दुसरी वनडे भारताच्या खिशात!

0
115

>> युजवेंद्र चहलचे पाच बळी

भारताने दक्षिण आफ्रिकेला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात ९ गडी राखून धूळ चारत सहा सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेले ११९ धावांचे सोपे आव्हान भारतीय संघाने अवघ्या २०.३ षटकांमध्ये पूर्ण करत तब्बल १७७ चेंडू राखून विजयाला गवसणी घातली. भारताकडून खेळताना शिखर धवनने सर्वाधिक नाबाद ५१ धावांची आणि कर्णधार विराट कोहलीने ४६ धावांची नाबाद खेळी केली.

युजवेंद्र चहल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या सामन्यातील नायक ठरला, तर कुलदीप यादवनेही त्याला चांगली साथ दिली. चहल-कुलदीपच्या फिरकीपुढे आफ्रिकेचा अख्खा संघ ११८ धावांत गारद झाला. आफ्रिकेच्या सात फलंदाजांना तर दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. या सामन्यात चहलने सर्वाधिक ५ गडी बाद करत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शनाची नोंद केली. चायनामन कुलदीप यादवन ३ बळी घेत द. आफ्रिकेचे कंबरडे मोडण्यात त्याला सुरेख साथ दिली. भुवनेश्वर आणि बुमराहने प्रत्येकी १ बळी घेत आपले योगदान दिले.

धावफलक
दक्षिण आफ्रिका ः हाशिम आमला झे. धोनी गो. भुवनेश्‍वर २३, क्विंटन डी कॉक झे. पंड्या गो. चहल २०, ऐडन मारक्रम झे. भुवनेश्‍वर गो. कुलदीप ८, जेपी ड्युमिनी पायचीत गो. चहल २५, डेव्हिड मिलर झे. रहाणे गो. कुलदीप ०, खाया झोंडो झे. पंड्या गो. चहल २५, ख्रिस मॉरिस झे. भुवनेश्‍वर गो. चहल १४, कगिसो रबाडा पायचीत गो. कुलदीप १, मॉर्ने मॉर्कल पायचीत गो. चहल १, इम्रान ताहीर त्रि. गो. बुमराह ०, तबरेझ शम्सी नाबाद ०, अवांतर १, एकूण ३२.२ षटकांत सर्वबाद ११८
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ५-१-१९-१, जसप्रीत बुमराह ५-१-१२-१, हार्दिक पंड्या ५-०-३४-०, युजवेंद्र चहल ८.२-१-२२-५, कुलदीप यादव ६-०-२०-३, केदार जाधव ३-०-११-०

भारत ः रोहित शर्मा झे. मॉर्कल गो. रबाडा १५, शिखर धवन नाबाद ५१, विराट कोहली नाबाद ४६, अवांतर ७, एकूण २०.३ षटकांत १ बाद ११९
गोलंदाजी ः मॉर्ने मॉर्कल ४-०-३०-०, कगिसो रबाडा ५-०-२४-१, ख्रिस मॉरिस ३-०-१६-०, इम्रान ताहीर ५.३-०-३०-०, तबरेझ शम्सी ३-१-१८-०

चहलच्या फिरकीचे वर्चस्व
दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ विकेट घेणारा युजवेंद्र चहल हा एकमेव फिरकीपटू ठरला आहे. तसेच २२ धावांत ५ विकेट घेत फिरकीपटूद्वारे आफ्रिकेत दुसर्‍या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी त्याने काल केली. सर्वोत्तम कामगिरी दक्षिण आफ्रिकेच्या निकी बोये (२१-५) याच्या नावावर आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानच्या वसिम अक्रमने १६ धावा देत ५ विकेट घेतल्या होत्या. वसिम अक्रमनंतर एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेविरुद्ध चहलची ही दुसर्‍या क्रमांकाची कामगिरी आहे.

मायदेशातील नीचांकी धावसंख्या
एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेला मायदेशात सर्वांत कमी धावसंख्येवर बाद होण्याची नामुष्की काल ओढवली. भारताने त्यांचा डाव ११८ धावांत संपवला. यापूर्वी २००९ साली इंग्लंडविरुद्ध पोर्ट एलिझाबेथ येथे ११९ धावांवर त्यांचा संघ बाद झाला होता. मायदेशातील ही त्यांची नीचांकी धावसंख्या होती. एकूण विचार केल्यास द. आफ्रिकेने काल आपली आठव्या क्रमांकाची सर्वांत कमी धावसंख्या नोंदविली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९९३ साली द. आफ्रिकेचा संघ ६९ धावांवर व २००८ साली इंग्लंडविरुद्ध ८३ धावांवर ऑलआऊट झाला होता.

केवळ २ धावांसाठी ‘लंच’
दक्षिण आफ्रिकेचा डाव ३३व्या षटकात आटोपल्यानंतर काही मिनिटांचा ब्रेक घेऊन भारताच्या डावाला सुरुवात झाली. लक्ष्य लहान असल्याने भारताचा डाव संपून ‘लंच’ घेणे अपेक्षित होते. यामुळे पंचांनी जेवणाच्या नियोजित वेळेनंतर अतिरिक्त १५ मिनिटांचा कालावधी दिला. परंतु, या वेळेतही भारताला विजय मिळविण्यात अपयश आल्यामुळे पंचांनी ‘लंच’ची घोषणा केली. यावेळी भारताला विजयासाठी केवळ २ धावांची आवश्यकता होती. पंचांच्या या निर्णयामुळे दोन्ही कर्णधारांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे केवळ २ धावा करण्यासाठी ‘लंच’नंतर पुन्हा मैदानावर उतरण्याची पाळी धवन-विराटवर तसेच संपूर्ण द. आफ्रिका संघावर आली.