दीर्घायुषी, वंशवृद्धी करणार्‍या वडाची पूजा ः ‘वट-सावित्री’

0
1180
  • सौ. मीरा निशीथ प्रभूवेर्लेकर (म्हापसा)

काळ पुढे सरकला. बदल होत गेले. परंतु परंपरा चालूच राहिल्या. मात्र आजच्या आधुनिक आणि यांत्रिक जीवनाला जखडून राहिलेल्या कमावत्या महिलांना शास्त्रोक्त पद्धतीने व्रत करणे शक्य होत नाही आणि मनाच्या पापभिरूपणामुळे परंपरांपासून त्या पूर्णपणे दूर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आपल्या सौभाग्यवृद्धीसाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न आजची स्त्री करत असते. आणि या भावनेपोटीच भारतीय नारी ‘वट-सावित्री’चे व्रत मनोभावे करताना दिसते.
.

भारतीय संस्कृतीनुसार सुवासिनींसाठी सर्वश्रेष्ठ मानला जाणारा अलंकार म्हणजे सौभाग्य-टिळा! तहहयात कपाळावर हे सौभाग्याचं लेणं लेवून जगण्यातच ती धन्यता मानते. अहेवपणीच मृत्यु आलेल्या स्त्रीला भाग्यवान समजलं जातं. याचं कारण प्राचीन काळीच नाही तर आजही समाजामध्ये विधवेकडे पाहण्याची मानसिक नजर म्हणावी तशी परिपक्व झालेली दिसत नाही. शंभरेक वर्षांपूर्वी विधवेच्या जीवनाची कशी ससेहोलपट आणि विटंबना केली जाई हे आपण वाचलेले आहे, मालिकांमधून पाहिलेले आहे. त्यामुळे आपल्या सौभाग्यवृद्धीसाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा ती प्रयत्न करत असते. या भावनेपोटीच भारतीय नारी वटसावित्रीचे व्रत मनोभावे करताना दिसते.

भरत खंडात अनेक पतिव्रता होऊन गेल्या. त्या सर्वांमध्ये सावित्री ही आदर्श मानली जाते. ती भारतीय संस्कृतीत अखंड सौभाग्याचे प्रतीक ठरली आहे. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला ‘वट-पौर्णिमा’ साजरी केली जाते. वट म्हणजे वडाचे झाड. पौर्णिमा ही तिथि. वट आणि पौर्णिमा या दोन शब्दांनी झालेला समास म्हणजे वटपौर्णिमा. हिंदू धर्मात वड, पिंपळ, औदुंबर या वृक्षांना पवित्र मानले जाते. यांपैकी वट हा वृक्ष दीर्घायुषी तसंच वंशविस्तारक (विस्तारणार्‍या पारंब्यांमुळे) आहे असे मानले जाते. या वटवृक्षाखालीच सत्यवानाचे गेलेले प्राण त्याला पुनश्च प्राप्त झाले. या घटनेचे स्मरण म्हणून त्याच तिथीला वडाची पूजा केली जाते. अशा या दीर्घायुषी आणि वंशवृद्धि करणार्‍या वडाची पूजा केल्याने आपल्याला अखंड सौभाग्य लाभेल, वंशवृद्धि होईल, अशी आस बाळगून सुवासिनी सालोसाल हे व्रत आचरतात. हा झाला श्रद्धेचा भाग. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाला फार महत्त्व आहे. त्यामुळे त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही त्याची पूजा करण्यामागचा एक प्रामाणिक हेतु आहे. शाळेमध्ये बालवयातच मुलांना पौराणिक कथांचा परिचय होतो. त्यांचा मुलांच्या बालमनावर प्रभाव पडतो. सत्यवान-सावित्रीची कथा ऐकल्यावर मुलींच्या बालमनावर पती म्हणजे परमेश्‍वर हा संस्कार आपसुक रुजला जातो आणि मला वाटते, या संस्कारांचा परिणाम म्हणूनच महिला पतीचं आयुष्य वाढेल, अहेवपणातच आपल्याला मृत्यु येईल अशी श्रद्धा बाळगून हे व्रत मनोभावे आचरताना दिसतात.

हे व्रत कसे करावे याचे काही विधी आहेत. नदीकाठची वाळू आणून ती पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान-सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्या. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्य द्यावे आणि सावित्रीची प्रार्थना म्हणावी-
सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिणी |
तेन सत्येन मां पाहि दुःखसंसारसागरात् ॥
अवियोगे यथा देव सावित्र्या संहितस्य ते |
अवियोगस्तथा स्माकं भूयाज्जन्मनि जन्मनि ॥

वडाला सूत बांधण्याचा विधी प्रतीकात्मकच आहे. पती-पत्नीचं विवाहोत्तर बंधन कायम अतूट असावं हीच त्यामागची भावना असावी.
भद्र देशाचा राजा अश्वपती निःसंतान होता. त्याच्या उग्र तपश्चर्येने ब्रह्मपत्नी सावित्री त्याला प्रसन्न झाली. म्हणून कन्येचे नावही राजाने सावित्रीच ठेवले. ती अत्यंत तेजस्वी आणि गुणसंपन्न होती. पुढे तिच्या तेजस्वीपणामुळे आणि गुणसंपदेमुळे कोणताही राजपुत्र तिला वरण्यास तयार होईना. मग राजाच्या आज्ञेनुसार ती स्वतःच राजपुरोहिताबरोबर वरसंशोधनार्थ बाहेर पडली. तिने सत्यवानाची निवड केली. त्याला तिने मनानेच वरले आणि घरी परतली. सत्यवान हा शाल्य राज्याच्या धृमत्सेन या अंध राजाचा पुत्र. शत्रूबरोबरच्या युद्धात धृमत्सेनाचा पराभव झाल्यामुळे राज्य सोडून तो सहकुटुंब जंगलात वास्तव्य करून राहिला. नारदाला सत्यवान अल्पायुषी आहे हे माहीत होते. आजपासून एका वर्षाने त्याला मृत्यु येईल ही खबर त्याने राजाच्या कानावर टाकली. सर्वांनी सावित्रीच्या निवडीच्या विरोधात जाऊन तिला अन्य वर निवडण्याचा सल्ला दिला. परंतु सावित्रीने सत्यवानाला आधीच मनाने वरलेले असल्यामुळे ती त्याच निवडीवर ठाम राहिली. तिच्या हट्टापायी राजाने सत्यवान-सावित्रीचा विवाह लावून दिला. सावित्री आपल्या अंध सासुसासरे आणि पतीसोबत जंगलात राहू लागली. तिने उंची वस्त्रालंकारांचा त्याग केला. सासु-सासर्‍यांची सेवा ती मनोभावे करु लागली. सत्यवानाचा मृत्यु जवळ येऊन ठेपला. संकल्पित मृत्यूच्या तीन दिवस आधीपासून सावित्रीने उपवास धरून व्रतारंभ केला. व्रताच्या अखेरच्या दिवशी ती सत्यवानासोबत वनात गेली. लाकडे तोडताना सत्यवान खाली कोसळला आणि गतप्राण झाला. त्याचे प्राण नेण्यासाठी आलेल्या यमदूताला सावित्रीच्या तेजामुळे तिच्या मांडीवर पडलेल्या सत्यवानाचे प्राण हरण करणे अशक्य झाले. तेव्हा स्वतः यमधर्म याचे प्राण खेचून घेऊन जाऊ लागले. पतीसोबतच जाण्याच्या ईर्ष्येने यमाच्या मागोमाग जाणार्‍या सावित्रीला यमाने अनेकवेळा मागे फिरण्याची विनंती केली. परंतु सावित्री त्याच्या विनंतीला झिडकारून त्याच्या पाठून चालतच राहिली. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तीन वर मागण्यास सांगितले. चाणाक्ष सावित्रीने अंध सासु-सासर्‍यांना दृष्टि आणि गेलेले राज्य परत देण्याबरोबरच पुत्रप्राप्तीचाही वर मागितला. ‘तथास्तु’ म्हणून यमराजाने गफलत केली. आता वचनपूर्ती करण्याकरिता पुत्रप्राप्ती होण्यासाठी सत्यवानाचे प्राण त्याला परत देणे भाग पडले. सत्यवान जीवंत झाला. ही घटना वटवृक्षाखाली घडलेली होती. अशी ही पुराणकथा सांगितली जाते.

काळ पुढे सरकला. बदल होत गेले. परंतु परंपरा चालूच राहिल्या. मात्र आजच्या आधुनिक आणि यांत्रिक जीवनाला जखडून राहिलेल्या कमावत्या महिलांना शास्त्रोक्त पद्धतीने व्रत करणे शक्य होत नाही आणि मनाच्या पापभिरूपणामुळे परंपरांपासून त्या पूर्णपणे दूर जाऊ शकत नाहीत. आज शहरात वटवृक्षाचे दर्शन होणे दुरापास्तच. त्यात वेळेचा अभाव. मग वडाची फांदी खरेदी करून घरातच त्याची पूजा केली जाते. वेगवेगळ्या भागात हे व्रत त्यांच्या त्यांच्या रुढीनुसार आचरले जाते. बंगालमध्ये वडाची नाही तर पतीचीच पूजा करतात असं ऐकिवात आहे. सुगंधी तेल, उटणे, फुलांचा हार, नवीन वस्त्र अशी सारी प्रसाधनं पतीदेवाला अर्पण करतात. आपल्या गोमंतकात ही पूजा साग्रसंगीत केली जात नसली तरी शास्त्र पाळले जाते. तबकडीमध्ये पसरवलेल्या तांदळामध्ये वडाची फांदी उभी पेरून ठेवतात. भटजींना निमंत्रित करून त्यांच्याकडून शास्त्रोक्त पूजा करवून घेतली जाते. त्यानंतर सत्यवान-सावित्रीच्या कथाश्रवणाचा आनंद घेतला जातो. घरातील सर्व सुवासिनी वडाच्या फांदीला सुत गुंडाळून त्याची पूजा करतात. भटजीला तसेच घरात आलेल्या सुवासिनींना सौभाग्यवाणं दिली जातात. हळदकुंकू, गजरा, फळांचा द्रोण असं सौभाग्यवाणाचं स्वरूप असतं. हा द्रोण वडाच्याच पानांपासून बनवला जातो. काळे मणी ओवलेला अनशीचा दोरा नारळाला बांधतात. द्रोणामध्ये हा नारळ, आंबा, फणस, अननस, करवंदं अशी या मोसमात पिकणारी कोणतीही पाच फळं, उकडलेले काबुली चणे, विडा असे जिन्नस घालून तो द्रोण सवाष्णीला देतात.

वातावरणातले प्रदूषण रोखण्याकरता ‘झाडे लावा, झाडे जगवा’चे नारे पुकारले जात असताना या व्रतासाठी ठिकठिकाणच्या वडाच्या फांद्याची केली जाणारी कत्तल कितपत् योग्य आहे हाही एक प्रश्‍न पर्यावरणाच्या दृष्टिने मागे उरतोच!
काही वर्षांपूर्वी भाळावर लावल्या जाणार्‍या अस्सल कुंकुमाची जागा कालांतराने टिकलीने घेतली. आजच्या जीन्सवाल्या आधुनिक तरुण सौभाग्यवतींनी टिकलीलाही भाळावरून उडवून लावलेले दिसते. हा मुद्दा वेगळा विषय ठरू शकेल. समाजामधल्या आजकालच्या अनेक संसाराचे चित्र पाहता शहरी आणि ग्रामीण, सुशिक्षित आणि अशिक्षित घरातल्या स्त्रिया पतीच्या अत्याचाराला कशा बळी पडतात हे महिला आयोगाकडे आलेल्या अनेक तक्रारींवरून कळून चुकते. गंमत म्हणजे व्यसनी, अत्याचारी, व्यभिचारी नवर्‍यासाठी त्यांच्या सहचारिणी चक्कर येऊन पडेपर्यंत वडाभोवती चकरा मारत असतात. …जन्मोजन्मी हाच पती लाभो म्हणून? … याहून हास्यास्पद आणि करुण विसंगती अन्य ती कोणती असु शकेल?