दिल्ली कॅपिटल्स-चेन्नई सुपर किंग्सचे लक्ष्य अंतिम फेरी

0
90

>> आज विशाखापट्टणमध्ये क्वॉलिफायर-२ लढत

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज विशाखापट्टणमध्ये आयपीएलच्या १२व्या पर्वाचा क्वॉलिफायर-२ सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सला प्रथमच आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची संधी आहे. परंतु त्यांना तीन वेळच्या जेत्या आणि चार वेळच्या उपविजेत्या अनुभवी महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर मात करावी लागणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सने चेपॉकवर झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर ८० धावांनी मात करीत गुणतक्त्यात अव्वल दोन संघांत स्थान मिळविले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यासमोर क्वॉलिफायर-२मध्ये आव्हान असेल ते कल्पक कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचे. बुधवारी झालेल्या एलिमिनेटर लढतीत गुणी फलंदाज ऋषभ पंतच्या शानदार ४९ धावांच्या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्से रोमहर्षक लढतीत सनरायझर्स हैदराबाद संघावर २ गड्यांनी मात केली होती. ऋषभ पंत एक चुकीचा फटका मारून माघारी परतल्यानंतर शेवटच्या दोन षट्‌कांत हैदराबादच्या गोलंदाजांनी सामना आपल्याकडे फिरवला होता. परंतु अंतिम षट्‌काच्या पाचव्या चेंडूवर दिल्लीने चौकार खेचत विजय मिळवित क्वॉलिफायर-२साठी पात्रता मिळविली.

या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सचे मनोबल उंचावलेले असेल. ऋषभ पंतने संघाच्या विजयात जरी मोलाचा वाटा उचलला असला तरी त्याला ‘मॅच फिनिशर’ बनता आले नाही. त्याच्या चुकीच्या फटक्यामुळे त्याच्यावर काल टीकाही झाली. त्यामुळे तो आज एक विजयी खेळी करून आपल्या टीकाकार्‍यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असेल.
अन्य एक युवा खेळाडू पृथ्वी शॉने ५६धावांची अर्धशतकी खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. दिल्लीसाठी एक उत्कृष्ट सलामीवीर म्हणून तो आपली भूमिका योग्यप्रकारे निभावत आहे. आजही महत्त्वाच्या सामन्यात तो आपले उपयुक्त योगदान देण्याच्या इराद्यात असेल. दिल्ली संघाने या मैदानावर एलिमिनेटर लढत खेळलेली आहे. त्याचा फायदा त्यांना निश्‍चितच होईल.

दिल्लीला त्यांचा स्टार गोलंदाज कगिसो रबाडाच्या अनुपस्थितीत खेळावे लागत आहे. असे असले तरी ट्रेंट बौल्ट आणि ईशांत शर्मा यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. किमो पॉलनेही त्यांना चांगली साथ दिली आहे. कालच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्याने ३ बळी मिळविले होते. अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्रा प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे.
विशाखापट्टणमधील खेळपट्टी ही फिरकीला तेवढीशी पोशक नसली तर इम्रान ताहिर आणि अनुभवी हरभजन सिंग यांच्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीला सामोरे लागणार आहे. ते त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

दुसर्‍या बाजूने तीन वेळ आयपीएल स्पर्धा जिंकेल्या आणि चार वेळा उपविजेतेदावर समाधान मानाव्या लागलेल्या धुरंधर धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आपले चौथे अजिंक्यपद मिळविण्यासाठी प्रयत्नरत असेल. त्यांना क्वॉलिफायर-१मध्ये मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु धोनीकडे आपल्या ‘स्टाईल’ने पुनरागमन करण्याची कला अवगत आहे. प्रत्येक वेळी ‘लक’ फॅक्टरही त्याच्यासाठी उपयुक्त ठरतो.

मुंबईकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर धोनी फलंदाजीच्या विभागात सुधार करण्याच्या प्रयत्नात असेल. त्यासाठी त्याला त्याच्या प्रमुख फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. स्टार सलामीवीर शेन वॉटसनकडून या महत्त्वाच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. मुंबईद्द्धिच्या लढतीत घरच्या मैदानावरील खेळपट्टीचा अंदाज त्यांना घेता आला नव्हता. त्यामुळे धोनीने आपल्या फलंदाजांना योग्य फटक्यांची निवड करण्याची ताकिदही दिली असेल.

संभाव्य संघ ः चेन्नई सुपर किंग्स : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), अंबाती रायुडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, हरभजन सिंग, इम्रान ताहिर, मुरली विजय, ध्रुव शौरे, फाफ डुप्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मिचेल सँटनर, डेव्हिड विली, सॅम बिलिंग्स, समीर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, केएम आसिफ, मोहित शर्मा.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), पृथ्वी शॉ, अमित मिश्रा, अवेश खान, राहुल तेवतिया, जयंत यादव, कोलिन मुन्रो, क्रिस मॉरिस, संदीप लामिछाने, ट्रेंट बौल्ट, शिखर धवन, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बँस, नाथू सिंह, कोलिन इंग्राम, शेर्फन रदरफोर्ड.