दिल्ली आणि चेन्नईन लढत गोलशून्य

0
85
Karanjit Singh Goalkeeper of Chennaiyin FC saves during match 16 of the Hero Indian Super League 2018 ( ISL ) between Delhi Dynamos FC and Chennaiyin FC held at Jawaharlal Nehru Stadium, New Delhi, India on the 23rd October 2018 Photo by: Deepak Malik /SPORTZPICS for ISL

दिल्ली
इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात फॉर्मसाठी झगडत असलेला गतविजेता चेन्नईन एफसी आणि दिल्ली डायनॅमोज एफसी यांच्यातील नीरस लढतीत अखेर गोलशून्य बरोबरी झाली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला, पण त्यांच्यासमोरील समस्यांचा डोंगर कायम राहिला.
दिल्लीच्या तुलनेत चेन्नईयीनचे प्रयत्न जास्त होते, पण त्यांना अचूकता साधता आली नाही. दुसर्‍या मिनिटाला चेन्नईयीनने प्रयत्न केला. डावीकडून थोई सिंगने मारलेल्या चेंडूवर एली साबिया याने हेडिंग केले, पण दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याने चपळाईने डावीकडे जात अडविला. चौथ्या मिनिटाला दिल्लीच्या लालियनझुला छांगटे याने डावीकडून आगेकूच केली, पण त्याने अकारण जास्त ताकद लावल्यामुळे चेंडू वरून गेला. त्यानंतर दोन्ही संघांना स्थिरावण्यासाठी वेळ लागला. १८व्या मिनिटाला चेन्नईयीनच्या इसाक वनमाल्साव्मा याने डावीकडून चेंडू मारला, पण साबिया याला उडी घेण्याचे टायमिंग साधता आले नाही. त्यामुळे त्याची हेडिंगची संधी हुकली.
३७व्या मिनिटाला दिल्लीकडून छांगटेने प्रयत्न केला, पण चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग याने चपळाईने नेट सुरक्षित राखले. ४२व्या मिनिटाला कार्लोस सालोम याने उजवीकडे थोईच्या दिशेने पास दिला. हा चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या पायाला लागून पुन्हा थोईकडे आला. थोईने फटका मारला, पण डोरोन्सोरोने पंच टाकून चेंडू थोपविला.
४५व्या मिनिटाला दिल्लीला पहिल्या सत्रातील सर्वोत्तम संधी मिळाली. छांगटेने डावीकडून आगेकूच केली. त्याने क्लाऊडेरोविच याला अप्रतिम पास दिला, पण हेडिंगवरील प्रयत्नानंतर चेंडू थेट करणजीतच्या हातात गेला. तेव्हा मार्किंग नसल्यामुळे क्लाऊडेरोविचने सरस फटका मारायला हवा होता.
दुसर्‍या सत्रात ४९व्या मिनिटाला दिल्लीच्या मिहेलीच याच्या ताब्यातून चेंडू मिळवित रफाएल आगुस्तोने घोडदौड केली. डावीकडून मुसंडी मारणारा सहकारी कार्लोस याच्या दिशेने त्याने धुर्त पास दिला. कार्लोसने बॉक्समध्ये प्रवेश करीत चेंडू मारला, पण तो अचूकता साधू शकला नाही. ५४व्या मिनिटाला ओरलँडीने डावीकडून थोईकडे चेंडू मारला. थोईने उडी मारली, पण चेंडू त्याच्या डोक्यावरून गेला. ५८व्या मिनिटाला दिल्लीच्या नारायण दासने डावीकडून आगेकूच करीत नंदकुमार शेखरला पास दिला. नंदकुमारने उजव्या पायाने मारला फटका भेदक नव्हता. त्यामुळे करणजीतने चेंडू सहज अडविला.
६३व्या मिनिटाला चेन्नईयीनच्या ओरलँडीने डावीकडून फ्री किकवर मारलेला चेंडू रोखण्यासाठी दिल्लीचा गोलरक्षक डोरोन्सोरो पुुढे सरसावला, पण त्याला कार्लोसने धरून ठेवले. चेंडू पडला आणि झुईवर्लून याच्या हाताला लागला, पण डोरोन्सोरोला त्याआधीच फाऊल करण्यात आले होते. त्यामुळे चेन्नईयीनला पेनल्टी मिळू शकली नाही. ७०व्या मिनिटाला डोरोन्सोरोच्या चपळाईने दिल्लीला तारले.