धार्मिक प्रतिके हल्लाप्रकरण सीबीआयकडे द्या : कॉंग्रेस

0
123

राज्यात धार्मिक प्रतिकांवरील हल्ल्यांचे तपास काम सीबीआय्‌कडे सोपवण्यात यावे, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केली. या अनुषंगाने आपण गृह खात्याला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वरील प्रकरणी पोलिसानी एका व्यक्तीला अटक केली असली तरी त्याच्या अटकेनंतरही राज्यात प्रार्थना स्थळांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केलेली असली तरी याप्रकरणी बरेच काही ऐकू येत असल्याचे नाईक म्हणाले. ज्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे ती व्यक्ती मनोरुग्ण असल्याचेही बोलले जात असले तरी ती व्यक्ती खरोखरच मनोरुग्ण आहे की काय हेही कळणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच हा माणूस एवढी वर्षे का सापडू शकला नव्हता हाही लाखमोलाचा प्रश्‍न असल्याचे ते म्हणाले.
उंदीर-मांजराचा खेळ थांबवा
अल्प संख्यांकांच्याबाबतीत गोवा सरकारने चालवलेला उंदिर-मांजरांचा खेळ सरकारने थांबवावा, अशी मागणीही नाईक यांनी यावेळी केली. जेव्हा एका साध्वीने गोमांस खाणार्‍यांना फासावर चढवायला हवे असे विधान केले होते तेव्हा सरकार गप्प का राहिले? प्रवीण तेगाडिया यांनी जुने गोवेत अल्पसंख्यांकांना उद्देशून राहू-केतू संबोधले तेव्हाही सरकार गप्प राहिले होते, असे नाईक म्हणाले.