दीर्घ पल्ल्याची प्रज्ञा लाभलेले डॉ. द. दि. पुंडे

0
241

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

मराठी भाषेच्या विविध अंगांकडे आणि वाङ्‌मयीन प्रवाहांकडे इतक्या आस्थेने, ममत्वाने आणि समरसतेने पाहणारा त्यांच्यासारखा मराठीचा प्राध्यापक आणि व्यासंगी समीक्षक आजमितीस आढळणे दुर्मीळच.

मराठीच्या अभ्यासक्षेत्रात डॉ. द. दि. पुंडे यांनी आपली पृथगात्म मुद्रा उमटविली आहे. त्यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू लाभलेले आहेत. मराठीचे ते नामवंत प्राध्यापक आहेत. श्रेष्ठ दर्जाची प्रज्ञा आणि प्रतिभा त्यांना लाभलेली आहे. मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या सम्यक अंगोपांगांचे त्यांनी डोळसपणे परिशीलन केले आहे. त्यातून त्यांना मर्मदृष्टी प्राप्त झाली आहे. मराठी भाषेच्या विविध अंगांकडे आणि वाङ्‌मयीन प्रवाहांकडे इतक्या आस्थेने, ममत्वाने आणि समरसतेने पाहणारा त्यांच्यासारखा मराठीचा प्राध्यापक आणि व्यासंगी समीक्षक आजमितीस आढळणे दुर्मीळच. एवढ्यासाठी हे विधान केले की, मराठीच्या अध्यापनाकडे केवळ व्यवसाय म्हणून त्यांनी कधी पाहिले नाही. ते जीवितकार्य म्हणून पाहिले नाही. जुन्या परंपरेचे आणि नव्या अंतःप्रवाहांचे सजग भान ठेवून स्वतःला अद्ययावत कसे ठेवावे याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे डॉ. द. दि. पुंडे यांचे वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्व. पूर्वसूरींविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदराची भावना. समकालीन प्राध्यापकांविषयी आणि समीक्षकांविषयी त्यांना जिव्हाळा वाटत आलेला आहे. तीच ओढ सृजनशील साहित्यिकांविषयी आणि साहित्यकृतीविषयीची. पण तेवढ्यावर ते थांबत नाहीत. प्रमेयाशी झोंबी घेताना पूर्णत्वाने गाभ्याशी जाण्याची अभ्यासवृत्ती त्यांच्याकडे आहे. त्यातूनच त्यांनी वाङ्‌मयेतिहासाची संकल्पना नव्याने मांडली. त्यातून ‘वाङ्‌मयेतिहासाची संकल्पना‘ हा त्यांचा मौलिक ग्रंथ साकार झाला.

मराठी विश्‍वकोशाच्या पंधराव्या खंडातील या विषयावरची त्यांनी लिहिलेली नोंद त्यांच्या व्यासंगाची साक्ष देते. ‘वाङ्‌मयेतिहासाची संकल्पना’ हा त्यांचा ग्रंथ अनेक विद्यापीठांतून संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासला जातो. त्याच्या चार आवृत्त्या निघाल्या आहेत. दरखेपेला त्यात नव्या विषयाची भर पडत असते. ‘त्रिदल’ या पुस्तकात बालकवी, कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या निवडक कविता आणि विवेचक प्रस्तावना आहे. या पुस्तकाच्या सोळा आवृत्त्या निघाल्या आहेत. ‘कुसुमाग्रज- शिरवाडकर’ या त्यांच्या पुणे विद्यापीठात सादर केलेल्या पीएच.डी. प्रबंधाला ‘वि. रा. करंदीकर पुरस्कार’ प्राप्त झाला. या पुरस्काराचे ते पहिले मानकरी. शिवाय त्यांना ‘य. वि. परांजपे’ पुरस्कारही प्राप्त झाला.

डॉ. द. दि. पुंडे यांनी सातत्याने समीक्षालेखन आणि संशोधन हे आपले व्रत मानले. त्यांची शोधप्रक्रिया विविध स्तरांवर चालते. त्यांच्याकडे आवर्जून निर्देश करावासा वाटतो. डॉ. वा. पु. गिंडे आणि त्यांनी मिळून ‘वाङ्‌मयाचे अध्यापन’ हा ग्रंथ संपादित केला. त्याची दोघांनी मिळून लिहिलेली अभ्यासपूर्ण प्रस्तावना या क्षेत्रात नव्याने प्रवेश करणार्‍या प्राध्यापकांना पथदर्शक ठरणारी आहे. वाङ्‌मयाचे अध्ययन- अध्यापन ही इतर विषयांप्रमाणे केवळ ज्ञानप्रक्रिया नसून संस्कारप्रक्रियादेखील आहे. वाङ्‌मयाचा आस्वाद ही जितकी व्यक्तिगत प्रक्रिया असते; तितकीच ती सामाजिक-सामूहिक प्रक्रियाही असते. प्रत्येक नवी वाट शोधणारी वाङ्‌मयकृती संबंधित वाङ्‌मयप्रकाराच्या पूर्वनिधारित निकषांनाच धक्के देत असते. वाङ्‌मयाचे स्वरूप, व्याप्ती व प्रयोजन यासंबंधाने एकच एक उत्तर संभवत नाही. वाङ्‌मयाचे अध्यापन अशा व्यापक भानातून करणे गरजेचे असल्यामुळेच वाङ्‌मयाच्या अध्यापकांवर मोठी जबाबदारी येऊन पडते याची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. वाङ्‌मयीन अभिरुची, वाङ्‌मयाच्या अभ्यासाचा आंतरशाखीय अभ्यासाशी असलेला अनुबंध व भारताच्या एकात्म सांस्कृतिक परंपरेचे पालन करण्यासाठी आजूबाजूच्या भाषांतील वाङ्‌मयीन परंपरांची प्रभावक्षेत्रे तपासून पाहण्याची प्रक्रिया इत्यादी मुद्यांचे त्यांनी केलेले सविस्तर विवेचन वाङ्‌मयाच्या अध्यापनाची मर्मदृष्टी समजावून द्यायला उपयुक्त ठरणारे आहे.

याच ग्रंथात डॉ. द. दि. पुंडे यांनी स्वतंत्रपणे अर्वाचीन मराठी वाङ्‌मयाची सांस्कृतिक पार्श्‍वभूमी दोन लेखांकांमधून विशद केलेली आहे. वाङ्‌मयाच्या यथार्थ आकलनासाठी आणि समीक्षालेखनासाठी त्यांचा सांस्कृतिक अनुबंध आणि त्याची सांस्कृतिक पार्श्‍वभूमी समजून घेणे हे किती आवश्यक आहे हे त्यांनी पटवून दिलेले आहे. वाङ्‌मय ही एक संस्कृतीच आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ‘भारताचा सांस्कृतिक वारसा आणि विवेकानंद’ हा ग्रंथ म्हणजे डॉ. द. दि. पुंडे यांच्या चिंतनशीलतेचे फलित होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारशिल्पाचा वेध घेणारा ग्रंथ प्रा. सीताराम रायकर, डॉ. पंडित टापरे आणि डॉ. द. दि. पुंडे यांनी संपादित केला. या ग्रंथाला डॉ. पुंडे यांनी चाळीस पृष्ठांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिलेली आहे. डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर गौरवग्रंथाच्या संपादनात त्यांनी महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. बडोद्याच्या मराठी वाङ्‌मय परिषदेच्या अध्यक्षांची भाषणे त्यांनी ‘सयाजी नगरातील साहित्यविचार’ या ग्रंथात विवेचक प्रस्तावनेसह संपादित केली आहेत.

ग्वाल्हेरच्या कवी-कवयित्रींची कविता त्यांनी ‘ग्वाल्हेरच्या लोकांची कविता’ या नावाने संपादित केली आहे. महाराष्ट्रातील मुख्य धारेतील वाङ्‌मयाबरोबरच बृहन्महाराष्ट्रातील साहित्यनिर्मितीकडे व साहित्यविचाराकडे ते किती आस्थेने आणि ममत्वाने तसेच अभ्यासक्षेत्राचा अविभाज्य भाग म्हणून पाहतात याचे ते निदर्शक आहे. ‘दक्षिण भारतातील वाङ्‌मयाचा अभ्यास ः तंजावर’, ‘दक्षिण भारतातील वाङ्‌मयाचा अभ्यास ः आंध्र’ आणि ‘दक्षिण भारतातील वाङ्‌मयाचा अभ्यास ः कर्नाटक’ हे तीन खंड सिद्ध करून त्यांनी समारोपाचे प्रकरण लिहिले.

‘भाषांतरमीमांसा’ या डॉ. कल्याण काळे आणि डॉ. अंजली सोमण यांनी संपादित केलेल्या ग्रंथात डॉ. द. दि. पुंडे यांनी ‘भाषांतर आणि वाङ्‌मयेतिहास’ हा लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी या दोन अभ्यासशाखांमधील आंतरसंबंध उलगडून दाखविला आहे. ‘‘एका वाङ्‌मयीन संस्कृतीवर दुसर्‍या एखाद्या वाङ्‌मयीन संस्कृतीचे जे आक्रमण होते, तेच प्रामुख्याने भाषांतराच्या आश्रयाने होते. अशा परिस्थितीत भाषांतर हे प्रभावक्षेत्र ठरते. प्रभावक्षेत्र हा कोणत्याही भाषेतील वाङ्‌मयेतिहासाच्या संदर्भातील कळीचा मुद्दा असतो. म्हणूनच भाषांतरांमुळे निर्माण होणारे प्रभावक्षेत्रही महत्त्वाचे ठरते. प्रभावक्षेत्र हा कोणत्याही भाषेतील वाङ्‌मयेतिहासाच्या संदर्भातील कळीचा मुद्दा असतो. म्हणूनच भाषांतरांमुळे निर्माण होणारे प्रभावक्षेत्रही महत्त्वाचे ठरते. वाङ्‌मयेतिहासाच्या विचारात ते वगळले जाता कामा नये.’’

वास्तविक ही क्षेत्रे एकमेकांच्या इतकी निगडित आहेत की कुणा अभ्यासकाचे लक्ष वेधले गेले नसते. अभ्यासक्षेत्राची ही अभिनवता डॉ. पुंडे यांच्या व्यासंगामध्ये आणि शोधप्रक्रियेत सामावलेली आहे. भाषाशास्त्राकडून भाषाविज्ञानाकडे मराठीच्या अभ्यासक्षेत्रात वाटचाल झाली. त्यावेळी मोजक्याच व्यक्तींनी त्याविषयीचे लेखन केले. त्यात डॉ. स. गं. मालशे, डॉ. मु. श्री. कानडे, डॉ. कल्याण काळे, डॉ. अंजली सोमण, डॉ. गं. ना. जोगळेकर, डॉ. सु. बा. कुलकर्णी इत्यादी मंडळी होती. डॉ. द. दि. पुंडे यांनीही स्वतंत्रपणे या विषयावर लेखन केले. त्यांची ही अभ्यासक्षेत्रातील वाटचाल देदीप्यमान स्वरूपाची मानावी लागेल.

अर्थातच ६ डिसेंबर २०१७ रोजी वयाची ७९ वर्षे पूर्ण करून ८० व्या वर्षात पदार्पण करणार्‍या या परिणतप्रज्ञ अभ्यासकाचा जीवनप्रवास त्यासाठी समजून घ्यावा लागेल. द. दि. पुंडे यांचा जन्म पुण्यात ६ डिसेंबर १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील दिनकर पुंडे हे शिक्षक होते. त्यांचा मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळे तालुक्यातील राजुरी. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण जामखेडला झाले. पुढचे माध्यमिक शिक्षण नगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये झाले. इंटर आर्टस्‌पर्यंत महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी नगरच्या कॉलेजमध्ये घेतले. पुढचे शिक्षण पुण्यात झाले. बाहेरूनच त्यांनी परीक्षा दिली. एम.ए.चा अभ्यासक्रम त्यांनी मुंबई विद्यापीठात पूर्ण केला. खडतर परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण घेतले. कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे त्यांनी परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले. सरकारी नोकरीसाठी त्यांनी परीक्षा दिली. तिच्यात ते पहिले आले. जून १९७० मध्ये पूना कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणूनही त्यांची निवड झाली. अध्यापनाची आवड असल्यामुळे शासकीय नोकरी न पत्करता ‘पूना कॉलेज’मध्ये ते रूजू झाले. १९७५ पासून पुण्याच्या ‘मॉडर्न कॉलेज’मध्ये त्यांनी अध्यापनास सुरुवात केली. निवृत्तीपर्यंत ते तिथेच होते. तिथे त्यांनी विभागप्रमुखपद भूषविले. पुणे विद्यापीठात पदव्युत्तर विभागात त्यांनी अध्यापन केले.

अध्यापनकाल हा त्यांच्या कर्तृत्वशक्तीच्या बहराचा काळ. ग्रंथनिर्मिती, ग्रंथसंपादने, पूर्वकाळातील आणि समकाळातील पुस्तकांना लिहिलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना हे त्यांच्या वाङ्‌मयीन उपक्रमशीलतेचे स्वरूप. नव्या उमलत्या लेखक- कवींना त्यांचा सतत प्रोत्साहनाचा हात लाभला. पीएच.डी.साठी संशोधन करू इच्छिणार्‍यांना अभ्यासाचा प्रारंभबिंदू कोणता असावा याची संथा द्यावी ती डॉ. द. दि. पुंडे यांनीच. विद्यार्जनाच्या काळात ज्या थोर गुरुवर्यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले, जे ज्ञानसंस्कार त्यांच्यावर झाले, त्यामुळे त्यांच्या अभ्यासाची भरभक्कम बैठक तयार झाली. त्यामुळे आत्मनिर्भर वृत्तीने ते वावरत होते. मराठी भाषा रचनेच्या आणि व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध स्वरूपात लिहिली जावी याकडे त्यांचा तीक्ष्ण कटाक्ष होता. या त्यांच्या चिंतनशील वृत्तीतून ‘भयंकर सुंदर मराठी’ हा उद्बोधक ग्रंथ साकार झाला. पण त्यांनी तो लिहिला मात्र मनोरंजक पद्धतीने आणि नर्मविनोदी शैलीत. सद्यःकालीन इंग्रजाळलेल्या मराठी माणसांच्या डोळ्यात तो झणझणीत अंजन घालणारा आहे. प्रा. गो. ग. कुलकर्णी या प्रज्ञावंत प्राध्यापकाविषयी त्यांच्या मनात निरतिशय आदराची भावना होती. उत्तरायुष्यात त्यांनी डॉ. पुंडे यांना पुत्रवत मानले.

* * * * * * * * *
मे १९८५ मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात डॉ. वसंत पाटणकर यांनी डॉ. द. दि. पुंडेसरांशी माझा परिचय करून दिला. त्यांच्यामसवेत प्रा. दिगंबर पाध्येही होते. दोघेही मराठी अभ्यासक्षेत्रातील दिग्गज. डॉ. पाटणकर यांचेही समीक्षाक्षेत्रातील कार्य सर्वश्रुत आहे. तेव्हापासून आजमितीला डॉ. पुंडेसरांना मी ज्येष्ठ सुहृद, साहित्यविचाराची मर्मदृष्टी असलेले तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शक मानले आहे. त्यांनीही तेवढ्याच ममत्वाने आणि वात्सल्याने मला वागविले आहे. भौगोलिकदृष्ट्या ते दूर अंतरावर- पुण्यात- आहेत. इच्छा असूनही त्यांच्याशी गाठीभेटी वारंवार होत नाहीत. पण दूरध्वनीवरून त्यांची प्रेमळ साद येते तेव्हा मी सुखावून जातो. कारण त्या केवळ हवा-पाण्याच्या गोष्टी नसतात. साहित्याच्या प्रांतात नवे काय चालले आहे हे ते निर्मम वृत्तीने ऐकवितात. स्मृतिमधुर क्षणांची धून त्यांच्या संवादात असते. तीदेखील मनाचे प्रबोधन करणारी असते. अशी माणसे अलीकडे दुर्मीळ होत चाललेली आहेत. पण ‘साकल्याच्या प्रदेशा’तील वाङ्‌मयीन अभिरूचीविषयी आणि संवेदनशीलतेविषयी डॉ. पुंडेसर पोटतिडिकीने बोलतात तेव्हा ‘अजूनही येतो वास फुलांना| अजुनी बकरी पाला खाते’ या कविवर्य बा. सी. मर्ढेकरांच्या उद्गारांची आवर्जून आठवण होते. जीवनाचा अर्धा पेला भरलेला आहे अशी सकारात्मक जाणीव मनात निर्माण होते. सहस्रचंद्रदर्शनाचा योग वर्षभरात त्यांच्या आयुष्यात येणार आहे. त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभावे ही शुभेच्छा!