दुबेचा खात्मा

0
207

गेले काही दिवस अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेला कानपूरचा कुख्यात गुंड विकास दुबे याच्या कालच्या एन्काऊंटरद्वारे उत्तर प्रदेश पोलिसांनी आपल्या आठ सहकार्‍यांच्या हत्येचा यथायोग्य सूड उगवला असे म्हणायला हरकत नाही. आपल्याला पकडायला आलेल्या पोलीस पथकावर एखाद्या हिंदी चित्रपटातल्याप्रमाणे दुबेच्या गुंडांनी घराच्या छतावरून गोळीबार करून त्यांची निर्घृण कत्तल केली होती. त्यानंतर त्याच्या शोधार्थ पंचवीस पोलीस पथके तैनात केली गेली, त्याच्यावर पाच लाखांचे इनाम ठेवण्यात आले, माग काढण्यासाठी जवळजवळ पाचशे मोबाईल फोन कॉलची छाननी करण्यात आली, पाच साथीदारांना यमसदनी पाठवले गेले, नऊ जणांना अटक झाली, जवळजवळ ऐंशी लोकांविरुद्ध एफआयआर दाखल झाला, दुबेचे हस्तक असल्याच्या संशयावरून ६८ पोलिसांच्या बदल्या झाल्या आणि शेवटी मध्य प्रदेशमध्ये उज्जैनच्या महाकालाला शरण गेलेल्या विकास दुबेला त्या मंदिराबाहेरच पकडण्यात आले. मात्र, उज्जैनहून कानपूरला नेत असता वाटेत पोलीस ताफ्यातील वाहनाला काल पहाटे झालेला ‘अपघात’ आणि त्यानंतरचे एन्काऊंटर याने या कहाणीला वेगळा आयाम दिला आहे.
दुबेने खरोखर पळून जाण्याचा प्रयत्न केला का, त्या झटापटीत तो मारला गेला का की त्याला पद्धतशीरपणे पोलिसी खाक्या दाखवत ठार मारण्यात आले हा आता वादाचा विषय बनला आहे, परंतु मुळामध्ये खून, अपहरण, खंडणीसह जवळजवळ साठ गुन्हेगारी प्रकरणे असलेला हा विकास दुबे एवढा मोठा डॉन कसा बनला आणि त्याला वेळोवेळी उत्तर प्रदेशमधील बड्या बड्या राजकारण्यांची पाठराखण कशी मिळाली हे पाहिले तर या देशामध्ये राजकारण आणि गुन्हेगारीची मिलीभगत कशी असते त्यावर झगझगीत प्रकाश पडतो.
उत्तर प्रदेशमधील ग्रामीण भागांतील जातीयवादी वातावरणामध्ये वयाच्या विशीतच दोघा दलितांची हत्या करून या दुबेने आपले प्रस्थ निर्माण केले. साहजिकच राजकारण्यांना असा बाहुबली हस्तक हवाहवासा वाटल्यास नवल नाही. राजकारण्यांना एकगठ्ठा मते मिळवून देण्यापासून त्यांना आणि त्यांच्या हस्तकांचे जमीनविषयक आणि व्यावसायिक व्यवहार जोरजबरदस्तीने करून देण्यापर्यंत विविध प्रकारे वेळोवेळी मदतीला पावणारा हा डॉन राजकारण्यांना हवाहवासा वाटणे स्वाभाविक होते. त्यामुळे बघता बघता दुबेचे प्रस्थ वाढत गेले. राजकीय पक्षांची त्याला आपल्या कनवटीला घेण्यासाठी चढाओढ लागली. एकदा तर भाजपच्या एका आमदाराची त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या सांगण्यावरून दुबेने भर पोलीस स्थानकातच हत्या केली होती. पण पोलिसांच्या डोळ्यांदेखत हत्या करूनही तो फरार झाला होता व शेवटी जामिनाचा बंदोबस्त झाल्यावर न्यायालयास शरण गेला होता. साठ गुन्हे नोंद असून देखील आपल्या वरपर्यंतच्या राजकीय प्रभावाच्या आधारे तो वेळोवेळी मोकळा सुटायचा. आपल्या न्यायव्यवस्थेतील त्रुटी आणि पळवाटांचा फायदा त्याला विनासायास मिळत आला. पण शेवटी अती तेथे माती ही होतेच.
प्रशासनापासून पोलिसांपर्यंत बडे बडे लोक त्याच्या संपर्कात असायचे असे स्वच्छ दिसते. त्याला पकडायला पोलीस पथक निघताच त्याला पूर्वकल्पना दिली गेली, त्यामुळेच त्याच्या साथीदारांनी पूर्वनियोजितरीत्या पोलिसांवर सशस्त्र हल्ला चढवला. एके ४७ सारखी स्वयंचलित शस्त्रे या कोण्या दुबेकडे आली कुठून? एखादा दहशतवादी हल्ला असावा तशा प्रकारे दुबेला पकडायला गेलेल्या पोलीस पथकाची निर्घृण हत्या करण्यात आली, ज्याचे पडसाद देशभरात उमटले. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जातीने लक्ष घातणे भाग पडले आणि दुबेचे दिवस भरले. दुबे पकडला गेल्यावर कानपूरला नेल्यावर पुन्हा न्यायप्रक्रियेला सामोरा जाईल आणि आजवर सुटला तसा पुन्हा मोकळा सुटेल या भीतीने त्याचा एन्काऊंटर झाला की अटकेनंतर तो आपले धागेदोरे कोठवर कोणाकोणापर्यंत पोचलेले आहेत हे उघड करील या भीतीने हा एन्काऊंटर झाला हे आता कायमचे गुलदस्त्यात गेले आहे, कारण उमर अब्दुल्लांनी काल ट्वीट केले त्याप्रमाणे, ‘डेड मेन टेल नो टेल्स’ हेच खरे आहे. अशा प्रकारची एन्काऊंटर जेव्हा होतात तेव्हा सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांचे स्वागतच होत असते, याचे कारण हा अशा हैवानांना मिळालेला निसर्गदत्त न्याय आहे असे तिला वाटते. खरे म्हणजे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ होण्याची निकडच अशा घटनांतून प्रकट होत असते. गुन्हेगाराला त्याच्या कृत्याची वेळीच योग्य सजा मिळते हा विश्वास जोवर जनतेमध्ये निर्माण होणार नाही, तोवर अशा शॉर्टकटला जनसमर्थन मिळतच राहील!