दिल्लीची लढाई

0
117

दिल्लीमध्ये निवडणुकीचे पडघम निनादले आहेत. लवकरच म्हणजे येत्या सात फेब्रुवारीला तेथे निवडणूक होणार आहे. निवडणुकीनंतर आपला पक्ष आम आदमी पक्षाला पाठिंबा देईल असे शीला दीक्षित म्हणाल्या, त्या अर्थी दिल्लीमध्ये पंधरा वर्षे सत्ता उपभोगणारी कॉंग्रेस आधीच आपला पराभव मान्य करून बसली आहे. त्यामुळे यावेळी दिल्लीत खरा सामना मोदी आणि केजरीवाल यांच्यातच होईल हे उघड आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या सातपैकी सातही जागा भाजपने जिंकून दिल्ली पूर्णपणे भगवी केली होती. आता केंद्रात पक्षाचे सरकार आहे, त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणूकही सहज जिंकू असा आत्मविश्वास भाजपाला असल्याचे दिसते. रामलीला मैदानावर नुकतीच झालेली मोदींची विराट सभही त्या पक्षाचे मनोबल उंचावून गेली आहे. दुसरीकडे आम आदमी पक्ष आपला पिच्छा पुरवणार्‍या अराजकवाद्याच्या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी धडपडतो आहे. दिल्लीची सत्ता मिळूनही अवघ्या ४९ दिवसांत राजीनामा देऊन मोकळे झालेले केजरीवाल पुन्हा एकवार मफलर गुंडाळून मोदींचा सामना करण्यास सज्ज झालेले आहेत. पण त्यांना सर्वांत आधी आपली नकारात्मक प्रतिमा पुसून टाकण्यासाठी जंग जंग पछाडावे लागतील. रामलीला मैदानावरील सभेत पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांच्यावर थेट भेदक हल्ला चढवला होता. ज्यांना अराजक पसरवायचे असेल, त्यांनी नक्षलवाद्यांना जाऊन सामील व्हावे असे मोदी म्हणाले होते. केजरीवाल हे अराजक निर्माण करतील, सरकार चालवू शकणार नाहीत, धरणी आणि आंदोलनांत आपली शक्ती व्यर्थ घालवतील असे मोदींना सूचित करायचे होते. केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यात आपली चूक झाली हे मान्य केलेले असले, तरी दिल्लीचे सुशिक्षित मतदार त्यांना तेवढ्याने क्षमा करतील का हा खरा प्रश्न आहे. केजरीवाल यांची स्वच्छ व प्रामाणिक नेत्याची प्रतिमा हे त्यांचे बलस्थान आहे. आम आदमी पक्षाचे ते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. याउलट भाजपापाशी असा मुख्यमंत्रिपदाचा नेता अद्याप नाही. डॉ. हर्षवर्धन आता केंद्रात मंत्री बनले आहेत. अशावेळी केजरीवालांचा सामना करण्यासाठी एक सक्षम चेहरा भाजपाला आधी पुढे करावा लागेल. या दोन्ही पक्षांची भिस्त आपापल्या मतदारांवर आहे. भाजपची मदार मुख्यत्वे दिल्लीच्या शहरी, सुशिक्षित मध्यमवर्गीय मतदारांवर आहे. सुशासन आणि विकासाच्या मार्गाने नेण्याची ग्वाही देत त्या मतदारांना आकृष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, तर केजरीवालांचा आम आदमी पक्ष खरोखरच्या आम आदमींना भुरळ घालण्यामागे लागलेला आहे. झोपडपट्‌ट्यांत राहणारे, छोटे – मोठे व्यवसाय करणारे वगैरेंवर केजरीवालांची मदार आहे. त्यामुळे या आपल्या पारंपरिक मतपेढीपलीकडचे मतदार आकृष्ट करण्याची अहमहमिका दोन्ही पक्षांत लागलेली दिसते. दिल्लीतील जवळजवळ दोन हजार बेकायदेशीर वसाहतींना कायदेशीर करण्याची घोषणा केंद्र सरकारने करून केजरीवाल यांच्या मतपेढीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीवासियांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय म्हणजे वीज, पाणी, वाहतूक, पार्किंग अशा मूलभूत सुविधांशी निगडित प्रश्न. गेल्या निवडणुकीत केजरीवाल यांनी त्याच विषयांना हाताशी धरून मतदारांवर आपला प्रभाव पाडला होता. सातशे लीटरपर्यंत मोफत पाणी, पन्नास टक्के वीज बिल वगैरे घोषणा केजरीवाल यांनी तेव्हा केल्या आणि त्यांच्या अंमलबजावणीतील अडचणींचे अर्थकारण समजून न घेता त्या लागूही केल्या. आता पुन्हा एकवार त्याच आश्वासनांनिशी केजरीवाल मैदानात उतरलेले आहेत. भाजपानेही यावेळी केजरीवाल यांच्या हातची ‘बिजली – पानी’ ची अस्रे निकामी करण्याचा सपाटाच लावलेला दिसतो. अखंडित वीज पुरवठा, ग्राहकांना आपल्याला हव्या त्या कंपनीकडून वीज पुरवठा मिळवण्यासाठी पोर्टेबिलिटीची सोय अशा घोषणा मोदींनी केल्या आहेत. केजरीवाल यांचे कौशल्य धरणे धरणे धरण्यात आहे, आमचे सरकार चालवण्यात असे मोदींनी रामलीला मैदानावरील सभेत जाहीर केले आणि केजरीवाल यांच्यावरही थेट टीकास्त्र सोडले, त्यामागे केजरीवाल यांची नकारात्मक प्रतिमा अधिक ठळक करण्याचा आणि निकाली काढण्याचा मनोदय स्पष्ट दिसतो. ते खरोखर निकाली निघतील की मोदींवर मात करतील हे दिल्लीचे मतदार ठरवणार आहेत!