दोघांचे बळी घेणार्‍या बसचा परवाना ३ महिने निलंबित

0
125

येथील कदंब बसस्थानकावर १७ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ७ च्या सुमारास चुकीच्या दिशेने आणि बेशिस्तपणे प्रवासी मिनिबस चालवून अन्य एका प्रवासी बसमधून उतरणार्‍या दोघांचे बळी घेणार्‍या खासगी प्रवासी सिटी मिनिबसचा (क्र. जीए ०७ एफ १७९२) परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे,
यासंबंधीचा आदेश उत्तर गोव्याचे साहाय्यक वाहतूक संचालक नंदकिशोर आरोलकर यांनी १० एप्रिलला जारी केला आहे. ११ एप्रिल २०१८ ते १० जुलै २०१८ या कालावधीसाठी या मिनिबसचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. परवाना निलंबनाच्या काळात मिनिबस परवानाधारकाच्या निवासस्थानी पार्क करून ठेवावी. वाहतूक अधिकार्‍याच्या लेखी परवानगीविना पार्क करून ठेवलेली मिनिबस अन्यत्र हालवू नये, असे साहाय्यक वाहतूक संचालक आरोलकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

येथील कदंब बसस्थानकावर १७ फेब्रुवारीला सकाळी ७ च्या सुमारास पणजी ते ताळगाव या प्रवासी मार्गावर वाहतूक करणारी खासगी प्रवासी सिटी मिनिबसच्या चालकाने चुकीच्या दिशेने भरधाव बस चालवून बसस्थानकावर पार्क केलेल्या एका खासगी प्रवासी बसमधून उतरणार्‍या पाच प्रवाशांना ठोकरले. या अपघातात दोघांचे निधन झाले, तर तिघे जखमी झाले होते. या प्रकरणी पणजी पोलिसांनी सदर मिनी बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणे बसगाडी चालविल्याचा गुन्हा दाखल असून बस चालक सलीम महमद अली (२८ वर्षे, कुडचडे) याला अटक करून त्याची जामिनावर सुटका झाली आहे.

वाहतूक खात्याने या अपघाताची गंभीर दखल घेऊन मिनी बसचा मालक एव्हीरिस्टो डायस (कंरजाळे पणजी) याच्यावर नोटीस बजावून मिनी बसचा परवाना रद्द किंवा निलंबित का करू नये ? याबाबत स्पष्टीकरण करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणी वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांनी बसमालकाचे म्हणणे ऐकून घेतले. बसमालकाने अपघात झाल्याचे मान्य केले. तसेच अपघाताची जबाबदारी जबाबदारी स्वीकारली. नंतर साहाय्यक वाहतूक अधिकारी आरोलकर यांनी कारवाईचा आदेश जारी केला आहे.