दिल्लीचे तख्त कोण सर करणार?

0
91

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
महाराष्ट्र आणि हरयाणा या राज्यांच्या पाठोपाठ जम्मू-काश्मीर, झारखंड या राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात महाराष्ट्र, हरयाणा व झारखंडमध्ये भाजपची सरकारे सत्तेवर आली. येनकेन प्रकारे जम्मू काश्मीरमध्येही आपला झेंडा फडकवायचा पण भाजपने केलेला आहे.
आपण केंद्रात तर सिंहासनावर बसलो, आता राजधानी दिल्लीचेही तख्त सर करावयाचे मनसुबे भाजपा उराशी बाळगून आहे. यासाठी आम आदमी पार्टीच्या किरण बेदी यांना आपल्या गोतावळ्यात घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपदावर आरूढ करण्यासाठी भाजपने आपली रणनीती आरंभली आहे. अर्थात नुकत्याच पक्षात आलेल्या बेदींना चक्क मुख्यमंत्री बनवायचे याला कट्टर भाजपवाल्यांचा विरोध असला, तरी बेदी मोदींना हव्या आहेत. त्यामुळे विरोधी सूर लावण्याचे धाडस पक्षशिस्तीच्या नावाखाली भाजपा करणार नाही, हे उघड गुपित आहे.
‘आप’चे उमेदवार म्हणून पुनश्‍च दिल्लीच्या तख्तावर बसू पाहणारे अरविंद केजरीवाल सध्या तरी एकाकी पडल्याचे दिसते. केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची स्थापना केल्यानंतर बेदींनी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात स्वतःला झोकून दिले होते, पण कालांतराने त्यांना भाजपाने भुरळ घातल्यामुळे आप, अण्णा यांना सोडचिठ्ठी देऊन त्यांनी दिल्लीच्या तख्तावर विराजमान होण्याचा विडा उचलला आहे.
आपले मुख्य प्रतिस्पर्धी अरविंद केजरीवाल यांच्याशी दोन हात करण्यासाठी आपल्या पोलिसी खाक्याचा उपयोग करीत त्यांनी ‘जिंकू किंवा मरू’चे आव्हान ‘आप’ पुढे उभे केले आहे. दिल्लीत भाजपा, आप व कॉंग्रेस अशी तीन राजकीय पक्षांमध्ये तिरंगी लढत असली, तरी मोदी बेदीसाठी या रणांगणात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्यामुळे किरण बेदींचा विजयाचा किरण उजळला आहे, तर ‘आप’ ही आपले सगळे डावपेच पणाला लावायच्या तयारीत आहे.
अण्णा हजारे यांनी भाजपा, कॉंग्रेसच्या वाटेने चालली असल्याची टीका करून वातावरणामध्ये रंगत आणली आहे, तर कॉंग्रेस सावधगिरीने युवाशक्तीला पुढे करून आपले पत्ते खेळत असल्याचे दिसत आहे. काही असले, तरी कॉंग्रेसने अनेकदा दिल्लीचे तख्त सर केले असल्यामुळे यावेळी मतदार आपल्या दगा येणार नाहीत, या आशेवर भाजपाने दिलेल्या आश्‍वासनांना हरताळ फासल्याचा प्रचार करीत आपले घोडे पुढे दमटावण्याचा प्रयत्न तो पक्ष करीत आहे. पण ही निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची व ‘आप’साठी अस्तित्वाची लढाई ठरणार असा आजपर्यंतचा प्रचार पाहता म्हणता येईल व प्रतिष्ठा व अस्तित्व अशा दोलायमान परिस्थितीत या दोन्ही पक्षांमधील केंद्रबिंदूला कॉंग्रेस कसा छेद देईल यावर त्या पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.
भाजपाने महिलांना सक्षम करण्याचा विडा उचलला असून किरण बेदींना दिल्लीच्या सिंहासनावर बसवून शीला दीक्षितांना धडा शिकवायचा व बेदींना स्त्रीशक्तीचा पाठिंबा जास्तीत जास्त मिळावा, म्हणून आम आदमी पार्टीमध्ये असलेल्या शाजिया इल्मी व समाजवादी पार्टीमध्ये असलेल्या माजी लोकसभा सदस्या जयाप्रदा यांना भाजपात प्रवेश देऊन त्यांना किरण बेदींच्या प्रचारात महत्त्वाचे स्थान द्यायचेही भाजपाच्या गोटात शिजले असल्याचे वृत्त आहे.
स्वतः पंतप्रधानांनी दिल्लीच्या सर्व समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे आश्वासन दिलेले असल्यामुळे दिल्लीवाले ‘अच्छे दिन’ येण्यासाठी कसे काय मतदान करतात, यावर कुठला पक्ष विजयाच्या जवळपास जातो, याकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक रामलीला मैदानावर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अंदाजे ६० ते ७० हजार लोकांच्या उपस्थितीत फोडला, त्याची चर्चा मात्र रंगून व रंगवून सांगितली जात आहे.
त्यावर कुरघोडी म्हणून आप व कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात असले, तरी भाजपा हा ‘यू टर्न’ मारणारा एकमेव राजकीय पक्ष कसा आहे, परदेशातील काळा पैसा शंभर दिवसांत आमच्या देशात आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करणार म्हणून कशी लोणकढी थाप मारून जनतेला झुलवत ठेवत आहे, या सारख्या गोष्टी सांगून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न हे पक्ष करीत आहेत.
माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना तूर्त थोडे बाजूला ठेवून अजय माकन या युवा नेत्याला पुढे करण्याचे धाडस कॉंग्रेसने केले आहे. युवा पिढी कॉंग्रेसच्या या महत्त्वाच्या बदलाला कसा प्रतिसाद देते, यावर कॉंग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. कॉंग्रेस पक्ष तिसर्‍या स्थानी फेकला जाण्याची चिन्हे आहेत असे वृत्तवाहिन्या सांगत आहेत.
होऊ घातलेल्या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे हळूहळू वाढत जाणार्‍या पक्षीय प्रचारात लोकांना अवगत होणार आहे. तूर्त निवडणुकांचे बिगुल फुंकले गेले आहे. या निवडणुकीत दिल्लीचे तख्त सर करण्यासाठी मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात हे लवकरच कळेल. दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने साहजिकच देशभरामध्ये या निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता आहे.