दारूचे व्यसन समाजासमोरील मोठे आव्हान

0
582
  • देवेश कु. कडकडे
    (डिचोली)

दारू ही पिशाच्याची करणी आहे असे म्हणतात. दारू पिण्याचा सर्वांत मोठा दुष्परिणाम सर्व रोगांना आमंत्रण देणारा आहे. स्त्रियांवरील अत्याचार, कर्जबाजारी होणे, लाजलज्जा गुंडाळणे आणि रस्त्यावरील अपघात ही दारूचीच देणगी आहे…

दारू पिणे याला भारतीय समाजात कधीही मान्यता नव्हती. ते शिष्टसंमत नव्हते. त्यामुळे दारू पिणे म्हणजे काहीतरी घोर पाप केले, असा समज निदान आमच्या लहानपणी साधारण तीस वर्षापूर्वी निश्‍चितच होता. त्यामुळे पुरुषही आधी चोरून दारू प्यायचे, पण आता काळ बदलला आणि काही ठिकाणी स्त्रियाही उघडपणे दारू पिऊ लागल्या आहेत. दारूच्या व्यसनावर आधारीत ‘एकच प्याला’ या नाटकाला शंभराहून अधिक वर्षे झाली. दारूने होणारी घरादाराची वाताहत त्यात प्रभावीपणे मांडली आहे. हे नाटक केवळ मराठी नाट्य इतिहासातच नव्हे, तर एक उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून अजरामर ठरले आहे.

पुरुषांच्या दारूच्या व्यसनाची सर्वांत जास्त झळ, यातना स्त्रियांना भोगाव्या लागतात. शिवीगाळ, मारहाण असे अमानुष प्रकार होतात. तिच्याबरोबर सर्व कुटुंबाच्या वाट्याला येणार्‍या क्रूर वर्तनाचा परिणाम हा शारीरिक तसेच मानसिकही असतो. त्यामुळे बिहार राज्यात आणि महाराष्ट्रातील काही महिलांनी संघटितपणे दारूबंदीसाठी आंदोलने केली. दारूचे अड्डे बंद करण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला. दारूच्या दुष्परिणामाविषयी जागृती करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था पुढाकार घेतात. बिहारमध्ये नितीश कुमारांनी स्त्रियांना दिलेल्या वचनाला जागून राज्यात दारूबंदी लागू केली आहे.

दारू, बियर यांच्या सेवनाने पुरोगामी आधुनिकता सिद्ध होत नाही. त्यासाठी स्त्रियांना अनेक मार्ग खुले आहेत आणि अनेक स्त्रिया त्याबाबतीत आपली पात्रता सिद्ध करून पुरुषांच्या बरोबरीच्या नव्हे, तर त्यांच्याहून अधिक सरस ठरल्या आहेत. आधी गोव्यात फक्त बार होते त्यात केवळ पुरुषांना प्रवेश होता. २०-२५ वर्षापूर्वी गोव्यात बार ऍण्ड रेस्टॉरंट ही संस्कृती मूळ धरायला लागली आणि स्त्रिया आपल्या कुटुंबासमवेत यात मिसळू लागल्या. जीवन हे मजा करण्यासाठीच अशी धारणा असलेला वर्ग तयार झाला. दारू न पिणार्‍यांची चेष्टा केली जाऊ लागली. तरुणवर्गाचे रात्री-बेरात्री भटकणे ही आम बात झाली आणि पालकही याकडे कानाडोळा करू लागले. सुरुवातीला केवळ मित्रमंडळीच्या आग्रहाने चव चाखणारे आज या गर्तेत आपसूकच सापडले आहेत. सुरुवातीला कोणीही व्यसनाधीन होण्यासाठी सेवन करीत नाही, तर सहज म्हणून घेतलेली दारू पुढे सवय बनून जाते. या दहा-बारा वर्षांत आपल्याकडे चित्र पालटले आहे. त्याबद्दल कमालीचा मोकळेपणा आला आहे. बर्थडे पार्टी ओठ ओले केल्याशिवाय साजरी होत नाही. काही जण अशा प्रसंगाची संधी साधून चांगले हात धुऊन घेतात. आज असल्या बहुतेक पार्ट्यांत तरुण मुले आपल्या आई वडिलांसमोर पिण्याइतका मोकळेपणा आला आहे. मुले ही अनुकरणशील असतात. त्यात आईवडील हे तर त्यांचे आदर्शच आहेत. त्यामुळे मुलांची अशाप्रकारे पाठराखण करणारे पालक जाबाबदार आहेत. अस्वच्छ पाणी स्वच्छ करण्याचे काम तुरटी तर मळलेले कपडे स्वच्छ करण्याचे काम साबण करते; परंतु तुरटीच पाणी आणि साबण कपडे घाण करत असतील तर मग पाणी आणि कपडे स्वच्छ कोण करणार?

घर आणि मुलांवर संस्कार करण्याची प्रथम जबाबदारी आईची असते. तिनेच जर आपल्या जीवनमूल्यांकडे पाठ फिरवली आणि आई बिघडली की सारे कुटुंब बिघडते. दारूची सांगड माणसाच्या चारित्र्याशी घातली जाते. माणूस कितीही गुणी असला, तरी दारू पिणार्‍याकडे लोक संशयाने पाहतात. दारूबाज हे जनतेत विश्‍वासपात्र मानले जात नाहीत. मुलीही आता यात हळूहळू आपली पावले टाकताना दिसत आहेत. दारू पिणार्‍यांची आणि दुकानांची वाढलेली संख्या काय दर्शवते? शिक्षणामुळे मुले सुसंस्कारित होतात हा समजच मुळी फसवा ठरला आहे. मूल्यशिक्षणावर कोणी आज भर देतच नाही. आज दारू पिऊन मरण्याएवढे आपले जीवन कवडीमोल झाले आहे? आज दारू विक्रेते प्रचंड पैसा कामावून ऐषारामात राहतात. पिणार्‍यांच्या कुटुंबाच्या वाट्याला मात्र कपाळावर हात लावून बसण्याची पाळी येते.

आजूबाजूच्या राजेशाही पार्ट्या पाहून उच्च समाजाबरोबरच सामान्यजन संमोहित होतात. पार्टीच्या पाहुणचारावेळी मद्य अपरिहार्य मानले जात असल्याने दर दिवशी व्यसनाच्या आहारी जाणारी हजारो माणसे तयार होत आहेत. वयाची मर्यादा राहिली नाही, समाजाचे कसलेच नियंत्रण नाही. आधुनिकतेच्या नावाखाली असली थेरं चालू आहेत. दारू ही पिशाच्याची करणी आहे असे म्हणतात. दारू पिण्याचा सर्वांत मोठा दुष्परिणाम सर्व रोगांना आमंत्रण देणारा आहे. स्त्रियांवरील अत्याचार, कर्जबाजारी होणे, लाजलज्जा गुंडाळणे आणि रस्त्यावरील अपघात ही दारूचीच देणगी आहे. दिल्ली-मुंबईसारख्या महानगरात स्त्रियांनी दारूच्या नशेत गाडी चालवून अपघात घडवले आहेत.

मुलांच्या संगोपनात, त्यांच्या जडणघडणीच्या प्रक्रियेत स्त्रियांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आज महानगरातील स्त्रिया आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत व्यत्यय येऊ नये, म्हणून मातृत्व नाकारत आहेत. तणावग्रस्त स्त्रिया रात्री गाढ झोपेसाठी दारूचे सेवन करतात. त्यामुळे त्यांच्या जननक्षमतेवर परिणाम होतो. गर्भवती स्त्रियांचा गर्भपात होतो. अकाली प्रसूती होते किंवा संततीमध्ये ह्रदय दोष, मतिमंदत्व, अपंगत्व येण्याची मोठी शक्यता असते. आधुनिकता, पुरोगामित्व याच्या नावावर काही संस्था स्त्रियांना भारतीय संस्कृतीपासून तोडण्याचा प्रयत्न करीत असतात. मंगळसूत्र हे गुलामीचे प्रतीक आहे. त्यामुळे मंगळसूत्र हटाव अशी मोहीम चालवली जाते.

स्त्री-पुरुष कितीही शिकले, कितीही प्रतिष्ठा मिळाली, उच्च स्थान मिळाले तरीही नम्रतेची साथ कधीही सोडू नये. स्त्रीने जसा जुनाट मतवादी स्वभाव सोडून द्यायला हवा, तसेच स्त्री मुक्तीची अगदी टोकाची भूमिकाही घेऊ नये. या दोहींचा कुठेतरी सुवर्णमध्य साधण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असावे.

आज जगाचे वेगाने आधुनिकरण होत असून झपाट्याने वैज्ञानिक, आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक प्रगती होत आहे. मात्र, समाजातील व्यसनाधीनतेबद्दल कोणी फारसे बोलत नाही. अथवा निर्णय घेत नाही. दारू सेवनाबद्दल गोव्यात सगळा आनंदीआनंद आहे. आपल्या समाजाने त्यासाठी सर्वांना खुले मैदान दिले आहे. सरकार तर बार बंद पाडण्यापेक्षा ते वाचविण्यासाठी आटापिटा करीत आहे. स्त्रियांचे राहणीमान त्यांचे पोषाख, मादक पदार्थांचे सेवन यावर कोणी विरुद्ध मत मांडले, तर एका वर्गाकडून मागासलेपणाची जोड देऊन यावर टीकेची झोड उठवली जाते. यातील काही गंभीर बाबींवर चर्चा करण्याचे प्रयत्नही होत नाहीत. आज गोव्यात समाजासमोर सर्वांत मोठे आव्हान आहे ते तरुण पिढीचे दिवसेंदिवस भरारी घेणारे दारू सेवनाचे आणि अंमली पदार्थांचे व्यसन. कारण ते आज आरोग्याला महत्त्व देत नाहीत तर व्यसनाला देतात.