दीर्घायुषी होता येईल का?

0
502

सौ. मोहिनी सप्रे

मनुष्य म्हणजे ईश्‍वराची प्रतिकृती. याचाच अर्थ ईश्‍वराची मनुष्यावर कृपादृष्टी आहे. त्याला ईश्‍वराने स्वतःचे सामर्थ्य अर्पण केले आहे. मनुष्याने मनात आणले तर तो काहीही करू शकेल. मनुष्य हा ईश्‍वराचा अंश आहे. तो मनात आणेल तेवढा मोठा होऊ शकतो व कोणत्याही सिद्धी प्राप्त करणे त्याला शक्य आहे. मनुष्याचे शरीर हे ईश्‍वराचे मंदिर आहे. हे मंदिर व्यवस्थित सुडौल व सुंदर असेल तरच ते ईश्‍वराच्या निवासासाठी योग्य म्हणता येईल. ईश्‍वर त्यात वास करेल. मनुष्य स्वतःचे घर चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग ज्या घरात प्रत्यक्ष ईश्‍वर वास करणार आहे त्याला सर्वश्रेष्ठ करण्याची किती गरज आहे हे प्रत्येकाच्या लक्षात यायला हवे. यासाठी प्रत्येकाने आरोग्य शास्त्राचे नियम शिकले पाहिजेत. शरीरशास्त्र व आरोग्यशास्त्र हे महत्त्वाचे जीवनशास्त्र आहे. आयुर्वेदाला ‘उपवेद’ असे म्हणतात. आरोग्यशास्त्र हे फार गहन व गुंतागुंतीचे शास्त्र आहे. त्याच्या अभ्यासासाठी खूप परिश्रम व एकाग्र चित्ताची जरुरी आहे.
संपत्ती, ऐषोआराम यांच्या वाढत्या प्रमाणामुळे व परिश्रम, मेहनत कमी झाल्यामुळे मेदवृद्धी होते. त्याचबरोबर मादक पेये, सिगारेट, गुटखा, तंबाखू या जीवघेण्या व्यसनांमुळे व विकृतींपायी जनता त्रस्त झाली आहे. अनेक प्रकारचे रोग हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, कॅन्सर, संधिवात, मानसिक विकार या सर्वांचा खूपच प्रादुर्भाव झाला आहे.
मेदवृद्धी व मादक व्यसनांमुळे उद्भवणार्‍या आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
आरोग्याबद्दल जागृती करण्यासाठी आपल्या देशात शाळा, कॉलेजमध्ये आरोग्य विषयक मार्गदर्शन केले पाहिजे.
मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर आहे. ते सुंदर, स्वच्छ, मजबूत व कणखर रहावे यासाठी आवश्यक ते ज्ञान सर्वांना असले पाहिजे. अशा शरीररुपी पवित्र मंदिराला दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू, अफू, मांसाहार इत्यादी अभक्ष्य व भ्रष्ट आहाराने विटाळणे योग्य नाही. त्याची काळजी निसर्गाचे नियम पाळून व्यवस्थित घ्यायला हवी. शरीर मजबूत, निरोगी व दीर्घायुषी करण्यासाठी रोज व्यायाम, प्राणायाम करणे आवश्यक आहे. जेवणात मिताहारी असले पाहिजे. आचरण स्वच्छ व पवित्र असले पाहिजे. आहार-विहारात संयम असला पाहिजे. पहाटे उठून मनाला स्थिर करणे गरजेचे आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास आरोग्य, मनःशांती आणि दीर्घायुष्य प्राप्त करणे शक्य आहे. अशा प्रकारे जगणार्‍या माणसाला अकाली मृत्यू येणार नाही. (अपघाती मृत्यूचा अपवाद सोडल्यास)
भारतीय जनतेची आयुर्मर्यादा कमी असण्याची व शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे आध्यात्मिक मनोदशा. बहुतेक लोकांची समजूत आहे की नशिबात असेल तेच होणार. आज ना उद्या मरण येणारच, मग मजा करा आणि मरा. पण आहाराचे नियम पाळून तुम्ही दीर्घायुष्य मिळवू शकता.

वृद्धावस्था म्हणजे काय?

म्हातारपण हे अटळ असेच सामान्य लोक समजतात. म्हातारपण आले की, त्याचबरोबर संधिवात, अजीर्ण, बद्धकोष्टता, मोतीबिंदु, ऐकू कमी येणे असे रोग व्हायचेच अशी समजूत आहे. पण मृत्यूच्या महायात्रेचा रस्ता हौसेने, उत्साहपूर्वक स्वीकारायला कोणी तयार नसतो. डॉक्टरी इलाजाकडे प्रत्येकजण धावत सुटतो. म्हणजेच प्रत्येकाची दीर्घायुष्य मिळावे हीच इच्छी असते. पण त्यासाठी विकोप व रोगविरहित जीवन जगण्याची तयारी मात्र कोणाचीच नसते. त्यासाठी प्रयत्नही कोणी करत नाहीत. तरीपण गेल्या काही वर्षांपासून लोक जागृत होऊ लागले आहेत.
म्हातारपण हा रोग नाही. ती एक प्रक्रिया व निसर्गाचा नियम आहे व हा क्रम प्रत्येकाने स्वीकारलाच पाहिजे. नियम पाळून अकाली वृद्धत्व येणार नाही अशी काळजी घेणे आवश्यक आहे.
जसे वय वाढते तशा शुद्ध व अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये चुन्याच्या क्षारासारखे एक विजातीय द्रव्य एकत्र साठू लागते व ते रक्तवाहिन्यांच्या आत अस्तराप्रमाणे चिकटते. त्यामुळे त्या कठीण/कडक व जाड होतात आणि रुधिराभिसरणाच्या क्रियेत अडचण उत्पन्न होते. नसांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. हे द्रव्य शरीरामध्ये साठू नये यासाठी प्रयत्न झाला नाही तर ते वाढून संपूर्ण शरीराची यंत्रणाच बिघडवून टाकते. असे झाले की, तरतरी, चपळता, उत्साह यांचा लोप होतो. सर्व शरीरात मंदपणा, शैथिल्य व निरसपणा दिसू लागतो. शरीराच्या पुष्कळशा अवयवांच्या चपळतेचा नाश ह्या द्रव्यामुळे होतो. उदा. मेंदूला आवश्यक असा रक्तपुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते. हेच शैथिल्य इतर अवयवातही दिसून येते व अशा प्रकारे शरीरावर वृद्धत्वाच्या निशाण्या दिसू लागतात.
शरीरातील रक्तवाहिन्यात चिकटून राहणार्‍या या द्रव्याला कोणताही उपाय करून, गतीमान करून शरीराबाहेर टाकणे आवश्यक आहे. यासाठी पुढील उपाय करावेत- रोज सकाळी व्यायाम करावा. चालायला जावे, या प्रकारे शरीरात चैतन्य व स्फूर्ती प्रवेशतील व लवचिक शरीर प्राप्त होऊ शकेल.
वृद्धत्व रोखण्यासाठी उपाय-
१) कसरत व व्यायाम, २) मालीश, ३) योगासने तसेच १) स्नान करताना गरम व गार पाण्याचा उपयोग करावा. अंगावर एकदा गरम पाणी व एकदा गार पाणी असे क्रमाने घ्यावे, २) गार पाण्यात टॉवेल बुडवून त्याने अंग घासा, ३) मग स्नानानंतर कोरड्या टॉवेलने अंग घासा, ४) व्यायामानंतरही कोरड्या टॉवेलने अंग घासा, ५) रोज सर्वांगासन करा. ज्यांना जास्त रक्तदाब व डोळ्यांची तक्रार नसेल त्यांनी शीर्षासनही करावे.
१) रोगाचे चिन्ह दुर्लक्ष करण्यासारखे नसते. त्यावर वेळीच उपाय करावा. २) सडसडीत माणसे दीर्घायुषी असतात. लठ्ठ माणसे लवकर आजारी पडतात. ३) तंबाखू ही दीर्घायुष्याला मारक आहे. मग ती खा, ओढा की नाकाने वास घ्या. त्यामुळे ती आयुष्यमर्यादा कमी करते. त्यातील निकोटीन हे द्रव्य खूप विषारी असून ते अनेक रोगांना थारा देते. त्यामुळे तंबाखूच्या व्यसनांपासून दूरच रहावे. ४) मद्यपान करू नये- मद्यपानामुळे यकृताला हानी पोचते व त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. ५) सुपाच्य, प्रवाही व नेमस्त आहार. यात पातळ पदार्थांचे सेवन अधिक करावे व पचनास हलका आहार घ्यावा. प्रमाणात घेतलेल्या व पातळ आहारामुळे पचनक्रिया गतीमान राहू शकते. पचनक्रिया कार्यक्षम असली की ८% पोटाची दुखणी होण्याचे टळते. पोटाचे दुखणे हे इतर रोगांचे उगमस्थान आहे. ६) श्रम व व्यायाम करा- उदा. मोकळ्या हवेत श्रम करणे मजूरी व शेतात काम करणे, बागेत काम करणे इ.
७) सदा उत्साही व आशावादी रहा- कायम हसतमुख रहा. हताश व निराश राहू नका. सर्वांशी मोकळेपणाने वागा. सर्वांशी मिळून मिसळून व एकोप्याने रहा.
८) प्रवृत्ती व निवृत्तीची सांगड- दरवर्षी काही दिवस कामातून सुट्टी घेऊन, रोजचा कामधंदा बाजूला ठेवून आराम करा किंवा बाहेर वेगळ्या वातावरणात फिरायला जा. वेगळी माणसे, वेगळे विषय, वेगवेगळी ठिकाणे फिरायला जा. हे सगळे पाहणे यांचा देखील मनावर खूप चांगला परिणाम होतो. विश्रांतीच्या काळात संगीत ऐका.
९) धार्मिक भावनेती गरज- ईश्‍वरावर अभंग श्रद्धा ठेवा. तुमचे सुख-दुःख सर्व देवावर सोडून द्या. कोणत्याही दुःखाच्या प्रसंगी तुम्ही निश्‍चिंत राहू शकाल. तर दीर्घायुष्य लाभून शतायुषी होण्याचे ध्येय सिद्ध करू शकाल.

ब्रह्ममुहूर्ताचे फायदे ः

‘‘लवकर निजे, लवकर उठे
तया आरोग्य, ज्ञान, संपत्ती भेटे’’

ब्रह्ममुहूर्ताला म्हणजेच पहाटे चार वाजता उठून सर्व प्रातःर्विधी आटोपून ध्यान, योग व प्राणायाम करावे. त्यामुळे तन, मन व धनाची वृद्धी होते.
लवकर उठल्यामुळे होणारे फायदेः-
१) व्यायाम करण्यासाठी आवश्यक असा वेळ मिळू शकतो.
२) पहाटे वातावरण अधिक शुद्ध असते. धूळ व रजःकणाचे प्रमाण हवेत कमी असते.
३) पहाटे ‘ओझोन’ हा वायू हवेत थोड्या प्रमाणात असू शकतो. या वायूत दहनक्रिया करण्याची शक्ती अधिक प्रमाणात असते. शरीरात तो जास्त प्रमाणात वापरणे शक्य झाले तर शरीर आतून जास्त साफ होऊ शकते. निद्रावस्थेत श्‍वसनाची क्रिया मंद गतीने चालते. म्हणून ऑक्सिजनचा लाभ होऊ शकत नाही. दुसरे आपण रात्री दारे खिडक्या बंद करून झोपतो.
४) पहाटे एकदातरी आपल्याला जाग येते. तेव्हाच उठून योगा व प्राणायाम करावे. मनापासून केलेली प्रत्येक क्रिया जास्त फलदायी असते.
५) एकदा जाग आली की परत झोपू नये. उशीरा उठणार्‍यांच्या अंगात तरतरी नसते. उलट आळस वाढतो. कामात मन लागत नाही.
६) पहाटे झाडे, पाने, फुले, फळे यातून जो सुगंध पसरतो त्यामुळे चित्ताला अपूर्व प्रसन्नता लाभते. पहाटेचे एकूणच वातावरण आल्हाददायक व शांत असते.
७) सकाळी लवकर उठून पाणी प्यायले असता बरेच आजार कमी होतात किंवा आजारही होत नाहीत.