‘दिव्यांग’ दीपाची दिगंतझेप

0
148
  • सुधाकर नाईक
दिव्यांग दीपा मालिकने ‘खेलरत्न’ हा भारत देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळविणारी पहिली पॅरा-ऍथलेट बनण्याचा मान प्राप्त केला आहे. दोन दशकांपूर्वी ‘स्पायनल ट्युमर’ या दुर्धर आजारावर मात करीत जबर इच्छाशक्तीच्या बळावर पॅरा-ऍथलेट मैदानावर उतरून पॅरा कॉमनवेल्थ, विश्व चॅपियनशीप, रियो पॅरा-ऑलिपिंक, एशियन मेळा आदी विविध स्पर्धा गाजविलेली दीपा मालिक ही पॅरा-ऑलिंपिकमध्ये पदक जिंकलेली पहिली भारतीय पॅरा-ऍथलेट होय.
दिव्यांग दीपा मालिकने ‘खेलरत्न’ हा भारत देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळविणारी पहिली पॅरा-ऍथलेट बनण्याचा मान प्राप्त केला आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी ‘स्पायनल ट्युमर’ या दुर्धर आजारावर मात करीत जबर इच्छाशक्तीच्या बळावर पॅरा-ऍथलेट मैदानावर उतरून पॅरा कॉमनवेल्थ, विश्व चॅपियनशीप, रियो पॅरा-ऑलिपिंक, एशियन मेळा आदी विविध स्पर्धा गाजविलेली दीपा मालिक ही पॅरा-ऑलिंपिकमध्ये पदक जिंकलेली पहिली भारतीय पॅरा-ऍथलेट होय. २०१६ मधील रिओ पॅरा-ऑलिपिंकमध्ये दीपाने ४.६१ मीटर्स गोळाफेक करून प्रतियोगितेत रौप्यपदक जिंकून ही किमया साधलेली पहिली भारतीय महिला पॅरा-ऍथलेट बनण्याचा मान मिळविला. गोळाफेक, भालाफेक, थालीफेक या ऍथलेट प्रतियोगितांबरोबरच दीपाने जलतरण आणि स्पेशल मोटरबायकिंगमध्येही प्रावीण्य साधलेले आहे. यमुना नदीत जलतरणाचा पराक्रम तसेच ‘रेड दी हिमाचल’ आणि ‘डेझर्ट स्टॉम’ अशा अवघड साहसी मोहिमाही तिने यशस्वी केलेल्या आहेत.
अर्जुन, पद्मश्री अशा पुरस्कारानंतर दीपाने खेलरत्न हा सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारही ४९ व्या वर्षी दीपाला प्राप्त झाला आहे.
३० सप्टेंबर १९७० रोजी भैस्वाल, सोनपत- हरियाना येथे जन्मलेली दीपा जन्माने दिव्यांग नव्हे. कर्नल मे. के. नागपाल यांची ही कन्या कर्नल विक्रमसिंग यांची पत्नी. त्याना देविका आणि अंबिका अशा दोन कन्याही आहेत.
१९९९ मध्ये दीपाला ‘स्पायनल ट्यूमर’ या दुर्धर आजाराने ग्रासले. कारगिल युद्धाचा हा कालावधी होता. पती विक्रम सीमारेषेवर लढत होते तर दीपा दुर्धर आजाराशी झुंज देत होती. दीपाला बर्‍याच शस्रक्रियांच्या दिव्यातून जावे लागले. त्यातून ती सावरली पण कमरेखालचा भाग लुळा-पांगळा ठरला. पण जिगरबाज मालिकाने खचून न जाता क्रीडाक्षेत्राकडे लक्ष वळविले आणि भालाफेक, गोळाफेक, थालीफेक अशा क्रीडा प्रकारांबरोबरच बायकिंग तथा जलतरणातही प्रावीण्य मिळविले. हिमालयीन कार रेसिंगमध्ये निमंत्रित झालेली ती एकमेव भारतीय महिला पॅरा-ऍथलेट होय. २००९ आणि २०१० मध्ये रेड दी हिमाचल आणि डेजर्ट स्टॉम या मोहिमात ती यशस्वी ठरली.
२००७ मध्ये तैवान आणि २००८ मधील बार्लिन पॅरा-ऍथलेटक मेळ्यात दीपाने भालाफेक तथा जलतरण प्रतियोगितांत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदके मिळविली. २००८ तथा २००९ मध्ये दीपाने यमुना नदीत जलतरण तथा स्पेशल बाईक रेसमध्ये भाग घेत ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये नोंद केली. २००९ मध्ये दीपाने आयडब्ल्यूएएस या जागतिक मेळ्यात गोळाफेकमध्ये पहिले कांस्यपदक मिळविले. २०१० मध्ये इंग्लंडमधील प्रतियोगितेत गोळाफेक, भालाफेक, थालीफेक आदी प्रकारांत पदके मिळविली. या वर्षी शारजामध्ये झालेल्या वर्ल्ड गेम्समध्ये दीपाने दोन कांस्यपदके प्राप्त केली.
२०१२ मधील मलेशियन ओपन मेळ्यात दीपाने भालाफेकीत सुवर्ण वेध साधला आणि याचवर्षी- वयाच्या ४२ व्या वर्षी- क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठीच्या अर्जुन पुरस्काराने तिला गौरविण्यात आले. २०१४ मधील चायना ओपन ऍथलेटिक गोळाफेक प्रतियोगितेत सुवर्णपदक पटकावले. धीरोदात्तपणे वाटचाल केलेल्या दीपाला २०१७ मध्ये प्रजासत्ताक भारताच्या प्रतिष्ठेच्या पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले.
२०१८ मधील एशियन पॅरा गेम्समध्ये दीपाने रौप्यपदक जिंकून नवा विक्रम प्रस्थापिला आणि २०१०, २०१४, २०१८ अशा सलग तीन मेळ्यात पदके पटकावणारी एकमेव भारतीय पॅरा – ऍथलेट बनण्याचा मान मिळविला.
राष्ट्रीय स्तरावर ५८ तथा २३ आंतरराष्ट्रीय पदके जिंकलेली दीपा मालिक हरयाना, महाराष्ट्र आदी राज्य सरकार तसेच विविध संस्थांकडून यथोचित गौरव, सन्मानाची मानकरी ठरलेली आहे.
दीपा केवळ खेळातच अग्रेसर नाही, सामाजिक कार्याबरोबरच ती लेखनही करते. गंभीर आजारी लोकांसाठी मोहिमा राबवते. तसेच सामाजिक संस्थांच्या उपक्रमांतही हिरिरीने भाग घेते. ती ‘दिव्यागांचा आदर्श’ प्रेरणास्रोत बनली आहे.
क्रीडाक्षेत्रात देदीप्यमान कामगिरीत देशाचे नाव उंचावणार्‍या असामान्य कर्तृत्वान खेळाडूंसाठी १९९१ मध्ये माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या नावे हा पुरस्कार सुरू करण्यात आला. पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा या पुरस्काराचा पहिला मानकरी! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी या दिग्गज क्रिकेटपटूंसाठी ऑलिपिंक, पॅरा-ऑलिपिंक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत अलौकिक कामगिरी नोंदणार्‍या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो. २००१ मधील ऑलिपिंक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा हा या मानकर्‍यांमधील सर्वात युवा दिग्गज होय. बिंद्रा १८ व्या वर्षी या किताबाचा मानकरी ठरला होता. प्रारंभिक कालावधीत दरवर्षी एकाच खेळाडूला हा पुरस्कार दिला जात असे, पण गेल्या काही वर्षांत भारतीय खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय क्षितिजावरील उज्ज्वल आलेख पाहता एकाहून अधिक खेळाडूंना या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले जात आहे. २०१९ मध्ये दीपा मालिकसह कुस्तीपटू बजरंग पुनियाही ‘खेलरत्न’ किताबाचा मानकरी ठरला आहे.
२०१६ मधील रिओ ऑलिपिंक मेळ्यात ४.६१ मीटर्स गोळाफेक करून दुसरे स्थान मिळविलेल्या, पहिली भारतीय महिला ऍथलेट ठरलेल्या दीपावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह भारतीय क्रीडाविश्वातील दिग्गजांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.
कौतुक आणि किताबांच्या वर्षावातही निवृत्तीकडे न वळलेल्या दीपाने आपली साहसी दौड जारी राखीत २०१८ मधील एशियन पॅरा गेम्समध्येही आपला ठसा उमटविला आणि आता देशातील सर्वोच्च क्रीडा किताब ‘खेलरत्न’ची मानकरी ठरली.
दीपाची ही धीरोदात्त, साहसी वाटचाल भारतीय पॅरा-ऍथलेट्‌स तथा इतरांनाही प्रेरणादायी ठरावी.
चौकट
‘खेलरत्न’ किताब विजेते खेळाडू
खेळ सन
१. विश्वनाथन् आनंद बुद्धिबळ १९९२
२. गीत सेठी बिलियर्डस् १९९३
३. होमी डी मोतीवाल यॉटिंग १९९४
४. पुष्पेंद्र कुमार गर्ग यॉटिंग १९९४
५. कर्नाम मलेश्‍वरी भारत्तोलन १९९६
६. कुंजुरानी देवी भारत्तोलन १९९७
७. लियांडर पेस लॉन टेनिस १९९८
८. सचिन तेंडुलकर क्रिकेट १९९८
९. ज्योतिर्मय सिकदर ऍथलेटिक्स १९९९
१०. धनराज पिल्ले हॉकी २०००
११. पी. गोपीचंद्र बॅडमिंटन २००१
१२. अभिनव बिंद्रा नेमबाजी २००२
१३. अंजली भागवत नेमबाजी २००२
१४. के. एम्. बीनामोल ऍथलेटिक्स २००२
१५. अंजू बॉबी जॉर्ज ऍथलेटिक्स २००३
१६. राज्यवर्धन सिंह राठोड नेमबाजी २००४
१७. पंकज अडवाणी बिलिर्यडस/स्नूकर २००६
१८. मानवजीत सिंह संधू नेमबाजी २००६
१९. महेंद्र सिंह धोनी क्रिकेट २००७
२०. मेरी कोम मुष्टियुद्ध २००९
२१. विजेंदर सिंह मुष्टियुद्ध २००९
२२. सुशील कुमार कुस्ती २००९
२३. साइना नेहवाल बॅडमिंटन २०१०
२४. गगन नारंग नेमबाजी २०११
२५. विनय कुमार नेमबाजी २०१२
२६. योगेश्‍वर दत्त कुस्ती २०१२
२७ रंजन सोधी नेमबाजी २०१३
२८. सानिया मिर्झा लॉन टेनिस २०१५
२९. पी. व्ही. सिंधू बॅडमिंटन २०१६
३०. दीपा करमाकर जिम्नॅस्टिक २०१६
३१. साक्षी मलिक कुस्ती २०१६
३२. जीतू राय नेमबाजी २०१६
३३. देवेंेद्र झाझारिया भालाफेक (पॅरा-ऍथलेट) २०१७
३४. सरदार सिंह हॉकी २०१७
३५. विराट कोहली क्रिकेट २०१८
३६. सैकोम मीराबाई चानू भारत्तोलन २०१८
३७. बजरंगु पुनिया कुस्ती २०१९
३८. दीपा मालिक पॅरा-ऑलिपिकपटू (पॅरा-ऍथलिट) २०१९