दिल्लीत हिंसाचाराच्या उद्रेकात १३ मृत्यूमुखी

0
156
New Delhi: Protestors hurl brick-bats during clashes between a group of anti-CAA protestors and supporters of the new citizenship act, at Jafrabad in north-east Delhi, Monday, Feb. 24, 2020. (PTI Photo/Ravi Choudhary)(PTI2_24_2020_000254B) *** Local Caption ***

>> हिंसाचारग्रस्त भागांत निदर्शकांवर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

देशाच्या राजधानीत गेल्या रविवारी सुरू झालेले हिंसाचाराचे थैमान सुरूच राहिल्याने काल ईशान्य दिल्लीतील भागांमध्ये निदर्शकांवर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह १३ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे दिडशेजण जखमी झाले आहेत. अनेकांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

जीटीबी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक सुनील कुमार यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, की हिंसाचारात गंभीर जखमी झाल्यानंतर काल चारजणांना मृतावस्थेत या इस्पितळात आणण्यात आले. दरम्यान, सोमवारी झालेल्या खुरेजी खास या भागात संचारबंदी लागू करण्यात येऊन पोलीस व शीघ्र कृती दलाचे (आरएएफ) जवान तैनात करण्यात आले आहेत.

सुनीलकुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘आज चार मृतदेह या ठिकाणी आणण्यात आले. सोमवारी पाचजण मृत्यूमुखी पडले होते. दरम्यान, संध्याकाळी उशिरा दिल्ली पोलिसांनी ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात एकूण ११ जण मृत्यूमुखी पडल्याचे जाहीर केले.
भजनपुरा व खुरेजी खास या तणावग्रस्त भागात संचारबंदी लागू झाल्यानंतर आरएएफचे जवान व पोलिसांचे ध्वज संचलनही तेथे झाले. दरम्यान, सोमवारी हिंसाचारात मरण पावलेले पो. कॉन्स्टेबल रतन लाल (वय ४२) यांच्यावर काल अंत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी नायब राज्यपाल अनिल बैजल व पोलीस आयुक्त अमुल्य पटनाईक हेही उपस्थित होते.

दंगलग्रस्त भागांत दिल्ली
पोलिसांकडून ध्वज संचलन
भजनपुरा व खुरेजी खास या हिंसाचारग्रस्त भागांतील ध्वज संचलनाचे नेतृत्व विशेष पोलीस आयुक्त सतिश गोलचा व प्रवीर रंजन यांनी केले. या संदर्भात गोलचा यांनी माहिती दिली की आम्ही स्थितीनुसार कृती करत आहोत. आवश्यकतेनुसार पोलीस कुमक वापरली जात आहे. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या वापराबरोबरच लाठीमार करण्यात आल्याचे ते म्हणाले. दंगेखोरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली.

माध्यम प्रतिनिधीना
निदर्शकांकडून धमक्या
हिंसक घटनांचे वार्तांकन करणार्‍या अनेक पत्रकारांनी कर्तव्य बजावताना त्यांना कशाप्रकारे वागणूक मिळाली त्याची माहिती सोशल मिडियावर दिली आहे. काही पत्रकारांना त्यांचा धर्म कोणता हे निदर्शकांकडून विचारण्यात आले. पत्रकारांना धमकावण्यात आले.
ईशान्य दिल्ली जिल्ह्यातील चांदबाग, जाफराबाद, करवालनगर, भजनपुरा या भागांत काल अनेक दुकाने, वाहने यांची जाळपोळ, नासधूस करण्यात आली. निदर्शकांच्या गटांनी परस्परांवर दगडफेक, पेट्रोल बॉम्ब फेकले. या घटनांमध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश परिवहन मंडळाच्या एका प्रवासी बसची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली असून यावेळी निदर्शकांकडून प्रवाशांचीही सतावणूक करण्यात आली. त्याआधी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह हिंसाचारप्रकरणी सर्वपक्षीय बैठक घेऊन चर्चा केली होती.

निदर्शकाच्या गोळीबारात पत्रकार जखमी ः प्रकृती गंभीर

ईशान्य दिल्लीत हिंसाचाराचे वृत्तांकन करणार्‍या पत्रकारांवरही निदर्शकांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. एका वृत्त संस्थेचा पत्रकार निदर्शनकाने झाडलेली गोळी लागून जखमी झाला आहे. तर अन्य एका वृत्त संस्थेच्या दोन पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. आकाश नामक पत्रकार मौजपूर येथे हिंसाचाराचे वृत्तांकन करत असताना त्याला गोळी लागली. त्याला इस्पितळात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सदर वृत्तसंस्थेने ही माहिती ट्विट केली आहे. तसेच अन्य एका वृत्त संस्थेच्या अरविंद गुणसेकर व सौरभ यांनाही मारहाण झाली आहे.