दैनिक नवप्रभा मोबाईल ऍपचे मुख्यमंत्र्यांहस्ते अनावरण

0
258

दैनिक नवप्रभाने आपले मोबाईल ऍप विकसित केले असून त्याचे अनावरण गोव्याचे मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल करण्यात आले. यावेळी दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू, नवहिंद पेपर्स अँड पब्लिशर्सचे सरव्यवस्थापक प्रमोद रेवणकर व माहिती तंत्रज्ञान उपव्यवस्थापक विजयानंद नाईक उपस्थित होते.

यावेळी श्री. नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना नवप्रभा मोबाईल ऍपच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
नवप्रभेच्या या मोबाईल ऍपद्वारे मुख्यतः गोव्याबाहेरील व विदेशस्थ गोमंतकीय वाचकांना गोव्याशी संबंधित बातम्या वाचण्याची सोय सहजतः उपलब्ध होणार असून त्यांची फार काळची मागणी पूर्ण होणार आहे.
नवप्रभेतील बातम्या, लेख, अग्रलेख, आयुष, कुटुंब, अंगण आदी पुरवण्यांतील मजकूर आणि नवप्रभेचा ईपेपरही त्यावर उपलब्ध करून दिला गेला आहे. नवप्रभेचे हे मोबाईल ऍप गुगल अँड्रॉईडच्या प्रणालींवर व आयओएसवर चालू शकेल. त्यासाठी ते गुगल प्ले स्टोअरवर व ऍपल ऍप स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हे ऍप जाहिरातींधारित असल्याने पूर्णतः मोफत असून त्यावर नवप्रभेतील मजकूर शेअर करणे, तसेच ब्रेकिंग न्यूज अलर्टस्‌चीही सुविधा आहे. मजकुराचा आकार कमी जास्त करण्याची सोयही देण्यात आली असून गोवा ३६५ वृत्तवाहिनीचे लाईव्ह स्ट्रिमिंगही तेथे पाहता येईल.
नवप्रभाची वेबसाईट, ईपेपर व फेसबुक पेज वाचकांमध्ये लोकप्रिय असून या मोबाईल ऍपलाही असाच उत्साही प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.