दुःखदायक

0
99

आय लीग फुटबॉल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा साळगावकर एफसी आणि स्पोर्टिंग क्लब दी गोवा या दोन प्रमुख संघांनी घेतलेला निर्णय आणि त्या पाठोपाठ या स्पर्धेबाहेर पडण्याचा धेंपो फुटबॉल क्लबने चालवलेला विचार ही भारतीय फुटबॉलसमोर वाढून ठेवलेल्या आगामी संकटांची नांदी आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या मुजोरीविरुद्धचे आणि अलोकशाही वृत्तीविरुद्धचे हे बंड आहे. भारतीय फुटबॉलच्या विकासाचा ‘रोडमॅप’ बनवण्याच्या बहाण्याने निव्वळ धंदेवाईकपणाला प्राधान्य देण्याचा जो प्रयत्न फेडरेशनने चालवलेला आहे, त्याची या तीन संघांची प्रस्तावित माघार ही उमटलेली तीव्र प्रतिक्रिया आहे. आय लीगसारख्या प्रतिष्ठित आणि देशातील पहिल्या दर्जाच्या सर्वोच्च स्पर्धेला दुय्यम स्थान देऊन आयएसएलसारख्या निव्वळ व्यावसायिक स्पर्धेला शीर्षस्थानी नेण्याचा जो घाट फेडरेशनने कोणाशीही सल्लामसलत न करता घातलेला आहे, त्याची ही दारूण परिणती आहे. साळगावकर एफसीसारख्या सहा दशकांची परंपरा असलेल्या संघाने आय लीगबाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला तो काही लहरीपणाने घेतलेला नाही. तो त्यांनी निश्‍चितच पूर्ण विचारांती घेतलेला असेल. फेडरेशनने त्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून त्यांची जी मानहानी केली, त्यामुळेच हा कटू निर्णय निव्वळ अनिच्छेनेच त्यांना घ्यावा लागला आहे. पीटर वाझ यांच्या स्पोर्टिंग क्लब दी गोवानेही त्यांना साथ दिली आहे. गेल्या १७ मे रोजी दिल्लीत फेडरेशनच्या या कथित ‘रोडमॅप’ संबंधी जी बैठक झाली, त्यात वाझ यांनी आपले आक्षेप नोंदवले होते. या दोन्ही संघांनी लिखित रूपामध्ये नव्या प्रस्तावित बदलांबाबत आपले आक्षेप नोंदवूनही फेडरेशनने त्यांना सामोरे जाऊन शंकानिरसन करण्याचे टाळले, यातच त्यामागील इरादे स्पष्ट होतात. फेडरेशनच्या या थंड प्रतिसादाचा उबग आल्यानेच हे दोन्ही संघ स्पर्धेबाहेर पडले आहेत. आय लीगसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेला दुय्यम स्थान देऊन आयएसएलसारख्या निव्वळ व्यावसायिक स्पर्धेला डोक्यावर घेताना आय लीगमधील संघांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे आयएसएलमध्ये प्रवेश देण्याऐवजी ‘पे टू प्ले’ स्वरूपाची निव्वळ आर्थिक योगदानावर आधारित प्रवेश प्रक्रिया अवलंबिण्याचे फेडरेशनचे प्रस्तावित धोरण पूर्णतः गैर आहे. गेली अनेक वर्षे या देशामध्ये फुटबॉलच्या जतन आणि संवर्धनासाठी अपरिमित योगदान स्वतःच्या पैशांनी देत आलेल्या या संघांना दुय्यम वागणूक देेणे हा केवळ या संघांचा नव्हे, तर भारतीय फुटबॉलचा आणि लाखो सच्च्या फुटबॉलप्रेमींचा अपमान आहे. फेडरेशनची ही मुजोर वृत्ती अशीच राहिली, तर येत्या पाच वर्षांत भारतीय फुटबॉल आचके देईल ही जी शापवाणी व्यथित होऊन पीटर वाझ यांनी उच्चारली आहे, ती खरी ठरण्याच्या दिशेनेच फेडरेशनची वाटचाल सुरू आहे. गोव्याच्या आघाडीच्या संघांनी स्पर्धेबाहेर पडण्याच्या घेतलेल्या निर्णयाने देशभरातील फुटबॉलप्रेमींमध्ये ज्या तीव्र प्रतिक्रिया फेडरेशनविरुद्ध उमटल्या आहेत, त्याची नोंद फेडरेशनच्या पिंडीवर बसलेल्या विंचवांनी घ्यायला हवी. मोहन बागान, ईस्ट बंगालसारख्या नावाजलेल्या संघांनीही फेडरेशनवर कोरडे ओढले आहेत. आपल्या देशात फुटबॉलची लोकप्रियता केवळ गोवा, केरळ, पश्‍चिम बंगाल आणि ईशान्य राज्यांमध्ये आहे. गोव्यात फुटबॉलची नुसती आवड नाही, तर वेड आहे. अशा गोव्याच्या प्रमुख संघांना – ज्यांनी आजवर या खेळासाटी तन – मन – धनाने योगदान दिले, त्यांना एका फटक्यात दुय्यम स्थानी ढकलून आयएसएलच्या चमचमाटात पैशाचा बाजार मांडू पाहणार्‍या अ. भा. फुटबॉल फेडरेशनचा निषेध करावा तितका थोडाच आहे. गेल्या वर्षी आयएसएलमध्ये एफसी गोवाने धूम निर्माण केली, परंतु शेवट अतिशय कटू झाला. त्या कटू अध्यायावर जो निवाडा आला, तोही अत्यंत धक्कादायक आणि चोर सोडून संन्याशाला सजा अशा धाटणीचा होता. आता पुन्हा एकवार गोव्याच्या फुटबॉलच्या सच्च्या आधारस्तंभांना व्यथित करणारा प्रसंग फेडरेशनने त्यांच्यावर आणलेला आहे. आजवरच्या आय लीग स्पर्धांपैकी सर्वाधिक गोव्याच्या संघांनी जिंकलेल्या आहेत. असे असताना गोव्याच्या या संघांना आयलीगमधून आयएसएलमध्ये बढती देण्यास मज्जाव करणार्‍या प्रायोजकांच्या धटिंगणशाहीने फेडरेशनला एवढे झुकवले आहे की या नव्या ‘रोडमॅप’ संबंधी घेतल्या गेलेल्या आक्षेपांना उत्तर देण्याचे सामर्थ्यही त्यांच्यात उरू नये? ही हतबलता भारतीय फुटबॉलची मृत्युघंटा ठरेल याचे भान फेडरेशनला वेळीच यावे. अन्यथा भारतीय फुटबॉलमध्ये केवळ चिअरगर्ल्सचा नाच शिल्लक उरेल!