देशात कोविड-१९ नियंत्रणाखाली

0
187

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशभरात राबविलेल्या प्रभावी लॉकडाऊनच्या अंमलबजावणीमुळे देशभरातील कोरोना विषाणूचा फैलाव नियंत्रणाखाली असल्याची माहिती काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारने राबविलेल्या या संदर्भातील प्रभावी उपाययोजनांमुळे स्थिती नियंत्रणाखाली येऊ शकली असल्याचे सांगण्यात आले.

केंद्र सरकारने विविध ११ गट तयार केले असून आरोग्य सुविधा निर्मिती, अर्थ व्यवस्था पूर्वपदावर आणणे, लॉकडाऊन उठविल्यानंतर लोकांचे त्रास कमी होतील याकडे लक्ष देणे अशा उपाययोजना हाती घेतल्या जातील असे यावेळी नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले. वरील गटांचे ते अध्यक्ष आहेत.

पॉल यांनी यावेळी सांगितले की, कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीमुळे भारतातील कोविड-१९ च्या फैलावर नियंत्रण आले आहे. ते म्हणाले, ‘जर आम्ही २१ मार्च रोजीची आकडेवारी पाहिली तर त्यावेळी कोरोना बाधितांची संख्या दर तीन दिवसांनंतर दुप्पट होत असल्याचे आढळून आले होते. मात्र त्यानंतर लॉकडाऊन कडक केल्यानंतर त्या प्रमाणात प्रभावी नियंत्रण आले आहे. ६ एप्रिलपासून या प्रमाणात घट झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय अत्यंत योग्य वेळी घेतल्याने हे शक्य झाल्याचे पॉल म्हणाले.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक एस. के. सिंग यांनी सांगितले, की ९.४५ लाख संशयित कोरोनाबाधितांवर सध्या योग्य पद्धतीने टेहळणी सुरू आहे.