दिनेश चंदीमलवर बंदी

0
100

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंदीमल, प्रशिक्षक चंदिका हथुरासिंघा यांच्यावर दोन कसोटी व चार एकदिवसीय सामन्यांची बंदी घातली आहे. संघव्यवस्थापक असंका गुरुसिंघा यांच्यावर देखील याच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

मागील महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध सेंट ल्युसिया कसोटीच्या तिसर्‍या दिवशी श्रीलंकेच्या संघाने मैदानावर उतरण्यास नकार दिला होता. यामुळे जवळपास दोन तासांचा खेळ वाया गेला होता. चंदीमलला दोन कसोटी व चार एकदिवसीय सामन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागणार आहे. आयसीसी नियमावलीच्या तिसर्‍या दर्जा नियमातील कलम २.३.१चा (खेळभावनेला छेद देणारी वागणूक) भंग तिघांनी केल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याव्यतिरिक्त अजून ६ दोषांक या तिघांच्या खात्यात आयसीसीने जमा केले आहेत.

चेंडू कुरतडल्याप्रकरणी चंदीमलच्या खात्यात ४ दोषांक यापूर्वी जमा असल्याने त्याच्या दोषांकाची संख्या १० झाली आहे. पुढील २४ महिन्यांत चंदीमलच्या खात्यात कोणत्याही कारणासाठी २ दोषांक जमा झाल्यास त्याच्यावर तीन कसोटी किंवा ६ वनडे-टी-२० सामन्यांची बंदी घालण्यात येणार आहे. २०१६ साली सप्टेंबर महिन्यात दोषांक पद्धतीच्या वापरास सुरुवात झाल्यानंतरची ही सर्वांत कठोर कारवाई ठरली आहे.