दोष कुणाचा?

0
289
– माधुरी रं. शे. उसगावकर
शिक्षक विद्यार्थ्यांना नाना उदाहरणे देऊन मोबाइलच्या गैरवापराला आळा घालण्याच्या प्रयत्नात असायचे. डोळ्यांवर ताण येतो. रात्रीच्या वेळी तर अपुर्‍या प्रकाशात मोबाइल वापरू नये असेही सुचवले जायचे. परंतु आजच्या पद्धतीत मोबाइलवर ऑनलाइन क्लासेस चालतात. त्याचा अनिष्ट परिणाम मुलांवर, तरुणाईवर झाल्यास दोष कुणाचा?
बघता बघता २०२० वर्षाचे सहा महिने संपले. हा काळ कोरोना विषाणूच्या महामारीच्या थैमानातून जात आहे. खरं तर जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शालेय वर्षाची सुरुवात होते. पावसाच्या सरींच्या मृद्गंधात शालेय शिक्षणाचा श्रीगणेशा होतो. नवे दप्तर नवा गणवेश परिधान करून शाळेत जाणार्‍या मुलांचे थवेच्या थवे दिसायचे.
आषाढ महिना सुरू झाला. आषाढ पावळ्या बरसत आहेत. झरे झुळझुळू वाहत आहेत. नाले, तळी पाण्याने भरली. निसर्गाचे अद्भुत मनोहारी दृश्य कवीच्या मनाला साद घालते आहे. प्रतिभेला धुमारे फुटत आहेत. अशा या नयनमनोहर दृश्यात माणूस मात्र थांबला आहे.
मुलांचे शैक्षणिक वर्ग प्रत्यक्षात कधी सुरू होतील याचा एकंदरीत परिस्थिती पाहता अंदाज काही बांधता येत नाही. कधी ही भयावह परिस्थिती पालटेल आणि पूर्वीसारखे सर्व व्यवहार पूर्वपदावर कधी येतील, याची रुखरुख लागून राहिली आहे. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून अनेक क्लृप्त्या काढल्या जात आहेत. त्यातून ऑनलाइन शिक्षण प्रणालीने मुलांचा ज्ञानविकास साधायचे सरकारी दरबारात मंजूर झाले. या शिक्षणाला मोबाइल, लॅपटॉप याशिवाय पर्यायच नाही.
आता तर मोबाइलचाच जमाना. शुभेच्छा, संदेश, शुभदिन मोबाइलवरूनच दिल्या-घेतल्या जातात. पोस्टकार्ड, भेटकार्ड यांचे नामोनिशाणही कुठे दिसत नाही. आत्ताच्या या ‘इन्स्टंट’च्या काळात व्हॉट्‌सऍप, ट्विटर, फेसबुक अशा सोशल मिडियातून आपल्या भावना, संदेश दुसर्‍यांपर्यंत पोचवल्या जातात.
पालक मुलांना मोबाइलचा वापर करण्यात धाक घालतात. वर्गात मोबाइल विद्यार्थ्याकडे सापडला तर जप्त केला जातो. पण आता काय? मुलांसाठी तर मोबाइल आता ऑनलाइन वर्गासाठी अपरिहार्य साधन झालं आहे. मुलं आणि त्यांच्या हातात मोबाइल- हेच दृश्य दिसतं. पालकांनी पाल्यांना मोबाइलच्या अतिवापराचे परिणाम विघातक आहे असं वेळोवेळी सांगूनही मोबाइलचा गैरवापर होतच असतो.
शिक्षक विद्यार्थ्यांना नाना उदाहरणे देऊन मोबाइलच्या गैरवापराला आळा घालण्याच्या प्रयत्नात असायचे. डोळ्यांवर ताण येतो. रात्रीच्या वेळी तर अपुर्‍या प्रकाशात मोबाइल वापरू नये असेही मधून मधून सुचवले जायचे. परंतु आजच्या पद्धतीत मोबाइलवर ऑनलाइन क्लासेस चालतात. त्याचा अनिष्ट परिणाम मुलांवर, तरुणाईवर झाल्यास दोष कुणाचा? पालक- शिक्षक मुलांना मोबाइलपासून आता वंचित करू शकत नाहीत आणि मुलं तर याचा गैरफायदा घेण्यास मोकळी. नैतिक मूल्यं या साधनात नाहीत. भविष्यात तरुणाईची नीतिमूल्ये ढासळून तरुणाई बिघडण्याचाच जास्त संशय आहे.
सद्यःस्थितीत पालक अगदी नवजात बालकांना खेळवताना, तोंडी घास भरवताना मोबाइलचा सर्रास उपयोग करतात.
लहानपणापासूनच मोबाइलशी खेळणार्‍या आणि त्याच्या इवल्याशा पडद्यावर दिसणार्‍या आभासी जगातच रमण्याची सवय झालेल्यांना त्यावाचून चैन कसे पडेल? तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत ‘सोशल मिडिया’चं व्यसनच लागलेलं पाहण्यात येतं. मोबाईलमध्ये व्यस्त होण्यात आपण किती वेळ वाया घालवत आहोत याचं भान त्यांना राहत नाही. मैदानी खेळ, बैठे खेळ हे तर दुय्यमच ठरले. चांगली पुस्तकं वाचणं हे तर ज्ञानाचं भांडार, ज्यामुळे उपकारक माहिती मिळते. वाचनाची सवय अंगवळणी पडते. स्वतःची मतं मांडता येतात. विचारांचं आदान-प्रदान होतं. हेच बघा ना- आजकालची किती मुलं वृत्तपत्र वाचतात? त्यांचं मन मोबाइलवरील गेम, चॅट व अन्य ऍप्समध्ये रमलेलं असतं. तासन्‌तास मोबाइलला चिकटून असतात.
आमच्या वेळी मोठमोठ्या पुस्तकाद्वारे इतिहास, भूगोल शिकवला जायचा. सत्याग्रह, लो. टिळक, संभाजी राजे यांच्याबद्दल विचारले तर लगेच उत्तरं मिळायची. आज काय बघण्यास मिळतं… गुगल, यु-ट्यूब यावर माहितीचा खजिना भरलेला असतोच. त्यामुळे पुस्तकांवाचून आजच्या पिढीचे कुठे अडत नाही. बरं, त्यांना त्याचं सोयरसुतक तरी आहे?
आता सारा अभ्यासक्रम बदलला आहे. अभ्यास, शिक्षण ऑनलाइन पद्धत. त्यात मुलांचा काय आणि कितपत दोष! जेव्हा पालकच मोबाइलमध्ये गुंग होतात तिथे बिच्चार्‍या मुलांचे काय? का त्यांच्याकडून अपेक्षा करावी?
विद्यालयात प्राथमिक स्तरावर ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. अर्थात मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा मार्ग अवलंबिला. यात मुलं मोबाइलचा उपयोग कसा करतात यावर त्यांचा विकास अवलंबून आहे. मग तो बौद्धिक विकास असो की मानसिक विकास. पालकांच्या अनुपस्थितीत मुलं मोबाइलचा गैरवापर करण्याची शंका बळावते. कोरोना परिस्थिती कधी आटोक्यात येईल हेही खात्रीपूर्वक सांगितले जात नाही. त्यामुळे हा संक्षिप्त अभ्यासक्रम म्हणजे शिक्षकांसह पालकांसाठी डोकेदुखीच म्हणावी. मुलांना मात्र रान मोकळं. ज्या पालकांना मोबाइल हाताळता येत नाही, त्यांची तर पंचाईतच आहे. कारण मुलांच्या थापांवर त्यांना मूग गिळून गप्प बसावं लागेल. पालकांनी निदान प्राथमिक स्तरावर मोबाइल हाताळण्यास शिकावं, हा यावर तोडगा आहे. जे पालक नोकरीनिमित्त किंवा अन्य कामासाठी बाहेर निघतात त्या मुलांवर अंकुश कसा राहील? हाही तापदायक प्रश्‍न म्हणजे पालकांची सतावणूक. अशा जिकिरीच्या परिस्थितीत काय ठोस निर्णय घ्यावेत, याबद्दल सध्या तरी शासन, शिक्षकवर्ग, पालक यांचे एकमत दिसून येत नाही. समस्या तर सुटेलच पण तोपर्यंत मुलं मोबाइलच्या अधीन. कल्पनाच करवत नाही. तसेच नेटसाठी पालकांना महिन्याकाठी अतिरिक्त खर्च तो वेगळा.
ऑनलाइन शिक्षणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ऍप्सचा आस्वाद घेण्यात मुले वेळ मारून नेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात भरीस भर म्हणून मोबाइलच्या अति वापराने लहान वयात मानदुखी, दृष्टिदोष असे अनिष्ट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतात. त्याशिवाय एकलकोंडेपणा, स्वार्थी वृत्ती या अवगुणांनी मुले हेकेखोर झाली तर? यातून मोबाइलचे विघातक परिणाम कोवळ्या वयात मुलांवर होतात.
लक्षात ठेवण्यासारखे आहे. वेळ सगळ्यांची येते. कारण ज्या मोबाइलला शाळेत बंदी होती तोच मोबाइल आता शाळा चालवतोय! वेळ सांगून येत नाही हेच खरे! वेळेप्रमाणे जो वागतो, सामावून घेतो तोच वेळेवर मात करू शकतो. दोष हा कुणाचा?… असा प्रश्‍न न विचारता आत्मपरीक्षणातच कल्याण आहे.
सद्यःस्थितीत ऑनलाइन शिक्षणप्रणाली विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काढलेला एक पर्याय आहे यावर दुमत नाही. पण परिस्थिती सुधारताच शिक्षक व विद्यार्थी अशी ज्ञानदानाची परंपरा सुरू करणे हितावह आहे. फक्त बौद्धिक विकास म्हणजे शिक्षण नव्हे! शिक्षणाचे मूल्यमापन सर्वांगीण विकासात असते हे नीतिमूल्यांना धरून आहे. शेवटी इथे नमूद करावेसे वाटते- पूर्वपदावरील गुरु-विद्यार्थी शिक्षणप्रणाली अबाधित रहावी. अन्यथा टीव्ही, मोबाइल, संगणकाप्रमाणे कारखान्यातून भावनाशून्य मानवी यंत्रे निघतील. स्वार्थांधाने झपाटलेली आक्रमक पवित्रा धारण केलेली मानवी पिढी निपजेल. अशा दूरगामी परिणामांचा सखोल विचार होणे मुलांच्या आणि एकंदरीत देशाच्या भवितव्यासाठी अनिवार्य आहे.