धडा घ्या!

0
109

बेतुल – खणगिणीजवळ समुद्रात पर्यटकांना जलसफर घडवणारी बोट बुडून तिघा रशियन महिला पर्यटकांचा झालेला मृत्यू दुर्दैवी तर आहेच, पण पर्यटनक्षेत्रातील बजबजपुरीवर बोट ठेवणाराही आहे. पहिली गोष्ट म्हणजे या पर्यटकांना तथाकथित ‘डॉल्फिन दर्शन’ घडवणारी ही बोट पर्यटनासाठीची बोट नव्हती. मासेमारीसाठीचा परवाना असलेली ही बोट बिनदिक्कत पर्यटक जलसफरीसाठी वापरली जात होती. दुसरी गोष्ट म्हणजे या जलसफरीसाठी पर्यटक नेताना बोटीवर पुरेशी जीवरक्षक जॅकेटस् नव्हती. तिसरी गोष्ट म्हणजे निलोफर वादळाचा इशारा हवामान खात्याने दिलेला असतानाही खवळलेल्या समुद्रात ही बोट तथाकथित जलसफरीसाठी नेण्यात येत होती. या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर ही बेफिकिरीच या पर्यटकांच्या जिवावर बेतली आहे असे म्हणावे लागेल. केवळ बोटमालकावर याचे खापर फोडून आता पर्यटन खात्याला आणि बंदर कप्तानांना मोकळे होता येणार नाही. बोटमालक आणि चालक तर दोषी आहेतच, पण त्याच बरोबर हा सारा गैरप्रकार खपवून घेणार्‍या सरकारी यंत्रणाही तितक्याच दोषी आहेत. मासेमारीचा परवाना असताना पर्यटकांना वाहून नेणारी ही काही एकमेव बोट नाही. अशा कित्येक बोटी मोबोर, केळशीच्याच नव्हे, तर गोव्याच्या विविध किनार्‍यांवरून जलसफरीसाठी निघत असतात. पुरेशी लाईफ जॅकेटस् नसणे हा तर नेहमीचाच प्रकार आहे. बोटींची एकंदर स्थिती, त्यावरील सुरक्षात्मक उपाययोजना याबाबत तर आनंदीआनंदच आहे. सरकारी यंत्रणेने आजवर अशा प्रकारांकडे जे दुर्लक्ष चालवले आहे त्यातूनच ही दुर्घटना घडली आहे. पर्यटन व्यावसायिक आणि सरकारी अधिकारी यांचे साटेलोटे असल्यानेच असे गैरप्रकार चालू दिले जातात असे कोणी म्हटले तर ते गैरवाजवी म्हणता येणार नाही. मुळात पर्यटन खात्याकडून विविध जलक्रीडा व्यावसायिकांचे जे नियमन आणि व्यवस्थापन व्हायला हवे ते होते का याचा विचार व्हायला हवा. केवळ नोंदणी केली की आपली जबाबदारी संपली असे नव्हे, कारण देशविदेशातून लाखोंच्या संख्येने जे पर्यटक गोव्यात मौजमजेसाठी येत असतात, त्यांना या पर्यटन व्यावसायिकांकडून कशी वागणूक मिळते, त्यांची पिळवणूक व लुटालूट होते का, त्यांच्या गोवा भ्रमंतीचा आनंद त्यांना मिळतो की गैरसोयी आणि संबंधितांच्या गैरवर्तनाच्या कटू आठवणी घेऊन ते माघारी जातात याचाही विचार पर्यटन खात्याने केला पाहिजे. दुर्दैवाने पर्यटन खात्याचा सारा भर पर्यटकांची संख्या वाढवण्यावरच दिसतो. त्यांच्यासाठी आजही आपल्या पर्यटनस्थळांवर पुरेशा सोयीसुविधा नाहीत. पार्किंगपासून शौचालयांपर्यंत अनेक गोष्टी अपुर्‍या आहेत. पर्यटन व्यवसायामध्ये दलालांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यांची मुजोरी पर्यटकांना तापदायक ठरते आहे. नुकताच काही पर्यटक टॅक्सीचालकांनी रशियन पर्यटकांच्या एका गटाशी गैरवर्तन करण्याचा प्रकार दक्षिण गोव्यात झाला. असे प्रकार सातत्याने घडत आहेत, पण तरीही सरकार टॅक्सीवाल्यांचीच बाजू घेताना दिसते. टॅक्सीचालक स्थानिक आहेत म्हणून त्यांची मुजोरी चालू द्यायची हे योग्य नाही. पर्यटन व्यावसायिकांना शिस्त आणण्याची आवश्यकता आहे. गोव्यातील लुटालुटीला कंटाळून अनेक पर्यटक कोकणाकडे आणि अन्यत्र वळू लागले आहेत. कोकणचे किनारे गजबजू लागले आहेत. केरळ, कर्नाटकसारखी राज्ये तर पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. असे असताना आपण केवळ पर्यटकांच्या वाढत्या संख्येची गणिते मांडत बसणार आहोत का? पर्यटनाची गुणवत्ता कुठे पोहोचली आहे याचा विचार होणार की नाही? पर्यटकांसाठी स्वच्छता, सुविधा आणि सुरक्षा ही त्रिसुत्री अवलंबिली जावी अशी सूचना आम्ही काही काळापूर्वी केली होती. दुर्दैवाने या तिन्ही आघाड्यांवर काही विशेष घडताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी जोडून सुट्या आल्या, तर पर्यटकांच्या गर्दीने सार्‍या व्यवस्था कोलमडून गेल्या होत्या. पर्यटकांना गोव्यात पुन्हा पुन्हा यावेसे वाटले पाहिजे. सुदैवाने केंद्रातील पर्यटन मंत्री आपल्या गोव्याचेच खासदार आहेत. त्यांचे सर्वतोपरी सहकार्य गोव्याला मिळू शकते. रशियन पर्यटकांच्या बाबतीत घडलेली दुर्घटना हा धोक्याचा इशारा समजून पर्यटन व्यवसायामध्ये शिस्त आणण्यासाठी सरकारने पावले उचलावीत. दुर्घटना कुठेही कशीही घडू शकते, परंतु ती मनुष्यनिर्मित तरी नसावी!