दीपावली संकल्प

0
168

पुन्हा एक नवी ऊर्जा घेऊन दीपोत्सव आला आहे. दरवर्षी तिमिरातून तेजाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा हा उत्सव आपल्या मनातील निराशा आणि निरुत्साह दूर सारून पुन्हा नव्याने, नव्या ऊर्जेने जीवनाला, त्यातील संघर्षाला सामोरे जाण्याचा संदेश आपल्याला देत असतो. आपल्या भोवतालची परिस्थिती काही फार बदललेली असते असे नव्हे, परंतु नव्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहताना सगळेच बदलून गेल्यासारखे वाटल्याविना राहत नाही. परिस्थिती बदललेली नसते. बदललेलो असतो आपण. बदललेली असते आपली दृष्टी. आपल्याच मनातील आशा – निराशेचे खेळ आपल्या मनोवस्थेवर परिणाम घडवत असतात. त्यामुळे असा एखादा सण आला की त्याच्या निमित्ताने का होईना, आपल्या मनावरील नैराश्याची पुटे दूर होऊ लागतात, किंबहुना त्या उत्सवाच्या निमित्ताने आपणच ती दूर सारत जातो नि नव्या उत्साहाने कामाला लागतो. देशामध्ये आज दिवाळीतही अर्थव्यवस्थेवर औदासिन्य पसरलेले दिसते आहे. नोटबंदी आणि जीएसटीने आर्थिक विकास दराला वेसण घातली आहे. उत्पादन क्षेत्रापासून सेवाक्षेत्रापर्यंत मंदीचे वातावरण दिसते आहे. हे सगळे निराशाजनक चित्र बदलण्याचे आव्हान सत्ताधार्‍यांपुढे आहे. अर्थव्यवस्थेला उभारी दिल्याखेरीज आज प्रत्यवाय नाही, कारण शेवटी तिच्या अवनतीचा परिणाम प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे प्रत्येकाच्या क्रयशक्तीवर होत असतो. दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांत महागाईची झळ अधिकच जाणवत असते. इंधनाच्या दरांपासून अन्नधान्यापर्यंतची सततची दरवाढ सामान्यांच्या मानगुटीवर बसलेली आहे आणि अच्छे दिनांच्या वायद्यातही ती कायम आहे. या दिवाळीत सामान्यांवरचा हा ताण कमी करणारी काही पावले सरकार उचलील अशी अपेक्षा आहे. यंदाच्या दिवाळीआधी राजधानी दिल्लीत फटाक्यांद्वारे होणार्‍या प्रदूषणावर निर्बंध घालण्यासाठी त्यांच्या विक्रीवर निर्बंध घालणारा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला. दिवाळी आणि फटाके यांचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नाही. आपला उत्साह मोठमोठे आवाज करून प्रकट करण्याची काही गरजही नसते. त्यापेक्षा निरामय पणत्यांच्या आराशीतून, रांगोळीच्या सुबक मांडणीतून आपल्या घरात आणि दारात जे मंगलमय वातावरण निर्माण होते, ते महत्त्वाचे. त्यामुळे यंदा अत्यंत घातक वायू वातावरणात सोडणार्‍या विषारी फटाक्यांपासून मुक्त अशी दिवाळी आपण स्वेच्छेने साजरी करायला हरकत नसावी. न्यायालयाने केवळ विक्रीवर बंदी घातली आहे, फटाके उडवण्यावर नाही. परंतु अशा प्रकारे फटाक्यांच्या आतषबाजीतून पैशाचा धूर करण्याऐवजी हाच पैसा आपण सत्कार्याला दिला तर अनेकांचे आयुष्य उभे राहू शकते. नरकासुरासारखी अर्थहीन आणि ओंगळ प्रथाही निकाली निघण्याची गरज आहे, परंतु जोवर त्यासंबंधी स्वयंप्रेरणा तरुणांमध्ये निर्माण होत नाही, तोवर ते होणे शक्य नाही. त्यामुळे काल झालेल्या नरकासुर दहनाचे अवशेष आज रस्तोरस्ती पडलेले पाहायला मिळणार आहेत हे आपले दुर्दैव! हा देश तरुणांचा देश आहे आणि आजचे तरुणच उद्याचा देश घडवणार आहेत. त्यामुळे या युवाशक्तीला योग्य दिशेने नेणार्‍या नेत्यांची आज समाजाला खरी गरज आहे. दुर्दैवाने ज्यांच्या हाती सत्तेची सूत्रे असतात अशी मंडळी समाजहितापेक्षा स्वहित आणि स्वार्थ यांना बळी पडताना दिसते. परिणामी तरुणांपुढे आदर्श उरत नाहीत आणि ही पिढी फसव्या आकर्षणांपुढे वाहावत जाते. गोव्यामध्ये गेल्या काही वर्षांत अमली पदार्थांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्याविरुद्ध लढण्याचा निर्धार या दिवाळीत आपण सर्वांनी करायला हवा, कारण आपल्या येणार्‍या पिढ्यांच्या बरबादीची ही वावटळ आहे. तिचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर भविष्यात गोवा हे आज जसे मद्यपींचे तीर्थस्थान बनले आहे, तसे गर्दुल्ल्यांचे आश्रयस्थान बनायलाही वेळ लागणार नाही. या संकटाविरुद्ध लढण्यासाठी तमाम गोमंतकीयांनी एक व्हावे लागेल. तिमिरातून तेजाकडे जाणे म्हणजे हेच तर आहे. नुसते आकाशकंदील लटकावले म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. हवे आहे सामाजिक भान. आपल्या अवतीभवती जे चालले आहे, त्याच्याशी आपला काडीमात्र संबंध नाही ही समाजामध्ये वाढत चाललेली मनोवृत्ती घातक आहे. एकेक घर म्हणजे आज जणू एकेक बेट बनत चालले आहे. एका बेटाचा दुसर्‍याशी काही संपर्क आणि संबंध उरलेला नाही. आपणही त्या समाजाचे एक घटक आहोत आणि आज शेजार्‍याच्या घरापर्यंत आलेले लोण उद्या कदाचित आपल्या घरातही येऊ शकते याची जाणीव ठेवून सामाजिक संकटांचा एकजुटीने सामना करण्यासाठीची सज्जता म्हणजेच खरा दीपोत्सव. त्यासाठी हवे आहे थोडे सामाजिक भान आणि एकजुटीने लढण्याची जिद्द. या दिवाळीत असा एखादा संकल्प करूया आणि कामाला लागूया!