धारगळचा आयुर्वेदिक प्रकल्प अडचणीत

0
100

>> भूखंडात तांत्रिक अडचणी

>> आज महत्त्वपूर्ण बैठक

पेडणे तालुक्यातील धारगळ येथे राष्ट्रीय आयुर्वेदिक प्रकल्प उभारण्यासाठी देण्यात आलेल्या जमिनीत तांत्रिक अडचणी असल्याने राज्य सरकारला नवीन भूखंड उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. या भूखंडाच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी आज गुरूवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल दिली.

आयुष मंत्रालयातर्फे राज्यात आयुर्वेदिक संशोधन प्रकल्प उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पात आयुर्वेद, योग, प्राकृतिक चिकित्सालय, शंभर खाटांचे इस्पितळ आणि पदव्युत्तर महाविद्यालय यांचा समावेश आहे. अंदाजे एक हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी धारगळ, पेडणे येथे ५० एकर जमीन मंजूर करण्यात आली आहे.

आरोग्य संचालनालयानेे सदर जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर भूखंडात काही समस्या असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्य सरकारला नवीन भूखंड उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. आयुष मंत्रालयाकडून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. या प्रकल्पासाठी नवीन भूखंड उपलब्ध झाल्यानंतर दोन महिन्यात प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाणार आहे, असेही केंद्रीय मंत्री नाईक यांनी सांगितले.

आयुष मिशन अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात आयुर्वेद इस्पितळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेखाली गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात इस्पितळे उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून मडगाव आणि साखळी येथे इस्पितळ उभारण्यासाठी जमीन उपलब्ध केली जाणार आहे. या इस्पितळांसाठी ६० टक्के निधी आयुष मंत्रालयाकडून दिला जाणार आहे. राज्य सरकारला साडेबारा कोटी रूपये उपलब्ध करण्यात आले आहेत, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले.