धडा काय घेणार?

0
165

श्रीलंकेत इस्टर संडेच्या पवित्र दिवशी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेमागील भयावह कटकारस्थानाचा तपशील हळूहळू बाहेर येत आहे. या स्फोटांतील मृतांचा आकडा साडे तीनशेची संख्या केव्हाच पार करून गेला आहे आणि गंभीर जखमींची प्रचंड संख्या पाहता हा आकडा आणखी वाढत जाणार आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली. जगभरातील अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आयसिस त्याचे श्रेय घेत असते, परंतु अनेकवेळा आयसिसचा अशा हल्ल्यांत प्रत्यक्ष सहभाग नसतो, मात्र आयसिसपासून प्रेरणा घेतलेल्या ठिकठिकाणच्या दहशतवादी संघटनाच असे हल्ले चढवीत असल्याचे आजवर दिसून आलेले आहे. आयसिसचा इराक आणि सीरियातून खात्मा करण्यात आला, परंतु आपले अस्तित्व कायम आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी अशा हल्ल्यांचे श्रेय ती संघटना घेत असते. श्रीलंकेतील स्फोटमालिकेमागे नॅशनल तौहिद जमात ही स्थानिक सलाफी दहशतवादी संघटना असल्याचे एव्हाना जवळजवळ स्पष्ट झालेले आहे. आत्मघातकी हल्लेखोर देखील श्रीलंकेचेच नागरिक, परंतु विदेशांत शिक्षण घेतलेले उच्च शिक्षित तरुण असल्याचेही तपासात दिसून आलेले आहे. धर्मवेडाने पछाडलेल्या या सैतानांनीच इस्टरच्या दिवशी मृत्यूचे तांडव घडवले. नॅशनल तौहिद जमात ही दहशतवादी संघटना पाच वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या मुस्लीमबहुल पूर्वभागातील कट्टनकुडी गावी स्थापन झाली. तिच्या कारवायांबाबत श्रीलंकेच्या सरकारला माहिती नव्हती असे मुळीच नव्हे. उलट गेल्या जानेवारीत तिच्या वनतविलुआ येथील पंच्याहत्तर एकरांत पसरलेल्या एका नारळीच्या बागेतील दहशतवादी प्रशिक्षण तळावर छापा टाकण्यात आला होता, तेव्हा तेथे शंभर किलो स्फोटके, सहा गॅलन नायट्रोजन, ९९ डिटोनेटर पुरलेले आढळले होते. दहशतवादी कारवायांबाबतची एवढी सज्जता दिसत असूनही श्रीलंकेचे सरकार स्वस्थ का राहिले हा प्रश्नच आहे. त्या छाप्यावेळी अटक झालेल्या संशयितांना एका वजनदार राजकारण्याच्या दबावामुळे सोडून देण्यात आल्याचे आता श्रीलंकेचे एक मंत्री सांगत आहेत. अलीकडेच कतारहून काही लोक श्रीलंकेत परतले. त्यांचा ह्या दहशतवादी कटात सहभाग असल्याचा संशय आहे. नॅशनल तौहिद जमातचा म्होरक्या मुहंमद झहराव ऊर्फ झहराव हाश्मी याचा मेहुणा नौफर मौलवी ह्याने कतारहून येऊन त्या संघटनेची सूत्रे हाती घेतल्याची खबर श्रीलंकेच्या तपास यंत्रणांना होती. एवढे सगळे दुवे जुळत असूनही तपासयंत्रणा स्वस्थ राहिल्या. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तर अशा संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत त्यांना वेळीच सावध केलेले होते. एनआयएने भारतात पकडलेल्या आयसिसच्या हस्तकानेच ह्या कटाची माहिती दिलेली होती. त्याने स्वतः श्रीलंकेतील दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याची कबुली दिलेली होती. एवढी पक्की खबर मिळालेली असताना, केवळ गेल्या दशकभरात श्रीलंकेत काही दहशतवादी कृत्य घडलेले नाही या भ्रमात तेथील सरकार राहिले आणि स्फोटांनंतर आता पस्तावले आहे. न्यूझिलंडमधील ख्रिस्तचर्चच्या मशिदींतील गेल्या पंधरा मार्चच्या हल्ल्याचा सूड म्हणून श्रीलंकेत ही स्फोटमालिका घडवून आणली गेल्याचे त्यांच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे. खरे तर आयसिसच्या दहशतवाद्यांनी यापूर्वीही विविध छोट्या छोट्या देशांतील चर्चेसवर भीषण दहशतवादी हल्ले चढवले आहेत. इंडोनेशिया, फिलिपीन्समध्ये असे हल्ले यापूर्वी झालेले होते. श्रीलंकेतील हल्ल्यांत वापरण्यात आलेली स्फोटके ही लष्करी श्रेणीची स्फोटके आहेत. ती गावठी पद्धतीने तयार केलेली स्फोटके नाहीत. याचाच अर्थ एका मोठ्या सुनियोजित कटकारस्थानातूनच ही स्फोटमालिका घडली आहे. श्रीलंकाच लक्ष्य का याचे उत्तर तसे सोपे आहे. म्यानमारमध्ये तेथील बौद्धधर्मियांनी रोहिंग्यांना पिटाळून लावले, ते द्वेषाचे लोण श्रीलंकेतही पोचले होते. कँडीमध्ये अल्पसंख्याकाच्या वस्तीवर झालेली जाळपोळ व नासधूस, श्रीलंकेतील बहुसंख्य असलेल्या बौद्धांच्या मूर्तींची झालेली मोडतोड यातून वर्णविद्वेषाचे पर्व श्रीलंकेत पुन्हा सुरू झाल्याचे संकेत मिळत होते. एकेकाळी सिंहली आणि तामीळ यांच्यातील संघर्षातून अशाच प्रकारे लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ इलमचा उदय झाला होता. जवळजवळ तीन दशके लंका त्यात होरपळली. शेवटी दहा वर्षांपूर्वी एलटीटीईचा समूळ नायनाट त्या देशाने केला. परंतु सलाफी दहशतवादाची पाळेमुळे रुजत असताना दिसत असूनही त्याकडे झालेले दुर्लक्ष श्रीलंकेला महागात पडले आहे. अशा प्रकारची विषवल्ली भारतातही आहे आणि ती वेळीच ठेचण्याची आवश्यकता आहे. श्रीलंकेतील स्फोटांच्या कटाचे धागेदोरेही भारतात पोहोचले आहेत. पुढील तपासात त्यावर अधिक प्रकाश पडेलच, परंतु आपल्या उंबरठ्यावर झालेल्या या घातपातापासून आपण काय धडा घेणार आहोत हा खरा प्रश्न आहे. श्रीलंकेतील हल्ल्यानंतर गोव्यातील चर्चेसची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात ही सुरक्षा नाममात्र आहे. ओल्ड गोव्याच्या चर्चेसमधल्या रस्त्यावर आजही वाहने सर्रास थांबवलेली दिसतात. ही सारी बेफिकिरी संकटाला निमंत्रण देणारी न ठरो!