महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केले. म्हणजेच २४ ऑगस्ट १९१९ रोजी स्थापन झालेली ही संस्था पुढील वर्षी २४ ऑगस्टला आपली शताब्दी साजरी करणार आहे. एखाद्या संस्थेचा रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव, हीरक महोत्सव, अमृत महोत्सव असे एकेक यशाचे टप्पे पार करीत आणि नुसते पार करीत नव्हे, तर सतत वर्धिष्णु होत चाललेला असा प्रवास खरोखरच त्या संस्थेशी निगडित समर्पित, निःस्वार्थी आणि चारित्र्यवान कार्यकर्त्यांमुळेच शक्य होऊ शकतो. धि गोवा हिंदु असोसिएशनला असे त्यागी कार्यकर्ते पिढ्यानपिढ्या लाभले म्हणूनच तिचा वेलू असा गगनावेर्‍ही विस्तारत गेला आणि आज प्रत्येक गोमंतकीयासाठी तो अभिमानाचा विषय होऊन राहिला आहे. ज्या काळामध्ये ही संस्था स्थापन झाली तो काळ गोमंतकाच्या सामाजिक उत्थानाचा होता. १९१० साली पोर्तुगालमध्ये राज्यक्रांती झाली आणि तेथे आलेल्या लोकशाहीचे वारे गोमंतकातही थोडे फार वाहू लागले. त्या सुसंधीचा लाभ घेत येथे जागृतीची पहाट अवतरली. ज्ञाती संस्था, सामाजिक संस्था, शिक्षणसंस्था, ग्रंथालये यांची गावोगावी उभारणी सुरू झाली. गोव्याच्या सर्व प्रमुख शहरांमधून आणि गावांमधून चिरंजिवी संस्था याच काळामध्ये उभ्या राहिल्या, ज्या आजही यशोमार्गाने वाटचाल करीत आहेत. त्या काळामध्ये संसाधनांची वानवा होती. संपर्काची साधने नव्हती, परंतु समाजसन्मुख समर्पित कार्यकर्ते होते. त्यांनी आपल्या घामाने ह्या संस्था उभ्या केल्या, सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये यशस्वीपणे चालवल्या. तेव्हा आजच्या सारखी सरकारी अनुदानाची खिरापत नव्हती. पोर्तुगिजांची राजवट होती. तरीदेखील मोठ्या हिंमतीने या संस्था चालवल्या गेल्या, वाढवल्या गेल्या. अशा संस्थांच्या धुरिणांनी किती खस्ता खाल्ल्या असतील, किती कष्ट घेतले असतील याची कल्पनाही करवत नाही. गोमंतकातील हिंदु समाज त्याकाळी सर्व क्षेत्रांत पिछाडीवर होता. साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते, त्याला न्यूनगंडाने ग्रासले होते. त्याच्या अभ्युदयासाठी ही सारी धडपड चालली होती. याच काळात स्वतःच्या उत्कर्षासाठी, शिक्षणासाठी, नोकरीधंद्यासाठी माणसे गोवा सोडून अन्यत्र – विशेषतः मुंबईकडे जाऊ लागली. मुंबईत ख्रिस्ती समाजाने आपल्या गावाकडून येणार्‍या बंधूंसाठी ‘कूड’ पद्धत सुरू केली. त्यातून तो समाज संघटित होत होता. एकजुटीने राहात होता. परंतु मुंबईत येऊन स्थायिक झालेल्या हिंदु कुटुंबांमध्ये अशी एकसंधता नव्हती. त्यामुळे जेव्हा गिरगावात वामनराव रामचंद्र ऊर्फ आबासाहेब केरकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्था स्थापनेसाठी सभा भरली तेव्हा तिला शे – सव्वासे गोमंतकीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. ‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ हे ब्रीद धारण करून या संस्थेची मुहूर्तमेढ त्या सभेत रोवली गेली. गोमंतकीय हिंदू समाजाच्या ‘फॉर द जनरल वेलबिईंग’ स्थापन झालेल्या या संस्थेचा वेलू पुढे कसा विस्तारत गेला ते आज आपल्यासमोर आहेच. खरे तर या संस्थेच्या उभारणीमध्ये सक्रिय असलेले तरुण बहुतांशी सारस्वत ज्ञातीतील होते, परंतु ही संस्था ज्ञातीकार्यापुरती मर्यादित ठेवली गेली नाही. ती सर्व गोमंतकीयांसाठी खुली ठेवण्याची दूरदृष्टी संस्थेच्या आधारवडांनी दाखविली. त्यामुळे या संस्थेने गोमंतकीयांना मुंबईत स्वतःची ओळख दिली, अस्मिता दिली आणि अभिव्यक्तीसाठी मंचही मिळवून दिला. पुढे संस्थेचे स्वतःचे कार्यालय झाले. त्याची काही स्थलांतरे झाली आणि नंतर ‘गोमंतधामा’त ती विसावली. रुग्णचिकित्सा केंद्रापासून संदर्भ ग्रंथालयापर्यंत आणि स्नेहमेळाव्यांपासून सत्कार सोहळ्यांपर्यंत चतुरस्त्र कार्य करणार्‍या या संस्थेने १९५६ साली सुरू केलेला कलाविभाग म्हणजे या संस्थेच्या इतिहासातील कळसाध्याय आहे. कानेटकरांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ लिहिले ते याच संस्थेसाठी. मत्स्यगंधा, लेकुरे उदंड झाली आणि असंख्य उत्तमोत्तम अभिजात नाटकांची निर्मिती करून ह्या कलाविभागाने कीर्ती मिळवली. गोव्यात स्नेहमंदिरसारखा प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून उभा राहिला. संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ आजही अभ्यासकांसाठी मौलिक ठरतात. पैसा, पद, प्रतिष्ठेपायी भल्या भल्या संस्था काही वर्षांतच रसातळाला जात असताना अशी एखादी संस्था दहा दशके आपल्या चौफेर कार्याचा ठसा समाजमानसावर उमटवते ही फार मोठी बाब आहे. अशी ही गोमंतकीयांसाठी ललामभूत असलेली मानाची संस्था शताब्दी वर्षात आहे याची दखल गोमंतकीयांनी आणि विशेषतः गोवा सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. संस्था आता शताब्दी वर्षात पोहोचली आहे, परंतु ही काही कार्याची इतिश्री नव्हे. आता पुढच्या शंभर वर्षांची ध्येयनिश्‍चिती करून आता नव्या पिढीला तिच्याशी जोडले गेले पाहिजे, तर तिचे भविष्यही यापुढेही असेच उज्ज्वल ठरेल!