दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी होणार ?

0
108

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या येत्या आठवड्यात होणार्‍या बैठकीत दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचार होणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील ही बैठक १० नोव्हेंबरला होणार आहे. ही चर्चा सकारात्मक झाली तर २८ वरून १८ टक्के जीएसटी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापार्‍यांना बराच दिलासा मिळू शकेल.

हाताने बनवलेले फर्निचर, प्लास्टिक उत्पादने, शाम्पू आदी वस्तूंवरील कराचा फेरविचार या बैठकीत केला जाणार आहे. दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू २८ टक्के जीएसटी लावल्याने महाग झाल्या आहेत. लघु आणि मध्यम उद्योजकांचे यामुळे खूप नुकसान होत आहे. परिणामी जीएसटी परिषद अशा जीएसटीचा मोठा फटका बसलेल्या उद्योगांतील करप्रणाली तर्कसंगत बनवण्यासाठी काम करत आहे. या उद्योगांना जीएसटी येण्याअगोदरपासूनच मूल्यवर्धित कर, उत्पादन शुल्कातली दरात सूट आदी गोष्टींमुळे त्रास सहन करावा लागत होता.

जीएसटी १ जुलैपासून लागू झाला आहे. तेव्हापासून दर महिन्याला जीएसटी परिषद बैठक घेते. जीएसटी लागू झाल्यानंतर त्यात अनेक ग्राहकधार्जिणे बदल करण्यात येत आहेत. सरसकट सर्व प्रकारच्या फर्नीचरला २८ टक्के जीएसटी लागू केला गेला.तसाच प्लास्टिक उत्पादनांवरदेखील २८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.

जीएसटी कमी होणार्‍या वस्तू
हाताने तयार करण्यात आलेले लाकडी फर्निचर, प्लास्टिकची उत्पादने, शॉवर बाथ, शँपू, सिंक, वॉश बेसिन, सीट आणि सीट कव्हर, इलेक्ट्रीक स्विच. या आणि इतर अशा वस्तू ज्यांच्यावर २८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे, तो कमी करण्यावर १० नोव्हेंबरच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते आहे. ज्या उद्योगांना २८ टक्के जीएसटीचा फटका बसला आहे त्या सगळ्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. सध्या २८ टक्के असलेला जीएसटी जर १८ टक्क्‌यांवर आला तर निश्चितच व्यापारी, उद्योजक आणि जनतेला दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.