दुचाकीवरून २२ राज्यांतून प्रवास करून पत्रकार गोव्यात

0
121

रस्ता वाहतूक सुरक्षा आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या जनजागृतीसाठी आपल्या दुचाकीवरून देशभ्रमण करणारे नवी दिल्लीतील ६० वर्षीय निवृत्त पत्रकार शरत शर्मा २२ राज्यातून सुमारे २२,६५० किलो मीटरचा प्रवास करून गोव्यात पोहोचले आहेत.
देशातील विविध राज्यातून प्रवास करताना वाटेत वाहतूक सुरक्षा, फिटनेसबाबत वाहन चालक आणि नागरिकांना माहिती देण्याचे काम करतो. सामाजिक बांधीलकीतून ही जनजागृती मोहिमेला सुरुवात केली आहे. या जनजागृती मोहिमेतून १ हजार युवकांनी हेल्मेट घालण्यास सुरुवात केली आणि ५०० नागरिकांनी नियमित व्यायामाला सुरुवात केल्यास माझ्या उद्दिष्टाची पूर्ती होईल, असे मनोगत शर्मा यांनी व्यक्त केले.

देशात २०१६-१७ या वर्षात रस्ता अपघातात सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यात ५२,५०० दुचाकी चालकांचा समावेश आहे. वाहन अपघातात १८ ते ३५ वयोगटातील ४६.३ टक्के युवकांचा समावेश आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १८.३ टक्के दुचाकी चालकांनी हेल्मेट घातले नव्हते. देशात रस्ता वाहतुकीत शिस्त नाही. वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. मोबाईल वापर करणार्‍या तीन हजार वाहनचालकांचा मृत्यू झाला आहे.

शर्मा यांनी गेल्या १८ मार्च रोजी दिल्लीतून सुमारे २८००० हजार किलो मीटरच्या मोटरसायकलवरील जनजागृती यात्रेला सुरुवात केली. ते हरयाणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, भुतान, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, पश्‍चिम बंगाल, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, म्हैसूर, हुबळी या भागातून गोव्यात आले आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि चंदीगड या भागातून प्रवास करणार आहेत.