दीनदुर्बलांचा दीपस्तंभ ः बाबू जगजीवनराम

0
155
  • शंभू भाऊ बांदेकर

बाबू जगजीवनराम यांची आज ११२ वी जयंती. समाजातील दीनदुर्बलांसाठी झटलेल्या आणि सामान्य परिस्थितीतून देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेल्या या नेत्याच्या जीवितकार्याची ही ओळख..

स्वतःवर पडणारे अस्पृश्यतेचे घणाघाती घाव अंगावर झेलीत देशभरातल्या रंजल्या गांजलेल्यांना आपला आधार देत जीवनातील चार तपे राष्ट्रीय प्रवाहात झोकून देऊन त्यांच्या सर्वांगीण उत्कर्षास साहाय्यभूत होऊन राहिलेले मानवतावादी व दीनदुर्बलांचे दीपस्तंभ बाबू जगजीवनराम यांच्यासमोर आज त्यांच्या जयंतीदिनी सारा देश मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होत आहे.

शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या बिहार प्रांतातील चांदवा या एका लहानशा गावात जन्म घेतलेला एका चांभाराचा मुलगा जगजीवनराम जगातली सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतवर्षाच्या उपपंतप्रधानपदी विराजमान होऊन बसतो ही तर अभूतपूर्व अशी घटना होती. ५ एप्रिल १९०८ रोजी उत्तर प्रदेशातील चांदवा या गावात संत शोभीराम यांच्या घरात एका बाळाने जन्म घेतला. शिवनारायण संप्रदायाची दीक्षा घेतलेल्या त्याच्या पित्याने हे आपले अपत्य म्हणजे आपल्याला रामाने दिलेले या जगातील जीवन आहे असे मानून त्या बाळाला ‘जगजीवनराम’ असे संबोधन दिले.

उपजीविकेला चालविलेला शेतकरी व्यवसाय आणि मनःसामर्थ्याकरिता चालविलेला हरिनामाचा ध्यास अधिक आत्मीय प्रयासाने करीत असतानाच अचानक त्यांचे पिता संत शोभीराम यांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली. जगजीवनराम त्यावेळी केवळ सहा वर्षांचे होते. घरातील सुसंस्कृत आणि सोज्वळ वागणूक तसेच घरादारांत सदोदित होणारे धार्मिक आचरण, पुराण तत्त्वज्ञानासंबंधीच्या होणार्‍या साधू संत समागमातील चर्चा व संवाद यामुळे जगजीवनराम यांना अगदी बालपणापासून शिक्षणाची ओढ लागून राहिलेली होती. आपण राहत असलेल्या वस्तीवरील समाजाचा विरोध सहन करून ते वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शाळेत जाऊ लागले. शिक्षणक्षेत्रातील उच्चभ्रू समाजातील मास्तरांचा जाच व दूर्वागणूक सहन करीत त्यांनी तो आपला शिक्षणाचा मार्ग चोखाळला. वयाच्या आठव्या वर्षी इयत्ता चौथीत असताना जातीय रीतीरिवाजानुसार त्यांचा विवाह इंद्राजी देवी यांच्याशी झाला. अभ्यासाची आवड असल्याने बिगरी ते सातवीपर्यंत एकदाही नापास न होता इ. स. १९२० साली वयाच्या बाराव्या वर्षी प्राथमिक शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले.
महात्मा गांधीजींचा राजकारणात नुकताच प्रवेश झालेला होता. त्यांच्या स्वराज्य स्वदेशी सत्याग्रह आणि हरिजनोद्धाराच्या कार्याने बाबूजी भारले गेले. माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या अग्रवाल हायस्कूलमध्ये जाताना त्यांनी खादी गांधी टोपी घालूनच प्रवेश करून आपला स्वदेशीचा अभिमान जाहीर केला.

शिक्षणाच्या क्षेत्रावर त्यांनी अक्षरशः चढाईच केली. अठराव्या वर्षी ते मॅट्रिक झाले. शिक्षणाबरोबरच व्यायाम करून त्यांनी आपले शरीरही बलदंड करून घेतले. १९३० चा काळ. स्वातंत्र्याच्या चळवळीला जोर आलेला. त्या लढ्यात लोकांना सहभागी करून घेण्याकरता, सर्व जातिधर्माचा सहभाग प्राप्त करून घेण्याकरिता आणि लोकांत जागृती उत्पन्न करण्याकरिता सत्याग्रहासंबंधीचे गांधीजींचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता मौलाना महम्मद अली व पंडित मदनमोहन मालवीय यांनी जेव्हा आरा या शहराला भेट दिली, त्यांच्या जाहीर सभेच्यावेळी हरिजनांतर्फे त्यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन आपल्या खणखणीत भावपूर्ण आवेशात २३ वर्षे वयाच्या तरुण जगजीवनराम यांनीच केले होते. त्यावेळचा त्यांचा तडफदारपणा पाहून मालवीयजींनी त्यांची चौकशी करून त्यांना पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी आपल्या बनारस हिंदू विश्‍वविद्यालयात येण्याचा सल्ला दिला. त्यानुसार बाबूजींनी बनारस विद्यापीठातील प्रवेशाबरोबरच शिष्यवृत्तीही प्राप्त करून घेतली. ते इंटर सायन्सची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी कलकत्ता गाठले. कलकत्ता शहरातील गरीब श्रीमंत उच्चभ्रू आणि मागास अशा बंगलेवाल्या व झोपडपट्टीवासीयांच्या वर्गविग्रहाची दरी त्यांनी पाहिली आणि त्यांचे हृदय विदीर्ण झाले. येथील दुर्बल वर्गाची पोटाची खळगी भरण्याकरिता चाललेली दशा त्यांना पाहवत नव्हती. जगजीवनरामांनी त्यांच्यावरील अत्याचाराला पायबंद घालण्याकरिता त्यांची संघटना बांधणी करून संघर्ष सुरू केला. १९३१ साली ते कलकत्ता युनिव्हर्सिटीची बी.एस्सी. पदवी घेऊन बाहेर पडले.

तरुण तडफदार समाज कार्यकर्ता जगजीवनराम यांच्या नेतृत्त्व गुणामुळे राष्ट्रीय पुढार्‍यांत कुतूहल निर्माण झाले होते. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा आणि ताकदीचा चांगला उपयोग करून घेण्याचे मनसुबे नेते रचू लागले. त्यामुळे बाबूजी कॉंग्रेसचे स्वयंसेवक झाले आणि १९२९ च्या लाहोर अधिवेशनातच त्यांनी अखिल भारतीय दलितवर्ग संघाचे अधिवेशन घेऊन समाजाच्या व्यथा नेत्यांसमोर मांडल्या. १९३७ साली ते कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळाचे पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले. त्यांनी सहकार व उद्योगधंदे ही खाती उत्तमप्रकारे सांभाळली. लोकांना आत्मीयतेने अडीअडचणी सोडविण्यास सहकार्य केले. आपल्या निरहंकारी सेवावृत्तीमुळेच ते बिहारमधील लोकांचे श्रद्धास्थान झाले. १० डिसेंबर १९४० ला त्यांनी केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना कारागृहवास झाला; परंतु या कारागृहवासाचा उपयोग त्यांनी वैज्ञानिक तत्त्वांचा अभ्यास करण्याकरिता केला. सुटकेनंतर गांधीजींच्या निमंत्रणानुसार ते राजेंद्रप्रसादांसमवेत वर्ध्याला गेले. गांधीजींच्या सहवासातील दहा दिवसांत त्यांनी हरिजनोद्धाराविषयी चर्चा केली. १९४६ ला जगजीवनराम यांचा श्रममंत्री म्हणून पहिल्यांदा शपथविधी झाला. ५२ मध्ये बाबूजी केंद्रीय दळणवळणमंत्री झाले. १९७४ साली ते भारताचे संरक्षणमंत्री झाले. ते संरक्षणमंत्री असताना पाकिस्तानच्या झालेल्या आक्रमणात युद्धाची धुरा सुयोग्यरितीने हाताळून त्यांनी पाकिस्तानचा पाडाव केला. राष्ट्रपतींनी २५ जून १९७५ रोजी लागू केलेल्या आणीबाणीच्या ठरावाला सूचक बाबूजी होते. जातीयवादाच्या लोकक्षोभामुळे त्यांनी २ जानेवारी १९७७ रोजी आपल्या मंत्रिपदाचा व कॉंग्रेस सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आणि कॉंग्रेस फॉर डेमोक्रोसी या स्वतंत्र पक्षाची स्थापना करून त्या पक्षाची जनता पक्षाशी युती केली. जनता पक्षाच्या सरकारात ते पुन्हा संरक्षणमंत्रीच झाले. जेव्हा जनता पक्षाचे राज्य आले तेव्हा जयप्रकाश नारायण यांनी जगजीवनराम यांना पंतप्रधान करण्याविषयीचा निर्धार व्यक्त करून त्याप्रमाणे जनता पक्षाचे नेते असलेल्या मोरारजी देसाई व चरणसिंग यांच्याशी विचारणा केली. स्वतः मोरारजी देसाई पंतप्रधानपदाच्या रिंगणात उभे राहिले. मोरारजीभाई देशाचे पंतप्रधान झाले आणि जगजीवनराम व चरणसिंग हे दोघे उपपंतप्रधान झाले. आपसातील बेबनावाने १९७९ मध्ये जनता सरकार कोसळल्यावर संसदीय पक्षाची धुरा मोरारजीभाईंनी जगजीवनराम यांच्यावर सोपविली होती. तेवढ्यात राष्ट्रपतींनी मध्यावधी निवडणूक जाहीर केली. निवडणुकीत जनता पक्षाचा पराभव झाला. पराभवामुळे जनता पक्षाच्या फुटीला उधाण आले. त्यामुळे बाबूजी जनता पक्षामधून बाहेर पडले. अकस्मात आलेल्या अल्पशा आजाराने ६ जुलै १९८६ रोजी त्यांचे निधन झाले आणि सारा मागास समाज पोरका झाला. जीवनभर दीनदुर्बल समाजाच्या उत्कर्षासाठी अविरत परिश्रम करीत राहिलेले थोर नेते बाबूजी जगजीवनराम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!