दिव्यांगांना मानधन देण्यात गोवा प्रथम

0
63

>> मात्र साधनसुविधा देण्यात मागे ः केंद्रीय दिव्यांग आयुक्त

गोवा राज्य दिव्यांगांना मानधन देण्यात देशपातळीवर प्रथम स्थानावर आहे. मात्र, दिव्यांगांना आवश्यक साधन सुविधा उपलब्ध करण्याबाबत मागे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय दिव्यांग मुख्य आयुक्त डॉ. कमलेश कुमार पांडे यांनी पत्रकार परिषदेत काल केले. केंद्रीय दिव्यांग मुख्य आयुक्त डॉ. पांडे यांनी समाज कल्याण खात्याचे सचिव, समाज कल्याण खात्याचे संचालक, तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणार्‍या स्वयंसेवी संस्थांशी चर्चा करून दिव्यांग व्यक्तींसाठीच्या साधन सुविधा व इतर कार्याचा आढावा घेतला.

सरकारच्या विविध खात्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या जागांबाबत अहवाल तयार करण्याची सूचना डॉ. पांडे यांनी केली आहे. दिव्यांग व्यक्तीच्या नवीन नियम तयार करून अंमलबजावणी करावी. नवीन नियमांचा मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसुदा मंजुरीसाठी कायदा खात्याकडे पाठविण्यात आला आहे. नवीन नियमावलीच्या तयार करण्याच्या कामाला गती देण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही पांडे यांनी सांगितले.

गोवा सरकारने दिव्यांग आयुक्तांची नियुक्ती केली होती. परंतु, दिव्यांग आयुक्तांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आयुक्तपद रिक्त आहे. नवीन दिव्यांग आयुक्तांची नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकार्‍यांकडून मिळाली, असेही पांडे यांनी सांगितले.
सरकारच्या ३१ इमारतीत दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसाठी आवश्यक साधन सुविधा तयार करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. या कामावर सुमारे ९ कोटी खर्च अपेक्षित आहे.

गोव्यात ३३ हजार दिव्यांग नोंद
गोव्यात आत्तापर्यत ३३ हजार दिव्यांगांची नोंदणी झालेली आहे. त्यातील २४ हजार ४८९ दिव्यांगाना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. गोवा सरकारने दिव्यांग विभागासाठी स्वतंत्र खाते तयार केलेले नाही. दिव्यांगांसाठी स्वतंत्र खाते निर्माण करणारे आंध्रप्रदेश पहिले राज्य आहे. त्यानंतर कर्नांटक, तामिळनाडू इतर राज्यांनी दिव्यांग विभागासाठी स्वतंत्र खाते तयार केले आहे, असे पांडे यांनी सांगितले.