दिल्लीतील उद्याच्या उपोषणात पंतप्रधानांचाही सहभाग

0
103

कॉंग्रेस पक्षाने दलितांविरुद्ध होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ देश पातळीवर उपोषण केल्याच्या दोन दिवसांनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाध्यक्ष अमित शहा हेही उद्या गुरुवारी एक दिवस उपोषणास बसणार आहेत. संसदेचे कामकाज विरोधकांकडून अनेक दिवस ठप्प केल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान व भाजपाध्यक्ष खासदारांसह उपोषण करणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर दिल्लीतील या उपोषणात भाजपाचे खासदार सहभाग होणार आहेत. तर भाजपाध्यक्ष अमित शहा कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंतले असल्याने ते हुबळी येथील उपोषण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सोमवारी कॉंग्रेसने देशभरात उपोषण कार्यक्रम केले. मात्र दिल्लीतील त्यांच्या उपोषणाच्या सुरूवातीसच दिल्लीतील १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी जगदिश टायटलर व सज्जन कुमार यांनी उपस्थिती लावल्याने त्याबाबत वाद निर्माण झाला.

गोव्याच्या खासदारांचे
पणजीत उपोषण
दरम्यान या उपोषणाचा भाग म्हणून गोव्याचे तीन खासदार अनुक्रमे श्रीपाद नाईक, नरेंद्र सावईकर व विनय तेंडुलकर हे उद्या गुरुवारी पणजी येथील आझाद मैदानावर उपोषाणास बसणार असल्याची माहिती गोवा भाजप सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी पत्रकारांना दिली.