दुती चंदला २०० मी. शर्यतीत रौप्यपदक

0
109
Silver medallist India's Dutee Chand celebrates during the victory ceremony for the women's 200m athletics event during the 2018 Asian Games in Jakarta on August 29, 2018. / AFP PHOTO / Anthony WALLACE

भारताच्या दुती चंदने जकार्तात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिचे हा या स्पर्धेतील दुसरे पदक होय. मंगळवारी तिने १०० मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकाविले होते. ०.०२ सेकंदाच्या फरकाने तिचे १०० मी. शर्यतीमध्ये सुवर्णपदक हुकले होते.
काल दुतीने २०.२० सेकंदाची वेळ घेत रौप्यपदक मिळविले. बेहरिनच्या इडिडिआँग ओडिआँगने २२.९६ सेकंदाची वेळ देत सुवर्णपदक तर चीनच्या वेई योंगलीने २३.२७ सेकंदाची वेळ देत कांस्य पदक मिळविले.

या रौप्यपदकाबरोबरच दुती ही ‘सुवर्णकन्या’ पी. टी. उषा, ज्योतिर्मोयी सिकदर आणि सुनिता राणीनंतर आशियाई स्पर्धेच्या ऍथलेटिक्स प्रकारात एकेपेक्षा जास्त पदक मिळविणारी तिसरी धावपटू ठरली आहे. पीटी उषाने १९८६मध्ये सेऊल आशियाई स्पर्धेत ४ सुवर्ण पदके मिळविली होती. तर ज्योतिर्मोयी सिकदरने १९९८ बँकॉक आशियाई स्पर्धेत दोन पदके प्राप्त केली होती. सुनिता राणीने २००२ बुसान गेम्समध्ये दोन पदकांची कमाई केली होती. आयएएएफने २०१४मध्ये आपल्या हायपरएअँड्रोगेनिझम नियमांअंतर्गत दुतीला निलंबित केले होते. यामुळे तिला राष्ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागले होते. ओडिशाच्या २२ वर्षीय दूतीने आयएएएफच्या या निर्णयाविरुद्ध न्याय मागत पुनरागमन केले होते.
दरम्यान, चालण्याच्या शर्यतीत भारताच्या खुशबिरला चौथे स्थान मिळाले. खुशबिर हिने २०१४च्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक मिळविले होते.