धडपडण्याचा गुरूमंत्र : गुरूनाथ पै

0
112

– श्रीकांत कासकर
केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याच्या पणजी येथील पत्रसूचना कार्यालयाचे माजी संपादक व दूरदर्शनचे वृत्तसंपादक गुरूनाथ पै हे नुकतेच आपल्या सेवेतून निवृत्त झाले.
सरकारी – निमसरकारी क्षेत्रात निवृत्ती ही अटळ असते, परंतु सामाजिक जाणिवांबाबत तीव्र संवेदनशील असलेले मन कधीही निवृत्त होत नाही. वाहत्या झर्‍यासारखे स्वच्छ प्रवाही असते. तरलता ज्याच्या जवळ असते त्यांना निवृत्ती हे एक आव्हानच असते. गुरूनाथ पै यांनी हे आव्हान करिअरच्या सुरूवातीपासूनच पेललेले आहे. चौगुलेंच्या मालकीच्या गोमन्तक प्रा. लिमिटेडमध्ये चाळीस वर्षापूर्वी ते दाखल झाले. त्यावेळी संपादक स्व. माधवराव गडकरी यांनी त्यांच्यातील गुण ओळखून त्यांना संधी दिली. गोमन्तकचे कोकणी भावंड ‘दै. उजवाड’ मधून गुरूनाथ यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. त्यांच्या जडणघडणीचा तो काळ होता. पत्रकारीतेत करिअर करता करता आकाशवाणीचे वृत्तसंपादक मनोहर पडते यांनीही त्यांची धडपड ओळखून त्यांना संधी दिली.
आपल्यावर दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावण्यासाठी त्यांनी आपल्या सारखीच करिअरसाठी धडपडणार्‍यांना संधी दिली. यामध्ये स्व. कवी नरेंद्र बोडके, पत्रकार राजू नायक यांना त्यांनी आकाशवाणीवर संधी दिली. आपण हाती घेतलेल्या कामात गुणवत्ता असावी, असा त्यांचा कटाक्ष असे. अनेकांना आपल्या कार्यात, उपक्रमात सामावून घेतले. सरकारी नोकरीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या उमद्या स्वभावाला अनेक मर्यादा पडल्या.
सरकारी चौकटीत राहून त्यांनी आपल्या लोकाभिमुख कार्यपद्धतीने उपक्रम राबविले. त्यांना आपल्या कार्यकाळात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. मानसिक त्रासही सहण करावा लागला. यावेळी त्यांची पत्नी सौ. सुनिता व त्यांच्या दोन्ही मुली शर्वाणी आणि कल्याणी यांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे गुरूनाथ जीवनात यशस्वी झाले.
मुळात त्यांच्यातील इतिहासकार आणि संगीतातील दर्देपण यामुळे संघर्षाचे प्रसंग पेलणे त्यांना कठीण गेले नाही. ‘उजवाड’ मध्ये त्यांच्या पत्रकारितेचा पाया रचला जात असताना त्यांना बाहेरील जग खुणावत होते. माधवराव गाडकरी, वामन राधाकृष्ण यांच्या लेखन आणि कार्यशैलीचे संस्कार त्यांवर होत होते. चौकस, अभ्यासू व जिद्दी स्वाभवामुळे आव्हानात्मक क्षितिजे त्यांना खुणावत होती.
केंद्रीय माहिती खात्याच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. दिल्ली, बेंगळुर व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अधिकारी म्हणून आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटवला. सरकारी योजनांचा अभ्यास करून त्या लोकांपर्यंत विविध माध्यमांतून पोचविल्या. सरकार व जनता यामधील दुवा सरकारी अधिकारी असतो हे त्यांनी आपल्या कार्यपद्धतीने सर्वसामान्य जनमानसावर बिंबवले.
ब्रिटिश राजघटनेत सरकारी अधिकारी म्हणजे लोकसेवक अशी व्याख्या आहे. केवळ सामाजिक कार्यकर्ते लोकसेवक असतात असे नाही, तर अधिकारी हाही लोकसेवक असतो.
लोककल्याणकारी योजनांचा अर्थ लावून लोकांपर्यंत त्या कशा पद्धतीने पोचतील यासाठी प्रयत्न करणे, आपल्या सहकार्‍यांना मदतीस घेऊन त्या पूर्णत्वास नेणे या जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. नोकशाहीवर नेहमीच टीका होते. परंतु त्यालाही गुरूनाथ यांच्यासारखे अपवाद असतात. नोकरशाही समाजभिमुख रहायला हवी, असे म्हणून चालत नाही तर ती दिसायला हवी. एक संवेदनशील अधिकारी आपल्या मूळच्या पत्रकारितेच्या पिंडाला कसा न्याय देऊ शकतो, हेच गुरूनाथांच्या रूपाने दिसून येतेे.
श्री. पै यांनी आपल्या सरकारी नोकरीच्या कार्यकाळात अधिकार्‍यांपासून लोककलावंतापर्यंत अनेकांशी नाते जोडले. म्हणूनच दत्तराज काणेकर या नाट्यकलाकारापासून पैंगीणच्या लोककलावंत महेंद्र फळदेसाई, अजित पैंगीणकरपर्यंत, तर सावंतवाडीचे बबन साळगावकर यांच्यापासून म्हापशाच्या गुरूनाथ नाईक यांच्यापर्यंत सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्तापित केले.
त्यांच्यातील इतिहासकार व संगीतकार प्रशासकीय कारकिर्दीवर मात करू शकला असता. परंतु एक करिअर म्हणून त्यांनी केंद्रीय माहिती सेवा हे आपल्या नोकरीसाठी क्षेत्र निवडले. त्यांंनी इतिहास व संगीत हे छंद म्हणून जोपासले. संघर्षाच्या काळात हेच छंद साथ देतात. हेच छंद त्यांच्या आजवरच्या धडपडीच्या संघर्षाला किनार आहेत.
त्यांच्या गौरव सोहळ्यास येणार्‍या मान्यवरांमध्ये सभापती राजेंद्र आर्लेकर, सुरेंद्र सिरसाट यांचा समावेश आहे. आर्लेकर यांनी कार्यकर्ता म्हणून संघर्ष केला. सुरेंद्र सिरसाट यांनी राजकारण्यात पाऊल ठेवण्यापूर्वी पत्रकारितेत बातमीदार म्हणून काम करतानाही आपल्या कर्तृत्वाचा ठास उमटविला. बातमीदार, शिक्षकापासून ते शिक्षक, नगरसेवक ते सभापतीपदापर्यंत त्यांनी झेप घेतली.
ज्या पेडणे नगरीत हा सोहळा होत आहे त्या नगरीलाही अध्यात्म, इतिहास, संगीत, नाट्यकार्याचा फार मोठा वारसा आहे. पेडण्याचा परिसर हा निसर्ग समृद्ध आणि शांत आहे. या शांततेत गौतमबुद्धांच्या चेहर्‍यावरील शांततेची प्रसन्न व दिलासादायक छटा जाणवते. पेडण्यातील कवी मनोहर नाईक यांनी आपल्या एका कवितेत पेडण्याचे वर्णन हे ‘देवाचे गाव’ म्हणून केले आहे. या कवितेत ते म्हणतात –
मर्गजांच्या राशीवरी
सांडल्या वैदूर्य-माणकांच्या हारी
लगडल्या सुवर्णाच्या सरी
शाखो शाखी
नाना रंग रूपाचे पक्षी
जाती बागडती तृणी-वृक्षी
रोवित जाती
पर्णातृणी सळसळती ॠचा
जळातुनी खळखळती मंजूळ भाषा
निरवताही प्रणवाच्या
भरली ध्वनीने…
असे सुंदर वर्णन या कवितेतून कवी मनोहर नाईक यांनी केले आहे. इथे माडागणिक कवी फुटावा, पाना – फांद्यांतून, नदी – नाल्यातून संगीताचे सूर घुमावेत अशी स्थिती श्रीधर पार्सेकर, भालचंद्र पार्सेकर यांच्या व्हायोलीन – तबल्याचे बोल अजूनही कानांत घुमावेत इतके ताजे. हिराबाई पेडणेकरांचे नाव अजूनही कानात घुमावे इतके ताजे. चिरंजीव संगीत व संघर्षाचीच ही माती आहे. म्हणूनच तर धडपडण्याचा गुरूमंत्र या मातीने दिला आहे. आजचा हा सत्कार त्याचाच भाग!