दिमित्रोव, स्वितोलिनाचे आव्हान आटोपले

0
133
Serbia's Novak Djokovic reacts during his men's singles third round match against Spain's Roberto Bautista Agut, on day six of The Roland Garros 2018 French Open tennis tournament in Paris on June 1, 2018. / AFP PHOTO / CHRISTOPHE ARCHAMBAULT

>> जोकोविच, झ्वेरेव, वर्दास्को, वॉझनियाकी, निशिकोरी, बुस्टा उपउपांत्यपूर्व फेरीत

फ्रेंच ओपन स्पर्धेत काल शुक्रवारीदेखील सनसनाटी निकालाची मालिका कायम राहिली. पुरुष एकेरीत चौथ्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव याला व महिला एकेरीत चतुर्थ मानांकित इलिना स्वितोलिना यांना पराभव पत्करावा लागला.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या व चौथ्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव या बल्गेरियाच्या खेळाडूचे आव्हान तिसर्‍याच फेरीत आटोपले. तिसाव्या मानांकित स्पेनच्या फर्नांडो वर्दास्कोने दिमित्रोवला ७-६, ६-२, ६-४ असे सरळ तीन सेटमध्ये स्पर्धेबाहेर फेकले. वर्दास्कोला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्यासाठी विसाव्या मानांकित नोवाक जोकोविच याचे आव्हान मोडीत काढावे लागणार आहे. महिला एकेरीतही सनसनाटी निकालाची नोंद झाली. संभाव्य विजेत्यांमध्ये स्थान देण्यात आलेल्या चौथ्या मानांकित इलिना स्वितोलिना हिला ३१व्या मानांकित मिहाइला बुझारनेस्कू हिने ६-३, ७-५ असे हरवून खळबळ उडवून दिली आहे. कालच्या दिवसातील हा सर्वांत धक्कादायक निकाल ठरला. महिला एकेरीत द्वितीय मानांकित कॅरोलिन वॉझनियाकी हिला मात्र विजयासाठी केवळ १ तास १८ मिनिटे पुरेशी ठरली. तिने फ्रान्सच्या पॉलिन पारमेंटियर हिला ६-०, ६-३ असे सहज पराजित केले. पुढील फेरीत तिचा सामना १४व्या मानांकित दारिया कसातकिना हिच्याशी होणार आहे.

पुरुष एकेरीत दुसर्‍या मानांकित आलेक्झांडर झ्वेरेव याला बोस्निया अँड हर्जेगोविनाच्या दामिर झुमूर याने पाच सेट पर्यंत झुंजविले. अखेरीस झ्वेरेवने ६-२, ३-६, ४-६, ७-६, ७-५ अशी बाजी मारत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. हा सामना ३ तास ५४ मिनिटे चालला. विसाव्या मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने लाल मातीवर आपल्यापेक्षा सरस मानांकित खेळाडूला अचंबित करण्याची क्षमता आपल्यामध्ये अजूनही असल्याचे दाखवून दिले.

त्याने स्पेनच्या १३व्या मानांकित रॉबर्टो बाटिस्टा आगुट याला चार सेटमध्ये ६-४, ६-७, ७-६, ६-२ असे पराभूत करत ‘अंतिम १६’मध्ये आपला प्रवेश नक्की केला. पुरुष दुहेरीत भारताच्या दिवज शरण व युकी भांब्री यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ऑलिव्हर मराच व मॅट पाविच या द्वितीय मानांकित जोडीने भारतीय जोडीला ७-५, ६-३ असा बाहेरचा रस्ता दाखविला. अंतिम वृत्त हाती आले त्यावेळी मुसळधार पावसामुळे तिसर्‍या फेरीतील काही सामने स्थगित करण्यात आले होते.
मानांकित खेळाडूंचा निकाल ः पुरुष एकेरी ः तिसरी फेरी ः केई निशिकोरी (१९) वि. वि. गाईल्स सायमन ६-३, ६-१, ६-३, डॉमनिक थिएम (७) वि. वि. माटियो बार्रेटेनी ६-३, ६-७, ६-३, ६-२, पाब्लो कारेना बुस्टा (१०) पराभूत वि. मार्के सेसेचिनाटो ६-२, ६-७, ३-६, १-६.
महिला एकेरी ः तिसरी फेरी ः मॅडिसन कीज (१३) वि. वि. नाओमी ओसाका (२१) ६-१, ७-६, दारिया कसातकिना (१४) वि. वि. मारिया साकारी ६-१, १-६, ६-३, बार्बरा स्ट्रायकोवा (२६) वि. वि. कॅतरिना सिनियाकोवा ६-२, ६-३.