दीर्घ सेवावाढीवरील सरकारी अधिकार्‍यांना घरी पाठविण्याची ‘आप’ची मागणी

0
96

निवृत्तीनंतर सेवावाढ देण्यात आलेल्या व निवृत्तीनंतर ही सेवावाढ घेऊन कित्येक वर्षे सरकारी सेवेत असलेल्या आजोबा व पणजोबांना आता सरकारने घरी पाठवावे व नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी काल आम आदमी पार्टीने पत्रकार परिषदेत केली.

पक्षनेते एल्विस गोम्स म्हणाले की, एका बाजूने सरकारने विविध सरकारी खात्यातील पदे भरण्याची प्रक्रिया बंद केली आहे आणि दुसर्‍या बाजूने निवृत्त होणार्‍या सरकारी अधिकार्‍यांना सेवावाढ देण्याचे सत्र सुरू केले आहे. सरकारचे हे धोरण बरोबर नसून त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली असल्याचे ते म्हणाले. निवृत्तीनंतर सेवावाढ मिळवून सुमारे १५ वर्षेपर्यंत सेवेत असलेले अधिकारीही काही खात्यात असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्र्यांशी चांगले संबंध असलेल्या अधिकार्‍यांना सेवावाढ देण्यात येत असल्याचा आरोप गोम्स यांनी यावेळी केला.

मुख्य वीज अभियंत्याना
सेवावाढ देऊ नका
लवकरच सेवेतून निवृत्त होणार असलेले वीज खात्याचे मुख्य वीज अभियंते एन. नीळकंठ रेड्डी यांना सेवावाढ देण्याची तयारी सरकारने केलेली असून त्यांना सेवावाढ देऊ नये, अशी मागणीही आम आदमी पार्टीने केली आहे.

सेवावाढ दिलेल्यांची यादी
सरकार देत नाही
किती लोकांना सरकारने सेवावाढ दिलेली आहे हे जाहीर करण्यात यावे, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती. पण ही माहिती देणे सरकार टाळत असल्याचा आरोप गोम्स यांनी यावेळी केला. विविध खात्यातील एलडीसी व डीईओ यांचे करार रद्द करण्यात आल्याबद्दल गोम्स यांनी सरकारवर जोरदार टीका केली.