देशाप्रती असलेली निष्ठा म्हणजेच देशभक्ती

0
155

>> रा. स्व. संघाच्या सोहळ्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची स्पष्टोक्ती

अखेर कॉंग्रेससह अन्य विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या विरोधी प्रतिक्रियांची तमा न बाळगता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोहळ्याला ठरल्यानुसार उपस्थिती लावून आपल्या भाषणात प्राचीन भारतीय संस्कृतीपासून भारतीय स्वातंत्र्य लढ्यापर्यंतचे दाखले देत आपले विचार मांडले. देशाप्रती असलेली निष्ठा म्हणजेच देशभक्ती असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. असहिष्णुतेमुळे देशाची ओळख धूसर बनते. सहिष्णुतेतच भारताची ताकद आहे असे मत त्यांनी मांडले.

संघाच्या या सोहळ्याचे निमंत्रण मुखर्जी यांनी स्वीकारल्यापासून विविध माध्यमातून वाद विवाद सुरू झाले होते. संपूर्ण राजकीय जीवन कॉंग्रेस पक्षात घालवले असल्याने तसेच संघाविरोधात प्रखर वक्तव्ये याआधी राजकारणात सक्रीय असताना केली असल्याने अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या या निर्णयाबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले होते. प्रत्यक्ष त्यांचे सुपुत्र व कन्या शर्मिष्ठा यांनीही त्यांच्या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर रेशीमबाग येथील संघाच्या मुख्यालयातील या सोहळ्यात मुखर्जी काय बोलतील याची देशभरात उत्सुकता निर्माण झाली होती. या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांनी तेथील स्मृती मंदिराला भेट देऊन तेथील पुस्तिकेत संघ संस्थापक स्व. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना भारत मातेचे महान सुपुत्र असे संबोधले.

भाषणाच्या प्रारंभी आपण राष्ट्रवाद व देशभक्ती यावर बोलणार असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले. आपल्या भाषणात मुखर्जी यांनी भारतीय संस्कृतीची महानता वर्णन करतानाच देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेल्यांचे गुणगान केले. मात्र या भाषणात त्यांनी टीकाकारांची दखलही घेतली नाही.

विविधता हीच ताकद
आपल्या प्रभावी ओघवत्या भाषणात प्रणवदांनी सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य यांच्यापासून महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंतचे दाखले दिले. विविधता हीच भारताची ताकद असून देशात विविधता असूनही आपण सगळे भारतीय आहोत ही बाब आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवते याकडे त्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवाद ही देशाची ओळख असून धर्मनिरपेक्षतेशिवाय देशाला पर्याय नाही असे ते म्हणाले.

असहिष्णुतेमुळे देशाची ओळख होते धूसर
राष्ट्रवाद हा कोणत्याही भाषा, जात, रंग किंवा धर्म यांच्याशी निगडीत नसतो. तर असहिष्णुतेमुळे देशाची ओळख धूसर होऊ लागते. प्रत्येकाने देशाबद्दल खरी निष्ठा बाळगणे हीच खरी देशभक्ती आहे. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यात अनेकांचे योगदान होते. १९५० मध्ये तयार झालेल्या संविधानामुळे राष्ट्रीय भावना दृढ होते. देशातील विविधता व एकता यातच आपल्या देशाचे सौंदर्य आहे असेही त्यांनी नमूद केले.

समाधानाच्या तक्त्यात भारत मागे
देशाने आता हिंसाचार व संघर्षापासून शांती व समाधानाच्या दिशेने मार्गक्रमण करायला हवे. गतीमान अर्थ व्यवस्थेचा देश म्हणून भारत आज जरी पुढे जात असला तरी समाधानाच्या तक्त्यावर भारत खाली आहे याकडे मुखर्जी यांनी लक्ष वेधले.

मुखर्जींना निमंत्रणाचा
वाद निरर्थक ः भागवत
त्याआधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी डॉ. हेडगेवारांच्या आठवणी सांगितल्या. भारताचे भाग्य बदलणे हे केवळ संघाचेच नव्हे तर देशातील अनेकांचे ध्येय आहे. प्रणव मुखर्जी व संघाची विचारधारा वेगवेगळी आहे. ते ज्ञानी व आदरणीय व्यक्तीमत्व असून विचारांचे आदान प्रदान व्हावे म्हणून त्यांना निमंत्रण दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुखर्जी यांनी या सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर निर्माण झालेला वाद निरर्थक आहे. यानंतरही मुखर्जी हे मुखर्जीच राहतील व संघ हा संघच असेल असे भागवत म्हणाले.