देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत

0
143

>> मोदींचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर

देशाच्या घसरत्या आर्थिक स्थितीवरून टीकेची झोड उठवणार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पहिल्यांदाच चोख प्रत्युत्तर दिले. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत असून मागच्या सरकारमध्ये अशी स्थिती तब्बल ७ वेळा आली होती. विकासदरही अनेकदा खालच्या पातळीवर गेला होता. तसेच युपीए सरकारच्या काळात आणि गेल्या तीन वर्षांत एकाच मापाने जीडीपी मोजण्यात आला. त्यामुळे देशवासीयांनी विनाकारण घाबरून जाण्याची गरज नाही, असे मोदी यांनी सांगितले.

कॉंग्रेसच्या काळात सहा वर्षांत आठ वेळा विकास दर ५.७ टक्क्यांपर्यंत खाली आला होता, अशी आठवण करून देत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. गेल्या काही दिवसांपासून ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर टीका होत आहे. कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. तर वाजपेयी सरकारच्या काळात अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनीदेखील मोदी सरकारला खडे बोल सुनावत ‘घरचा आहेर’ दिला होता.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आपल्या भाषणात मोदींनी सरकारने केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मुद्देसूदपणे कॉंग्रेस सरकारने शेवटच्या तीन वर्षांत आणि मोदी सरकारच्या पहिल्या तीन वर्षांत केलेल्या कामांमधील फरक दाखवून दिला. केंद्र सरकारने रस्ते आणि महामार्गाच्या निर्मितीमध्ये १ लाख ८३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. लोहमार्गांचा विकासही दुप्पटीने केला जात आहे. कॉंग्रेस सरकारने शेवटच्या तीन वर्षांत १,३०० किमी रेल्वेमार्गांचे दुहेरीकरण केले. मात्र, आम्ही गेल्या ३ वर्षांत २,६०० किमी रेल्वेमार्गांचे दुहेरीकरण केले, असे त्यांनी सांगितले.