दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर

0
92

संपूर्ण जग नववर्षाच्या जल्लोषात धुंदावले असताना भारताच्या दिशेने स्फोटकांनी भरलेले एक पाकिस्तानी जहाज निघाले होते ही काल उघडकीस आलेली बाब धक्कादायक असली, तरी अनपेक्षित नाही. सव्वीस अकराची पुनरावृत्ती करण्यासाठी पाकसमर्थित दहशतवादी उतावीळ झालेले आहेत आणि त्यामुळे अशा हल्ल्यांना आपण तयार राहावेच लागेल. तिकडे जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये नववर्षाच्या पूर्वरात्री पाकिस्तानी रेंजर्सचा भारतीय ठाण्यांवर अंदाधुंद गोळीबार रात्रभर सुरू होता. जवळजवळ पंधरा ठाण्यांवर चाललेला हा गोळीबार पहाट झाल्यावरच थांबला. त्यापूर्वी एका गस्ती पथकावर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात श्रीराम गवरिया या भारतीय जवानाचा बळी गेला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताकडून झालेल्या गोळीबारात चौघे पाकिस्तानी जवान मारले गेले. पाकिस्तानकडून अशी आगळीक झाली तर दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर द्या अशी अत्यंत कडक भूमिका संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतल्यानेच एवढे कडवे प्रत्युत्तर भारताकडून दिले गेले हे उघड आहे. शेवटी त्या चौघा सैनिकांचे मृतदेह परत मिळवण्यासाठी पाकिस्तानला भारताने गोळीबार थांबवावा अशा विनवण्या डीजीएमओ आणि दूतावासामार्फत कराव्या लागल्या. आधी तुम्ही तासभर गोळीबार थांबवा आणि पांढरे निशाण फडकवा असे सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानला बजावले आणि त्याचे पालन झाल्यानंतरच गोळीबार थांबवण्यात आला होता. त्याचा सूड म्हणून पाकिस्तानने नववर्षाच्या रात्री हा अंदाधुंद गोळीबार चालवला असे दिसते. २००३ साली युद्धबंदी लागू झाली तेव्हापासून छोट्या मोठ्या मिळून युद्धबंदी उल्लंघनाच्या तब्बल साडेपाचशे घटना पाकिस्तानकडून घडल्या. यंदा तर कहरच सुरू होता. त्यामुळे या सार्‍या प्रकाराला कुठे तरी शह बसणे जरूरीचे बनलेले आहे आणि त्यासाठी ठोशास ठोसा हाच सर्वोत्तम उपाय आहे. सध्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे किमान पन्नास साठ घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांना ती संधी मिळवून देण्यासाठीच पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार सत्र सुरू होते. पाकिस्तानची ही चाल खूप जुनी आहे, तरीही वारंवार तसा प्रयत्न होत असतो. किमान पेशावर हल्ल्यानंतर तरी तेथील जनमताच्या दडपणामुळे पाकिस्तानची दहशतवादासंदर्भातील नीती बदलेल अशी अपेक्षा होती, परंतु ती फोलच ठरताना दिसते आहे. तेहरिक ई तालिबानला जो न्याय लावला जात आहे, तोच लष्कर ए तोयबा, जमात उद दावा आणि तत्सम भारतविरोधी व आयएसआय समर्थित दहशतवादी शक्तींना लावला जाताना दिसत नाही. अशावेळी भारताची पाकिस्तानसंदर्भातील नीती अधिक कडवी होण्याची आवश्यकता आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झाकीऊर रेहमान लखवी याच्या सुटकेला भारताने कडाडून विरोध केल्याने अखेर पाकिस्तानला त्याला सहा वर्षांपूर्वीच्या अपहरणाच्या एका प्रकरणात अडकवून त्याची सुटका होणार नाही हे पाहावे लागले. अर्थात, त्या प्रकरणात त्याची सुटका संभवत असली तरी पाकिस्तानवर दडपण वाढताच तो सुतासारखा सरळ येतो हा या दोन्ही प्रकरणांतला धडा आहे. आजवरच्या सरकारांनी केवळ बोटचेपे धोरण अवलंबिले आणि शाब्दिक इशार्‍यांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिली नाही, त्यामुळेच पाकची मुजोरी वाढत गेली. मोदी सरकारवरील जबाबदारी त्यामुळे वाढली आहे. ‘लातोंके भूत बातोंसे नही मानते’, त्यामुळे पाकिस्तानवरील दबाव वाढवत नेणे हाच त्याच्या मुजोरीला आळा घालण्याचा रामबाण उपाय आहे. त्यामुळे संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी ‘दुप्पट ताकदीने उत्तर द्या’ असे म्हटले ते खरोखरच प्रत्यक्ष कृतीत उतरले, तरच पाकिस्तान भारताची कुरापत करताना दहावेळा विचार करील. लख्वी प्रकरणात असो किंवा सीमेवरील गोळीबाराच्या बाबतीत असो, पाकिस्तानला भारताच्या नीतीमध्ये आक्रमकता आल्याचा साक्षात्कार एव्हाना घडला असेलच. हेच दडपण यापुढेही कायम राहायला हवे. दाऊद इब्राहिमपासून मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांपर्यंत भारताला हव्या असलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची व्यूहरचना यापुढच्या काळात करता आली, तर ते सोन्याहून पिवळे ठरेल. आजवर खूप घाव सोसले. हजारो निष्पापांचे रक्त सांडले. आता पाकिस्तानचा वर उचलला जाणारा हात वरचेवर पकडण्याची वेळ आली आहे.