दोन दशकांनंतर कारगिलच्या आठवणी

0
159
  • कर्नल अभय पटवर्धन

कारगिल युद्धाचा सामरिक उहापोह करणारे खूप लिखाण झाले असले, तरी मानवी दृष्टिकोनातून याबद्दल फार कमी लिहिले गेले आहे. या युद्धात सक्रिय कार्यरत असल्यामुळे मला काही अनुभव आले, माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आणि कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या युद्धातील काही शूरवीर योध्दयांची आठवण काढताना, त्यांना आदरांजली वाहाताना ऊर भरुन आला आहे…

मे ते जुलै १९९९ दरम्यान भारतात अनेकांना आपला पिता, भाऊ, पती, मित्र, सहकार्‍यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप द्यावा लागला. त्यांनी भारताचे, आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना प्राणार्पण केले होते. त्यांच्यासाठी आपले कर्तव्य सर्वश्रेष्ठ होते. देशासाठी हसत हसत कुर्बानी देणे हा सर्वोच्च सन्मान होता. त्यांचे कुटुंबीय, मित्र, सहकारी यांना त्यांची उणीव तर नक्कीच जाणवत असेल, पण गेलेल्यांसाठी अश्रू ढाळण्याऐवजी त्यांनी देशाची अब्रू वाचवण्यासाठी प्राणार्पण केले याचा त्यांना जास्त अभिमान आहे. त्यांच्यासाठी आपल्या आप्तेष्टांच्या तुलनेत, देशरक्षण सर्वोच्च होते आणि या वीरांनी देशासाठी बलिदान केले याचे त्यांना अप्रूप होते व आजही आहे.

कारगिल युद्धात चार परमवीर चक्रांसह एकंदर ११४ वीरता पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. त्यापैकी काही सैनीकांशी माझा परिचय होता, काही मला माहीत होते, काहींबद्दल नंतर कळले. मी भाग घेतलेल्या आणि पाहिलेल्या कारगिल युद्धातील काही शूरवीर योध्दयांची आठवण काढताना, त्यांना दोन दशकांनंतर आदरांजली वाहाताना ऊर भरुन आला आहे.

‘शेरशाहा’ या टोपण नावाने पाकिस्तानी सैनिकांमध्ये ख्याती पावलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा आणि त्याचा बडी, कॅप्टन संजीव जमवालकडून ‘व्हिक्टरी साइन’ मिळाल्यावर कर्नल योगेश कुमार जोशींच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर, वुई विल हॅव टी टुगेदर ऍट पॉईंट ५१४० असा मेसेज, मिशनवर जाण्याआधी या दोन्ही वीरांनी आपल्या कमांडिंग ऑफिसरला दिला होता. पाकिस्तान्यांना मारून अथवा हाकलून ह्या शिखरावर १३ जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्रीच्या सैनिकांनी कब्जा केल्यावर त्यांचे लेहमधील ब्रिगेड हेडक्वार्टर्स आणि दिल्लीतील सेना मुख्यालयात हर्षोल्हासाची लाट उसळली. मी ग्वाल्हेरमधे ब्रिगेड मेजर असताना ही पलटण आमच्या ब्रिगेडमध्ये होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात आपुलकी आहे.
भारतासाठी हा एक ऐतिहासिक विजय होता. पॉईंट ५१४० वरील विजयानंतर तत्कालीन सेनाध्यक्ष जनरल व्ही. पी. मलिक यांनी विक्रम बत्राला स्वतः फोन करून त्याचे अभिनंदन केले आणि विचारले की तुला काय हवंय? यावर विक्रम बात्रा उत्तरला, ‘सर, ये दिल मांगे मोअर!’ आणि हीच त्याची व्हिक्टरी साइन होती. त्याचे हे उत्तर भारताच्या तरुणाईने डोक्यावर घेतले होते.

१७,००० फूट उंचीवर केलेल्या या कारवाईमध्ये एकही जीवीतहानी न होता, त्या शिखरावर घुसखोरी केलेल्या पाकड्यांना, मिशीसुद्धा न फुटलेल्या या कोवळ्या वीरांनी धूळ चारली. ह्या शिखरावर कब्जा केल्यावर पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्याला तोंड देण्यासाठी विक्रम बत्रा व संजीव जमवालला काही दिवस पॉईंट ५१४० वर थांबणे जरुरी होते. तेथे २६ जूनपर्यंत थांबल्यानंतर त्यांची कंपनी पलटण मुख्यालयात ‘रेस्ट अँड रिफिट’साठी आली. त्यानंतर त्यांना पॉईंट ४८७५ वरील हल्ल्याच्या मदतीला जावे लागले. ०५ जुलैला रात्री एक वाजता १३ जॅक अलायनी पॉईंट ४८७५ हस्तगत केले, पण त्यांच्यावर उत्तरेकडील लांबलचक पाकिस्तानी ठाण्यावरून तुफान गोळीबार होत असल्यामुळे तेथे पाय रोवणे मुश्किल होते. ४८७५ वर पूर्ण कब्जा करण्यासाठी उत्तरेकडील त्या पाकिस्तानी ठाण्यावर कब्जा करणे अत्यावश्यक होते. ६ जुलैपर्यंत तो होऊ शकला नाही. त्यामुळे विक्रम बत्राला त्यांच्या मदतीला पाठवण्याचा निर्णय कमांडिंग ऑफिसरला घ्यावा लागला.

कॅप्टन विक्रम व त्याची कंपनी तेथे आल्यामुळे पॉईंट ४८७५ वरील सैनिकांमध्ये नवीन स्फुरण निर्माण झाले. ५१४० वरील त्यांच्या पराक्रमाच्या गाथा तोपर्यंत सर्वदूर पसरल्या होत्या. ‘रेडियो इंटरसेप्शन’च्या माध्यमातून पाक चौकीवरील सैनिकांना विक्रम तेथे पोचल्याची खबर मिळाली. ‘शेरशाहा, उपर तो आ गये हो, पर वापस नाही जाने देंगे. इन्शाल्हा, उपरही भेज देंगे’ असा संदेश त्यांनी भारतीय ठाण्याला दिला. निडर विक्रमनी उत्तर दिले- ‘ठीक समजलो; उपर तो तुम्हे और तुम्हारे साथीयोंको जाना होगा.’

६-०७ जुलैच्या रात्री विक्रमनी हल्ल्यासाठी जाण्याची तयारी केली. प्रचंड थकवा आणि तापामुळे त्याचे डोळे लाल झाले होते. त्याच्या त्या अवस्थेमुळे, कमांडिंग ऑफिसरनी त्याला जाण्याची परवानगी दिली नाही. पण विक्रमनी हट्टच धरला. त्यांचे वर्तन पाहून स्फुरण पावलेल्या अनेक सैनिकांनी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. लेजकडे जाताना विक्रमची देहबोली अचानक बदलली. थकलेल्या, आजारी सैनिकाऐवजी एक नवाच, ‘करो या मरो’ या विचाराने भारलेला नवा विक्रम त्याच्या कंपनीचे नेतृत्व करत होता. मश्कोह खोर्‍यातील अती थंड वारे आगेकूच करणार्‍या त्या सैनिकांच्या हाडात खिळत होते. त्यावेळीच बर्फवृष्टी सुरू झाली. आपल्या थकलेल्या सैनिकांमध्ये जोश भरत विक्रम एखाद्या हिमबिबट्यासारखा चपळाईने लेजकडे सरकत असतानाच त्याला मशिनगनची रॅटरॅट ऐकू आली. त्यांच्या समोर जाण्यावर मशिनगन फायरनी अटकाव केला. विक्रमनी तेथील खडकांच्या मागून लपतछपत जात त्या मशीनगनवर हॅन्डग्रेनेड फेकून तीला बरबाद केले. त्यानंतर आपल्या एके ४७ रायफलनी फायर करत विक्रम शत्रूजवळ पोचला. इतक्या जवळ रायफल फायर करणे अशक्य असल्यामुळे विक्रमनी रायफलवर संगीन (बायोनेट) चढवून तेथील पाकड्यांवर तडक हल्ला चढवला. एका पाक सैनिकाला त्यांनी संगिनीने भोसकून ठार मारले. त्याच्यावर मागून चाल करून आलेल्या दुसर्‍याला धोबीपछाड मारून खाली पडून त्यालाही भोसकले आणि तो लेजवर पोचला. तेथील मशिनगन पोस्टमध्ये दोन पाकी त्यांच्या गनला फीड करत होते, एक गन चालवत होता आणि एक यंग ऑफिसर त्यांना सुपरवाईझ करत होता. विक्रमनी त्या चौघांनाही गोळ्या घातल्या खर्‍या; पण तोही शत्रूच्या गोळ्यांनी जखमी झाला.
तिकडे लेफ्टनन्ट अनुज नायर लेजवरील इतर बंकर्सचा सफाया करत होता. जखमी विक्रम मशिनगन पोस्टमधून बाहेर आला असता त्याने स्फोटात पाय तुटलेल्या लेफ्टनंट नवीन अमबरूला पाहिले आणि तो त्याच्या मदतीला जाऊ लागला. त्याच्याबरोबर असलेल्या सुभेदारांनी ‘तुम्ही जखमी आहात, तुम्ही जाऊ नका, मी जातो’ अस म्हटले असता कॅप्टन विक्रमनी त्याला हुकूम दिला, ‘तू बालबच्चेदार है, हट जा पीछे’ असे म्हणत त्यांनी अनुजला ओढत खडकामागे आणले, पण हे करत असतानाच त्यांच्या छातीला शत्रूच्या गोळ्यांनी घायाळ केले आणि भारतमातेच्या या वीर पुत्राने त्याच जागी आपला देह ठेवला. कॅप्टन विक्रम बत्राला त्याच्या अतुलनीय शौर्याबद्दल परमवीर चक्र (मरणोत्तर) प्रदान करण्यात आले आहे.

युद्धात अनेक विलक्षण गोष्टी घडतात. विक्रम बत्राच्या बलिदानासारखच शौर्य अनेकांनी दाखवले. भारतीय सेना ज्या प्रमाणे स्वतःच्या सैनिकांना वीरता पुरस्कार देते त्याचप्रमाणे शत्रूच्या शौर्यालाही नावाजते. मृत्यूच्या दारात कोणीही का दाखवेना, ते बावनकशी शौर्यच असते. अशाच शौर्य मालिकेतील एक गाथा पाकिस्तानी कॅप्टन कमाल शेरखान, २७ सिंध रेजिमेंटची आहे. पाकिस्तानने त्याचे कलेवर नेण्यास नकार दिला, कारण युद्धबंदीच्या वेळी ते हेच मानायला तयार नव्हते की पाक आर्मीने कारगिलमध्ये भाग घेतला होता. युद्धबंदीनंतर जवळपास दोन महिन्यांनी आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसच्या मध्यस्थीने पाकिस्तानने आपल्या मृत सैनिकांची दफन केलेली कलेवरे परत घेतली. मात्र हे सैनिक नव्हेत तर मुजाहिद्दीनच आहेत यावर पुढील १२ वर्षे पाकिस्तान ठाम राहिला.

विक्रम बत्राच्या असीम शौर्याची गाथा सांगितल्यानंतर, अशा वीरांच्या कुटुंबियांना आपल्या या सुपुत्रांबद्दल, मित्रांबद्दल, पतीबद्दल, पित्याबद्दल कसा व किती अभिमान वाटतो, त्यांच्या मनात कोणत्या भावना असतात या मानवी पैलूवरही नजर टाकणे आवश्यक आहे.

कारगिलहून परत आल्यावर कॅप्टन विक्रम बत्रा आपली बालपणीची मैत्रीण, डिम्पल चीमाशी लग्न करणार होता; पण त्या आधीच त्याला देवाकडे जावे लागले. त्याच्या बरसीला आपल्या मित्राबद्दल असलेल्या भावना प्रगट करताना मिस चीमा म्हणतात; ‘‘नॉट ए सिंगल डे, आय फेल्ट डिटॅच्ड फ्रॉम यू. आय फील सो प्राऊड व्हेन पीपल टॉक अबाउट युवर अकम्प्लिशमेंट्स. बट अलॉन्ग विथ दॅट, देअर इज सम रिग्रेट इन द कॉर्नर ऑफ माय हार्ट. यू शुड हॅव बीन हियर; शेअरिंग, लिसनिंग टू स्टोरीज ऑफ युवर ब्रेव्ह डीड्स, ऑफ हाऊ यू आर इन्स्पिरेशन फॉर युथ ऑफ टू डे. आय नो इन माय हार्ट दॅट वुई आर गोइंग टू मीट अगेन, इट्स जस्ट ए मॅटर ऑफ टाइम.’’
राजपुताना रायफल्सचा कॅप्टन विजयन्त थापर धारातीर्थी पडला, त्यावेळी केवळ २२ वर्षांचा होता. त्याच्यामुळेच भारताला तोलोलिंगवर तिरंगा फडकवता आला. त्याला त्याच्या अतुल शौर्याबद्दल महावीर चक्र (मरणोपरांत) प्रदान करण्यात आले. त्याचे वडील कर्नल विजेंद्र थापर २०१६ मध्ये १६, ००० फुटांवर असलेल्या शिखरावर गेले, जिथे विजयन्तनी शत्रूशी लढताना आपला देह देशार्पण केला. युद्धात डोळ्याला इजा झाल्यामुळे आपल्या उजव्या डोळ्यावर हिरव्या रंगाची कापडी झापड लावलेले कर्नल विजेंद्र थापर नेहमी इंग्लिश चलचित्रवाहिन्यांच्या चर्चांमधे दिसतात. आपल्या मुलाबद्दल बोलताना त्यांचे डोळे भरून येतात.

राजपुताना रायफल्सचे मेजर पद्मपाणी आचार्या, टायगर हिलवर लढताना धारातीर्थी पडले, त्यावेळी त्यांची पत्नी गर्भवती होती. २१ जूनला पद्मपाणी आपल्या घरच्यांशी फोनवर बोलले. पण यानंतर त्यांचा आवाज कधीच आपल्या कानी पडणार नाही याची त्यांच्या कुटुंबियांना तीळमात्र कल्पना नव्हती. मेजर पद्मपाणी आचार्यांना महावीरचक्र या वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शीख रेजिमेंटच्या लान्सनायक निर्मल सिंग वीर चक्र यांच्या गणवेशाच्या आधारे त्यांच्या पत्नी, जसविंदर कौर आपले दिवस काढताहेत. टायगर हिलवर निर्मल सिंगनी देशासाठी आपले प्राण द्यायला मागेपुढे पाहिलं नाही. त्यावेळी जसविंदर कौरचे लग्न होऊन केवळ पाचच वर्षे झाली होती. त्यांचा पुत्र निर्जस सिंग फक्त तीन वर्षांचा होता. आज तो आर्मीत लेफ्टनन्ट आहे. जसविंदर कौर निर्मल सिंगच्या गणवेशाला ममतेने कुरवाळत असतात.

कारगिल युद्धाच्या सुरवातीला बटालिक शिखराचे रक्षण करताना मेजर मरिअप्पन सर्वांनन (वीरचक्र) ला २९ मे १९९९ ला वीरगती प्राप्त झाली. कारगिल युद्धातील हा पहिला बळी होता. यांना ‘हिरो ऑफ बटालिक’ म्हणतात. त्याचे पार्थिव एक महिन्यापेक्षा जास्त दिवस बर्फामध्ये पडून होते. भारतीय सैनिक त्याचे पार्थिव घेण्यासाठी काही हालचाल करताच पाकिस्तान गोळीबार करत असे आणि पाकिस्तानने त्यांचे कलेवर नेण्याचा प्रयत्न करताच भारतीय सैनिक गोळीबार करत असत. मृत्यूनंतर ४१ दिवसांनी त्यांचे पार्थिव भारताला मिळू शकले. आपल्या मुलाच्या शेवटच्या भेटीची आठवण काढतांना त्याच्या मातोश्री श्रीमती अमिथावल्ली मॅरिअप्पन अत्यंत भावूक होतात.

१८ ग्रेनेडियर्सच्या मेजर राजेश अधिकारी (महावीर चक्र)चे लग्न कारगिल युद्धाच्या केवळ दहाच महिने आधी झालं होतं. कारगिलला जाण्याचा आदेश मिळाल्यावर त्याला प्रचंड अभिमान वाटला आणि तो उत्साहाने सळसळून गेला. आपल्या एका पत्रात त्यांनी पत्नी किरनला लिहिले की तो परत येईल की नाही याची खात्री देता येत नाही. किरण त्यावेळी गर्भवती होती. पण तिने त्याला उत्तर पाठवले. राजेशला ते पत्र मिळाले तेव्हा तो मिशनवर जाण्याची तयारी करत होता आणि त्यांनी विचार केला की मिशनहून परत आल्यावर आरामात पत्र वाचू, त्याची पारायणे करू. मात्र त्याला ते शेवटचे पत्र वाचायची संधीच मिळाली नाही. किरन त्या पत्रात लिहिते, ‘तू परत आलास तर मला निश्‍चितच आनंद होईल; पण तू परतला नाहीस तर मी शहिद पत्नी म्हणून अभिमानाने आयुष्याची गुजराण करेन.

अशा अनेक गाथा ऐकताना डोळे पाणावतात व ऊर भरून येतो. भारताच्या तरुण, मिसरूडही न फुटलेल्या, २० ते ३५ वर्षांच्या ५२७ शूरवीरांनी अतिशय प्रतिकूल वातावरणात, हाती असलेल्या शस्त्रांनी लढा देत आपल बलिदान देतांना, कारगिलमधल्या १४-१७५०० फुटांवरील ठाण्यावर सफलतापूर्वक कब्जा केला आणि तेथे घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैनिकांना संपूर्णतः हाकलून लावले होते. त्यांच्या या स्फूर्तिदायक स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक २७ जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. आजवर कारगिल युद्धाचा सामरिक उहापोह करणारे लिखाण खूप झाले असले तरी मानवी दृष्टिकोनातून या युद्धाबद्दल फार कमी लिहिले गेलेले आहे. कारगिल युद्धात सक्रिय कार्यरत असल्यामुळे मला काही अनुभव आले, माहिती मिळाली. त्या अनुषंगानं आणि कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण होताहेत, त्या निमित्ताने वीरांना भावपूर्ण आदरांजली देतो, कारण सोल्जर्स नेव्हर डाय, दे जस्ट फेड अवे…