दिवस मैत्रीचा!

0
262

– सौ. कल्पना सु. जाधव (पणसुले-धारबांदोडा)

आपलं जीवन मैत्रीशिवाय अपूर्ण असतं. कारण आपल्या मनातील भावना, संवेदना एकमेकांबरोबर वाटून घेतल्या तरच मनावरचं ओझं कमी होतं आणि जगणं खूप सोपं होऊन जातं. निर्मळ आणि स्वच्छ मन असेल तर वाटचाल सुंदर होते आणि पवित्र असं मैत्रीचं नातं अखेरपर्यंत सोबत राहतं.

तशी मी या ‘फ्रेंडशिप डे’च्या विरोधातच असायची. माझी मुलगी हातात दरवर्षी रिबन बांधून घरी आली की मी म्हणायची, ‘‘काय त्या चिंध्या बांधून फ्रेन्डशिप-डे साजरा करताय! मैत्री काय अशी चिंध्या बांधून साजरी करताय काय? त्या मैत्रीची नवलाई काय? सोंगं करायची नुसती. आम्हाला पण मैत्रीणी होत्या, पण आम्ही कधी अशी हातात रिबन बांधून मैत्री केली नाही.’’ यावर माझी मुलगी म्हणायची, ‘‘अगं मम्मी, मैत्रीमधला गोडवा टिकून राहण्यासाठी हे बांधावं लागतं.’’ तेव्हा मी ऐकून हसण्यावर सोडून देत असे.
असेच दिवस गेले. माझ्या लग्नाला ३१वे वर्ष चालू आहे. मी माहेरी गेले असता मी व माझी मोठी बहीण… आम्ही तिला आक्का म्हणतो. ती, मी व तिचे मिस्टर म्हणजे माझे दाजी स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो होतो. तिथे माझी मैत्रीण सौ. पद्मा भेटली. मला खूप आनंद झाला. खूप दिवसांच्या भेटीने खुश झालो. मग ती म्हणाली, ‘‘अगं आपल्या वर्गात ती वैशाली मोहिते होती बघ, ती आत्ताच भेटून गेली. जरा चुकली. तुझी आणि तिची भेट झाली असती. ती आत्ताच गेली.’’
मी म्हणाले, ‘‘चल तिच्या घरी जाऊन भेटू या.’’
तेव्हा ती म्हणाली, ‘‘ती काय भेटणार आता? ती आमदाराची बायको आहे. त्या दोघांच्या हस्ते मंदिरात आज आरती होती, म्हणून आली होती ती’’. तिच्याबरोबर गप्पा-गोष्टी करून मी घरी आले. घरी आल्यावर मोठ्या कौतुकाने मी सांगू लागले, ‘‘माझी मैत्रीण.. वैशाली आहे ना, ती आमदाराची बायको आहे.’’ दाजी म्हणाले, ‘‘नाव काय आहे त्यांचं?’’ मी नाव सांगितले – ‘‘वैशाली मोहिते- माहेरचं नाव. आता नाव काय आहे… माहिती नाही.’’
दाजी म्हणाले, ‘‘मी ज्या आमदारांना ओळखतो, त्यांच्या बायकोचे नाव वैशाली आहे. मी त्यांना वैशालीताई म्हणतो. त्या जर तुमच्या मैत्रीण असतील तर मी तुमची भेट घालून देतो’’.
त्याच दिवशी मी, दाजी व आक्का त्यांच्या घरी गेलो असता कळले की ती माझी मैत्रीण वैशालीच होती. ३१ वर्षांनी एकमेकींना भेटून खूप आनंद झाला आम्हाला. त्याच भेटीत आम्ही ठरवलं, शाळेतील ज्या मैत्रिणी आम्हाला भेटतील, त्यांना आम्ही एकत्र भेटू या व एक दिवस एकत्र घालवू या. त्याप्रमाणे मी व सर्वांनी भेटून, फोन करून वैशालीच्या घरी जमायचे ठरले.
त्यानुसार ११ जणी खूप वर्षांनी एकत्र भेटलो. काय तो आनंद! शब्दात सांगता येणार नाही. रडू की हसू असे झाले होते. इतक्या वर्षांनी भेटलो… आपण स्वर्गातच आहे असे वाटले. त्यावेळी कळले की मैत्री फुलासारखी… आयुष्य गंधित करणारी… ज्योतीसारखी जीवन उजळून टाकणारी असते. मैत्री फुलासारखी आयुष्यात दरवळते. मैत्री या नात्याला ओंजळीत पकडून लाखमोलाची करण्याची कला आपल्याला आत्मसात करायला हवी. मैत्री आपल्या जन्माबरोबर येते आणि मृत्युनंतरही चिरंतन राहते. अशा मैत्रीला आपल्याला अनमोल मोत्यासारखे गुंफता आले पाहिजे. स्वच्छ नितळ मैत्री… ज्यामध्ये काही अपेक्षा नसतात. सोनेरी पान म्हणजे मैत्री. हे सगळं शक्य झालं ते वैशालीमुळे! आम्ही ११ मैत्रिणी एकत्र येऊन एकमेकांची सुखं-दुःखं वाटून घेतली. मधल्या काळातील वर्षे कशी गेलीत याबद्दल बोलणे झाले.
वैशालीची श्रीमंती! खरं तर मैत्रीमुळे तिच्या मनाची श्रीमंती कळून आली. लोकांच्या दृष्टीने ती आमदार राजेश क्षीरसागर यांची बायको… परंतु आम्हाला आमची मैत्रीण- वैशालीच! मला व माझ्या मैत्रिणींना शाळेतले दिवस परत मिळाले. तो निखळ आनंद. आपलं जीवन मैत्रीशिवाय अपूर्ण असतं. कारण आपल्या मनातील भावना, संवेदना एकमेकांबरोबर वाटून घेतल्या तरच मनावरचं ओझं कमी होतं आणि जगणं खूप सोपं होऊन जातं. निर्मळ आणि स्वच्छ मन असेल तर वाटचाल सुंदर होते आणि पवित्र असं मैत्रीचं नातं अखेरपर्यंत सोबत राहतं.